सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या सप्ताहाची सुरुवात बाजाराने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सच्या हजार अंशाच्या सलामीने केली. मोसमी पावसाचे वेळेवर आगमन आणि त्यामुळे कृषी उत्पादनावर अनुकूल परिणाम होण्याचा अंदाज, अमेरिकेतील चलनवाढ आटोक्यात येण्याचे संकेत व चीनमधील निर्बंध शिथिल होण्याच्या वृत्ताने जागतिक बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. त्याचे सकारात्मक पडसाद  देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल अनिश्चितता, अमेरिकी मध्यवर्ती बँकेचे जून आणि जुलै महिन्यातील व्याजदर वाढविण्याचे संकेत यामुळे बाजारात चढ-उतार होत राहिले. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या आठवडय़ावर गेले. मात्र त्यांना बँक निफ्टीचा सहभाग मिळाला नाही कारण रिझव्‍‌र्ह बँकेच्या आगामी पत धोरणाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

एमटार टेक्नॉलॉजी: ही कंपनी संरक्षण, अवकाश आणि अक्षय्य ऊर्जा अशा क्षेत्रात कार्यरत असून ती डीआरडीओ, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इस्रो, राफेलसारख्या कंपन्यांबरोबर व्यवसाय करते. कंपनीच्या हातात ६५० कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत. गेल्यावर्षी या कंपनीचे समभाग दुप्पट किमतीला सूचिबद्ध झाले होते. गेल्या जानेवारीमधील २,५५६ रुपयांच्या पातळीवर असलेले हे समभाग आता १,५०० रुपयांच्या खाली आले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे ही घसरण झाली आहे. त्यामुळे ‘ग्रोथ’ प्रकारामधील हे समभाग आता परत ‘व्हॅल्यू’ प्रकारात आले आहेत. कंपनीने नुकतेच ‘जीपी’ या लघुउद्योग कंपनीचे अधिग्रहण केले आहे. त्यामुळे कंपनीच्या संरक्षणविषयक उत्पादनांना बळकटी मिळेल. कंपनी कार्यरत असलेल्या क्षेत्रांचे भविष्यातील महत्त्व विचारात घेता हे समभाग रास्त किमतीत मिळत आहेत.

आयआरसीटीसी: चौथ्या तिमाहीत प्रगतीचा आलेख कायम राखत आयआरसीटीसीने वर्षांची सांगता चांगली केली. ओमायक्रॉनचा परिणाम गेल्या वर्षांत कंपनीच्या मिळकतीवर झाला. मात्र पुढचे वर्ष अधिक चांगले जाण्याची शक्यता आहे. खानपान, पेय-जल आणि तिकिटांचे आरक्षण यामध्ये कंपनीची एकाधिकारशाही आहे. नव्याने सुरू होणारे रेल्वे मार्ग कंपनीला फायदा मिळवून देतील. गेल्या तीन महिन्यांत १८ टक्क्यांनी खाली आलेले हे समभाग अजून खाली आले की गुंतवणुकीस योग्य ठरतील.

ग्राइंडवेल नॉर्टन: कंपनीने शेवटच्या तिमाहीत आकर्षक कामगिरी केली. कंपनीची उलाढाल १२ टक्क्यांनी वाढून ५५८ कोटी झाली तर नफा १२.५ टक्क्यांनी वाढून ९० कोटींवर पोहोचला आहे. संपूर्ण वर्षांसाठी उलाढाल दोन हजार कोटी व नफा २९६ कोटी झाला (२३ टक्के वाढ). कंपनी उद्योगांना लागणारी ग्राइंिडग, कटिंग, पॉलििशगची चाके व सिलिकॉन कार्बाईड बनविते. कारखानदारी उद्योगांना लागणारे उच्च दर्जाचे प्लॅस्टिक आणि सिरॅमिक्सचे सुटे भागही कंपनी बनविते. कंपनीला जगातील नावाजलेल्या नॉर्टन समूहाचे पाठबळ आहे. गेली अनेक वर्षे कंपनीकडे रोकड सुलभता असून कर्जाचे प्रमाण शून्य आहे. सध्या १,७०० रुपयांवर असलेले हे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत.

गेल्या महिन्याचे वस्तू व सेवा कराचे संकलन थोडे कमी झाले असले तरी, सलग ११ व्या महिन्यात ते एक लाख कोटींच्या वर आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक – पीएमआय ५४ गुणांवर असणे ही देखील समाधानाची बाब आहे. गेल्या आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ८.७ टक्के झाला. ओमायक्रॉनचे संकट व वाढणारी महागाई या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जगात उजवी ठरली असली तरी विकास दर प्रत्येक तिमाहीत कमी होत गेला आहे. पुढील काही महिने व्याजदर वाढीचे असतील. त्यामुळे वस्तूंच्या मागणीचे प्रमाण कायम राहील का हे पाहावे लागेल. आर्थिक आघाडीवर सरकार व रिझव्‍‌र्ह बँक कितपत यशस्वी ठरते यावर अर्थव्यवस्थेची आणि पर्यायाने बाजाराची वाटचाल ठरेल. या सप्ताहातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर धोरण समितीच्या बैठकीतील घोषणा आणि गव्हर्नरांचे भाष्य बाजारासाठी महत्त्वाचे असेल.

सप्ताहातील काही निवडक घटना:

1)भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने बाजारात सूचिबद्ध झाल्यावर पहिल्यांदाच तिमाही निकाल  जाहीर केले. मार्चअखेरच्या तिमाहीचा नफा कमी झाला असला तरी वार्षिक नफ्यात ३९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जीवन विम्याच्या बाजारपेठेत सुमारे ७० टक्के हिस्सा असलेल्या या कंपनीचे समभाग प्रारंभिक समभाग विक्री मूल्याच्या खाली आले आहेत. अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांनी थोडा तोटा सोसून हे समभाग विकावेत व भांडवल मोकळे करावे. पण दोन तीन वर्षे वाट पाहण्याची तयारी असेल तर त्यामधे ८०० रुपयांच्या आसपास खरेदी करून सरासरी खरेदी मूल्य कमी करता येईल.

2) पीएनबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनी गृह कर्जाचे दर वाढविले आहेत. कर्जाचे हप्ते वाढणार असल्याने विद्यमान कर्जदारांना देखील याचा फटका बसणार आहे.

3)अल्ट्राटेक सिमेंटने १२ हजार कोटी रुपये खर्चून उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अल्ट्राटेक जगातील तिसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक होईल. या आधी अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रात पदार्पण करून भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होण्याचे मनसुबे जाहीर केले होते. आता या क्षेत्रात स्पर्धा तीव्र होऊन ध्रुवीकरणाला वेग येईल. त्यामुळे बाजारातील सर्व सिमेंट कंपन्यांचे समभाग गडगडले. गुंतवणूकदारांनी अग्रणी सिमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करणेच हिताचे ठरेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last week stock market report last week stock market performance zws