सुधीर जोशी

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या व्याजदरासंबंधी निर्णयाच्याआधीच सरलेल्या सप्ताहात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा जोरही कायम होता. त्यामुळे गेल्या सप्ताहाची सुरुवात थोडी नकारात्मक राहिली. रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेली रेपो दरातील वाढ बाजाराच्या अपेक्षेप्रमाणेच होती. अपेक्षेनुरूप निर्णयामुळे भांडवली बाजारात दिलासादायक तेजीची लाट आली. मात्र या तेजीमध्ये लगेच नफावसुली झाली आणि बाजाराने पुन्हा एकदा परत जागतिक घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून अपेक्षित अर्ध्या टक्क्यांहून जास्त व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. चीनच्या कोविडबाबत शून्य सहनशीलतेच्या धोरणाने पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध पवित्रा बाळगून आहेत. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी निर्देशांकांत मोठी घसरण होऊन साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांकांमध्ये अडीच टक्क्यांची घट झाली आहे.

ट्रेंट लिमिटेड :

टाटा समूहातील ही कंपनी वेस्टसाइड, झुडियो, स्टारबाजारसारख्या किरकोळ विक्री दालनांमार्गे ग्राहकांना नव्या पिढीच्या आधुनिक (फॅशनेबल) वस्तू, कपडे, किराणा खरेदीसाठी सुखावणारा अनुभव देते. कंपनीने मार्च अखेरच्या तिमाहीत वार्षिक तुलनेत उलाढालीमध्ये ५३ टक्के, तर नफ्यामध्ये ३२ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या नफ्यात मात्र किंचित घसरण झाली आहे. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या विक्रीमध्ये ८५ टक्के वाढ झाली. मार्चअखेर कंपनीची २०० वेस्टसाइड तर २३५ झुडियो दालने कार्यरत होती. कंपनीकडे असलेल्या रोकड सुलभतेमुळे विक्री दालनांची संख्या भविष्यात वाढेल. ब्रॅंडेड कपडे, पादत्राणे व इतर नित्य उपयोगाच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. तसेच त्यांच्या उत्पादक कंपन्या जाहिरातींवर खर्च करणार आहेत. त्यामुळे किरकोळ विक्री दालनांची साखळी असणारी ही कंपनी भविष्यात चांगला परतावा देईल. सध्या १,१०० रुपयांच्या पातळीवर असलेल्या या समभागात गुंतवणुकीची संधी आहे.

मिंडा कॉर्पोरेशन :

वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या या कंपनीने मार्चअखेरच्या तिमाहीतील विक्रीत १९ टक्के वाढ साध्य केली. खर्चावरील नियंत्रणामुळे नफ्याचे प्रमाणही कंपनीला कायम राखता आले आहे. उत्पादनांत नवकल्पना राबवून वाहनांतील सुटय़ा भागामधील कंपनीच्या उत्पादनांचे प्रमाण वाढविण्यात कंपनीला यश आले आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या सुटय़ा भागांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. वाहन उद्योगातील सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा कमी होत आहे. दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्याच्या मार्गावर असल्यामुळे वाहन उद्योगात व पर्यायाने सुटय़ा भागांच्या मागणीत वाढ अपेक्षित आहे. सध्या २०० रुपयांच्या खाली आलेला कंपनीच्या समभागात गुंतवणूक करायला योग्य आहे. 

हिन्दुस्तान युनिलिव्हर :

पडलेल्या बाजारात कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून या कंपनीचा विचार करता येईल. ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) क्षेत्रातील या प्रथम क्रमांकाच्या कंपनीकडे एक हजार कोटी उलाढाल असलेल्या १६ नाममुद्रा आहेत. कंपनीची एकूण उलाढाल ५० हजार कोटींवर गेली आहे. कंपनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कायम आघाडीवर असते. ‘शिखर’ या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनी आता पर्यंत ८,०० वितरकांशी जोडली गेली असून त्यामुळे उत्पादन पुरवठा व  उर्वरित रक्कम वसुलीमध्ये सुसूत्रता येत आहे. कंपनीने निवडक उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ करून वाढत्या महागाईचा चांगला मुकाबला केला आहे. सध्याच्या २,२०० रुपयांच्या खाली असलेल्या या समभागात गुंतवणूक करायला संधी आहे.

सरलेल्या सप्ताहात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ करण्याची घोषणा केली. महागाई दराचा वेग पाहाता दोन महिन्यांनी व्याजदर अजूनही वाढण्याची शक्यता आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांना याचा निश्चित फटका बसेल. त्यामुळे घर खरेदीचे निर्णय काही महिने लांबणीवर पडतील. याचबरोबर सिमेंट, पोलाद, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे बांधकाम व गृहनिर्माण व्यवसायालाही त्याची झळ बसेल. या सप्ताहातील अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात अर्धा टक्का वाढ केली, तर बाजारात पुन्हा एकदा थोडी तेजी येण्याची आशा आहे. पण एकंदर कल बघता पुन्हा गुंतवणूकदारांकडून नफावसुलीला प्राधान्य दिले जाईल.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा :

* अमेरिकी मध्यवर्ती बँक या सप्ताहात व्याजदर धोरण जाहीर करेल.

* आयटीडीसी, नागार्जुन फर्टिलाईझर्स या कंपन्या वार्षिक निकाल जाहीर करतील.

*  बजाज ऑटोकडून समभागांच्या पुनर्खरेदीची (बायबॅक) घोषणा.

*  राष्ट्रीय सांख्यिकी विभाग मे महिन्यातील किरकोळ दरांवर आधारित महागाईच्या वाढीचे आकडे जाहीर करेल.

*  भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीमधील सुकाणू गुंतवणूकदारांच्या (अँकर इन्व्हेस्टर्स) विक्रीवरील बंधनाची एक महिन्याची मुदत संपेल 

sudhirjoshi23@gmail.com