वर्ष १९८६ मध्ये स्थापन झालेली मोल्ड—टेक समूहाची मोल्ड—टेक पॅकेजिंग लिमिटेड ही भारतातील एक अग्रगणी प्लास्टिक पॅकेजिंग कंपनी आहे. देशांतर्गत एकूण उलाढालीपैकी जवळपास २०% वाटा मोल्ड—टेकचा आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ३५% इंजेक्शन मोल्डेड कंटेनर्स तर सुमारे ६५% उलाढाल ही रंगांच्या पॅकेजिंगसाठी असून उर्वरित उलाढाल एफएमसीजी क्षेत्रातील वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी आहे. कंपनीची सध्याची इंजेक्शन मोल्डिंग क्षमता वार्षिक २२,००० टनांची असून ती येत्या दोन वर्षांत ३२,००० पर्यंत वाढेल.

सध्या कंपनीकडे ७० अत्याधुनिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स आहेत. या खेरीज कंपनीकडे जर्मनी, स्वित्र्झलड आणि अमेरिकन बनावटीची ३ सीएनएन मशीन्स असून कंपंनीकडे अत्याधुनिक थ्री डी प्रिंटिंग होते. भारतातील जवळपास सर्वच मोठय़ा कंपन्यांचा तिच्या ग्राहकांमध्ये समावेश होतो. यात प्रामुख्याने एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, हिंदुस्तान युनिलीव्हर, कॅडबरी, अमूल, क्वालिटी, आयटीसी, वाडीलाल, मॅप्रो, गोकु ळ, कॅस्ट्रॉल, शेल, एचपीसीएल, हिमालया, रॅनबॅक्सी इ. कंपन्यांचा समावेश होतो. कंपनीची सध्या सात उत्पादन केंद्रे असून तिने आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गेल्याच वर्षी ५५ कोटी रुपये उभारले आहेत. उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आता दुबईजवळ रस अल् खाइमा येथे नवीन प्रकल्प उभारत आहे. उत्पादनक्षमतेच्या वाढीबरोबरच कंपनी आता खाद्यतेलांच्या पॅकेजिंगमध्येही उतरत आहे. सध्या रंग आणि ल्युब्सच्या पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली (९०% उलाढाल) मोल्ड—टेक पॅकेजिंग आता ग्राहकोपयोगी उत्पादनांमधील (एफएमसीजी) आपला हिस्सा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीचे देशांतर्गत विक्री केंद्रांचे जाळे तसेच उत्तम विपणन यामुळे कंपनीचा उत्पादन खर्च देखील तुलनेने कमी आहे.

गेल्या पाच वर्षांत वार्षिक सरासरी १८ टक्के दराने प्रगती करणाऱ्या मोल्ड—टेक पॅकेजिंगची वाढ येत्या तीन वर्षांत सरासरी २० टक्क्य़ांवर जाईल अशी अपेक्षा आहे. गेल्या तिमाहीत नक्त नफ्यात ३८ टक्के वाढ नोंदवणाऱ्या या कंपनीचे आर्थिक वर्षांचे निकाल देखील उत्तम असतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर योग्य वाटतो.

stocksandwealth@gmail.com

Story img Loader