अजय वाळिंबे
केपीआर भारतातील सर्वात मोठी परिधान उत्पादन (अॅपरल) कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सूत, विणलेले फॅब्रिक, तयार कपडे आणि पवन ऊर्जेचेही निर्मिती करते. कंपनी मुख्यत्वे वस्त्रोद्योगात असून त्याखेरीज साखर, मोलॅसिस, इथेनॉल, ऑटोमोबाइल पार्ट्स आणि ऊर्जा व्यवसायात आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी यार्न आणि फॅब्रिकचा महसूल ४२ टक्के, वस्त्र-प्रावरणे ४२ टक्के, साखर (१२ टक्के) आणि इतर (४ टक्के) आहेत. कंपनीचे ६५ टक्के उत्पन्न देशांतर्गत विक्रीतून आणि उर्वरित ३५ टक्के आंतरराष्ट्रीय विक्रीतून मिळते. कंपनी ६० आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह यूके, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह ६० हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.
तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये, कंपनीने ‘फासो’ या नवीन ब्रँडअंतर्गत इनरवेअर आणि अॅथलीझर या उत्पादन श्रेणींमध्ये ट्रंक, बॉक्सर शॉर्ट्स, बनियान, इ. उत्पादनांचे विपणन व विक्री सुरू केली आहे. आगामी कालावधीत या ब्रँडची १०० टक्के उत्पादने इन-हाऊस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीकडे एकूण १२ उत्पादन सुविधा असून त्यापैकी १० तमिळनाडूमध्ये, एक कर्नाटकात आणि एक इथिओपियामध्ये आहे. एकत्रित १०५ दशलक्ष विणलेल्या कपडय़ांची क्षमता असलेली केपीआर मिल ही भारतातील सर्वात मोठी वस्त्र उत्पादक कंपनी आहे.
विस्तार योजना
कंपनीच्या यार्न विभागामध्ये, अत्याधुनिक ३७०,००० स्पिंडल्सच्या माध्यमातून वार्षिक उत्पादन क्षमता एक लाख मेट्रिक टन आहे. लवकरच ही उत्पादन क्षमता दुप्पट होईल. देशांतर्गत सर्वात मोठी आणि आधुनिक गार्मेट्स उत्पादन क्षमता केपीआरची असून कंपनी वर्षांकाठी ११.५ कोटी गार्मेट्सचे उत्पादन करू शकते. कंपनीने १०,००० प्रति दिन टन ऊस (टीसीडी), ४७.५ मेगावॅट क्षमतेची को-जनरेशन वीजनिर्मिती आणि २३० किलो लिटर प्रति दिन इथेनॉल उत्पादन क्षमतेसह नवीन साखर कारखाना स्थापन करण्यासाठी केपीआर शुगर अँड अॅपरल्स लिमिटेड ही नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या उपकंपनीअंतर्गत ४२ दशलक्ष कपडय़ांच्या क्षमतेसह एक नवीन गार्मेटिंग युनिट स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने डिसेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाहीचे/ नऊमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. यंदाच्या नऊमाहीच्या कालावधीत कंपनीने उलाढालीत ४१.५६ टक्के वाढ साध्य केली असून ती ३,४५२ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल ८९ टक्के वाढ होऊन तो ३२९ कोटींवरून ६२२ कोटींवर गेला आहे. तर तिमाहीसाठी कंपनीच्या विक्रीत ३६ टक्के वाढ होऊन ती १,२६१ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात ३६ टक्के वाढ होऊन तो २१२ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीने नुकतीच प्रति शेअर ८०५ रुपयांनी पुनर्खरेदी (बाय-बॅक) योजना निश्चित केली आहे. सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत केपीआर मिलसारखे शेअर्स पडेल भावात खरेदी करून ठेवावेत.
केपीआर मिल लिमिटेड
(बीएसई कोड – ५३२८८९)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ६१२/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ७७२/१६६
बाजार भांडवल : रु. २१,०३९ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. ३४.४१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.७२
परदेशी गुंतवणूकदार ३.५८
बँक/ म्यु. फंड/ सरकार १२.९९
इतर/ जनता ८.७१
संक्षिप्त विवरण
* शेअर गट : लार्ज कॅप
* प्रवर्तक : के. पी. रामास्वामी
* व्यवसाय क्षेत्र : वस्त्रोद्योग/ साखर/ एथेनोल
* पुस्तकी मूल्य : रु. ८०.१
* दर्शनी मूल्य : रु. १/-
* गतवर्षीचा लाभांश : ९०%
शेअर शिफारसीचे निकष
* प्रति समभाग उत्पन्न : रु.२३.४९
* पी/ई गुणोत्तर : २६
* समग्र पी/ई गुणोत्तर : २१.१
* डेट इक्विटी गुणोत्तर : ०.३
* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४३.३
* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २५.४
* बीटा : १
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.