डिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत. ते सनदी लेखपाल असून त्यांना समभाग संशोधन व समभाग गुंतवणूक व्यवस्थापनाचा आठ वर्षांचा अनुभव आहे.
नेस्को ही कंपनी औद्योगिक यंत्रसामग्री व स्थावर मालमत्ता विकास या उद्योगात आहे. या कंपनीची स्थापना १९३९ मध्ये न्यू स्टॅन्डर्ड इंजिनीयरिंग कंपनी या नावाने मुंबईत झाली. भायखळा येथून कामकाजास सुरुवात केल्यानंतर कंपनीने परेल व सांताक्रूझ येथे विस्तार केला. कंपनीने १९५९ मध्ये मुंबईत गोरेगाव येथे ७० एकर जागेत स्थलांतर केले. वस्त्रोद्योगाला लागणारी यंत्रसामग्री, फोìजग हॅमर, तेल शुद्धीकरण कारखान्यात वापरावयाचे पंप, रेल्वेसाठी मालगाडीच्या डब्यांसाठी वापरावयाचे अवजड कािस्टग, संरक्षण उत्पादनासाठी वापरावायचे सुटे भाग ही कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत. १९९२ मध्ये कंपनीकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा विकास करण्यासाठी स्थावर मालमत्ता विकास विभाग स्थापन केला. या विभागाची सुरुवात कंपनीने ‘द बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ हे व्यापार प्रदर्शनासाठी केंद्र स्थापन करून केली. या केंद्रात प्रामुख्याने व्यापारी मेळावे व औद्योगिक प्रदर्शने होतात. ४५ हजार चौरस मीटर जागेत या केंद्रात वर्षभर वेगवेगळी प्रदर्शने, व्यापार विस्ताराचे मेळावे सुरु असतात. उर्वरित जागेत कंपनीने व्यावसायिक वापरासाठीच्या इमारतींचे बांधकाम केलेअसून हा परिसर ‘नेस्को आयटी पार्क’ या नावाने ओळखला जातो. सिटी बँक, सोडेक्सो, रेलिगेअर या सारख्या ख्यातनाम कंपन्यांनी आपली कार्यालये थाटण्यासाठी या संकुलातील कार्यालये भाडेतत्वावर घेतली आहेत. कंपनीला आयटी पार्क विकसित करण्यासाठी सर्व सरकारी परवानग्या मिळाल्या असून हा परिसर संपूर्ण विकसित झाल्यावर पाच लाख चौरस फूट इतकी जागा कार्यालयीन वापरासाठी उपलब्ध होईल.
मूल्यांकन: सद्य भावाचे २०१५ व २०१६ च्या मिळकतीशी (ईपीएस) गुणोत्तर अनुक्रमे १८.९६ व १६.५० पट आहे. २०१५ ची मिळकत ६६.९९ व २०१६ ची मिळकत ७२.५७ अपेक्षित आहे. दोन वर्षांनंतरचे १५८५ चे लक्ष्य निर्धारित करून आम्ही खरेदीची शिफारस करीत आहोत.