शेअर बाजाराचा निर्देशांक रोज नवीन उच्चांक गाठत असताना इतक्या चढय़ा बाजारात खरेदी कुठली आणि काय करायची असा प्रश्न कुठल्याही सामान्य गुंतवणूकदाराला पडणे साहजिकच आहे. योग्य शेअर शोधून गुंतवणुकीची योग्य वेळ साधणे हे खूप कठीण आहे. उच्चांकाला शेअर खरेदी करणे हे धोकादायक असल्याने लाभाची आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून अभ्यास आवश्यक आहेच; तसेच थोडी नशिबाची साथही हवी. गेल्या काही आठवडय़ात ‘माझा पोर्टफोलियो’ या सदरात सुचवलेले शेअर्स सध्या रोज नवीन उच्चांक करीत आहेत. काही शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीने तुमचे उद्दिष्ट गाठलेही असेल. मात्र चढय़ा बाजाराचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या नफ्याचे उद्दिष्टही वाढवू शकता. शेअर बाजार दीर्घकालीन तेजीतच राहील, असे वाटते.
सुमारे ३२ वर्षांपूर्वी सिरोही, राजस्थान येथे सिमेंटचे उत्पादन सुरू केलेली ‘जे के लक्ष्मी सिमेंट’ आज भारतातील एक आघाडीची सिमेंट कंपनी आहे. राजस्थान खेरीज गुजरात आणि हरयाणा येथून कंपनी सिमेंटचे उत्पादन करते. गेली दोन वष्रे कंपनी दुर्ग, सूरत आणि उदयपूर येथील कारखान्यांत विस्तारीकरण करत असल्याने कंपनीचे उत्पादन यंदाच्या आíथक वर्षांत वाढेल. गेली तीन वष्रे मंदीच्या छायेत असणारा सिमेंट उद्योग आता पुन्हा उभारू लागला आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यापासून पायाभूत सुविधा, दळणवळण, गृहबांधणी इत्यादीवर भर दिल्याने पायाभूत सुविधा कंपन्या पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. येत्या दोन वर्षांत सिमेंट आणि सिमेंट उत्पादनाची मागणी किमान १०% ने वाढेल, अशी अपेक्षा आहे. जून २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. गेल्या वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने ६००.४२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर तब्बल २१२% अधिक म्हणजे ४८.९५ कोटी रुपयांचा नक्तनफा कमावला आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीची वाटचाल अशीच चालू राहून दीर्घकालीन गुंतवणूकदारांना त्याचा निश्चित फायदा होईल, असे वाटते. सध्या हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नि:संशय फायद्याची गुंतवणूक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा