उच्चशिक्षित आणि सुजाण व्यक्तीही स्वत:जवळील विश्लेषणात्मक कौशल्य वापरावयाचा प्रयत्न करीत नाहीत. कोणी व्यवहारी सल्ला द्यायचा प्रयत्न केला तरी त्याकडे चक्क डोळेझाक केली जाते. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच गुंतवणूकदार भाववाढीचा दर विचारात घेऊन गुंतवणूक करतात. अन्यथा स्वत:च्याच धनराशीला वाळवी लावण्याचा आणि पैशाची आवक जेव्हा बंद होते तेव्हा आर्थिकदृष्टय़ा ओढाताणीला सामोरे जाण्याचीच प्रवृत्तीच अधिक दिसून येते.-
आपल्या देशामध्ये गुंतवणूक म्हटली, की आयकरमुक्त आणि गॅरंटीड परतावा यापलीकडे सहसा कोणी विचार करत नाही. उच्चशिक्षित आणि सुजाण व्यक्तीही स्वत:जवळील विश्लेषणात्मक कौशल्य वापरावयाचा प्रयत्न करीत नाहीत. कोणी व्यवहारी सल्ला द्यायचा प्रयत्न केला तरी त्याकडे चक्क डोळेझाक करून खात्रीलायक परतावा असेल असा पर्यायच निवडला जातो. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच गुंतवणूकदार भाववाढीचा दर विचारात घेऊन गुंतवणूक करतात. या बाबतीत प्रत्यक्षात अनुभवलेला एक प्रसंग.
एका मोठय़ा बँकेत वीस-बावीस वर्षे नोकरी करणारी ऑफिसर ग्रेडची मॅडम. तिची मुलगी तीन वर्षांची असताना तिने एका भरवशाच्या कंपनीची लहान मुलांसाठीची पॉलिसी घेतली होती. पॉलिसीच्या शर्तीनुसार १५ वर्षे प्रीमियम भरल्यानंतर त्या मुलीच्या शिक्षणासाठी  म्हणून तिच्या वयाच्या १८व्या वर्षांपासून २१ व्या वर्षांपर्यंत कंपनी चार हप्त्यांमध्ये पैसे देणार. प्रज्ञा (endowment) प्रकारातील प्रत्येक पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांसाठी एक गाजर लावलेले असते. त्या पॉलिसीमधील गाजर आहे- ‘पंधरा वर्षांच्या टर्ममध्ये पालकाचा मृत्यू झाला तर बालकाला विमा रक्कम आणि बोनस प्राप्त होणार आणि पुढील हप्ते कंपनी भरणार. इतकेच नव्हे तर पॉलिसीच्या शर्तीनुसार १८ ते २१ वर्षांपर्यंतचे हप्तेही त्या बालकाला प्राप्त होणार.’ त्या पैकी १८व्या वर्षांचा पहिला हप्ता त्या मॅडमना मिळाला होता आणि मोठय़ा कौतुकाने त्यांनी ही गोष्ट सांगितली. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘अहो, तुम्ही कंपनीकडे जमा केलेले १५ वर्षांचे हप्ते विचारात घेऊन परत मिळालेल्या रकमेसंदर्भात परताव्याचा दर पाहिलात का?’
मॅडम : ‘त्याची  काय गरज आहे?’
मी : ‘अहो मॅडम, परताव्याचा दर ५%’ सुद्धा होत नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या किंवा मुलीच्या वडिलांच्या नावे १५ वर्षांची प्युअर टर्म पॉलिसी, तीही जास्तीच्या विमाछत्राची घेतली असती आणि प्रीमियमच्या रकमेमधील बचत पीपीएफ.मध्ये गुंतविली असतीत तर तुम्हाला जास्त रक्कम प्राप्त झाली असती.
(यावर त्यांचे उत्तर ऐकून माझी बोलती बंद झाली!)
मॅडम : ‘मला ते काही सांगू नका. विमा कंपनीने हमी दिल्याप्रमाणे पहिला हप्ता दिला ना? बस! आणि पुढील हप्तेही मिळणार आहेत.’
आपल्या देशातील जनतेच्या अशा प्रकारच्या ‘जोखीम नको आणि मी म्हणतो तेच बरोबर’ या मानसिकतेला अनुरूप असे अनेक पर्याय आर्थिक बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकप्रिय आहेत ते पोष्ट ऑफिस, बँक एफ्डी किंवा पीपीएफ आणि त्यातही सर्वात जास्त लोकप्रिय पर्याय म्हणजे पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी. या पॉलिसीमध्ये (काळानुरूप) ५% ते ६% परतावा मिळतो. आयकरामध्ये सूट मिळते, कंपनीकडून परत मिळणारी रक्कम आयकरमुक्त असते आणि सोने पे सुहागा म्हणून विमाछत्रही असते.
सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या पॉलिसींमध्ये विमाछत्र अतिशय मामुली असते. त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये घरात येणारी पैशांची आवक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि वाढत्या महागाईमुळे किती मोठय़ा प्रमाणात आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे त्याचा विचार न करता एका खोटय़ा आणि अपुऱ्या सुरक्षिततेचे कवच प्रत्येकाने अजाणतेपणाने तयार केलेले असते. सुरक्षिततेचे पर्याप्त कवच फक्त मोठय़ा रकमेच्या विमाछत्राच्या प्युअर टर्म पॉलिसीच तयार करू शकतात. परंतु विमा इच्छुक त्या पसंत करीत नाहीत. कारण त्यांमध्ये परताव्याचा प्रकार नसतो.
ज्या वेळी एखाद्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीबाबतचे नियोजन करण्याची वेळ येते त्या वेळी त्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते. त्याच्याकडे ८ ते १० पॉलिसी असतात. परंतु त्याची आजची कमाई आणि भविष्यातील आवक जमेस धरून त्या व्यक्तीची आर्थिक किंमत (economic value) विचारात घेतली तर त्या सर्व पॉलिसींच्या विमाछत्राची एकत्रित रक्कम त्या किमतीच्या १०% ते १५% ही नसते.
माझ्या माहितीतील एका गुंतवणूकदाराला त्याच्या आयकर सल्लागाराने एकाच दिवशी (तारीख ४ एप्रिल २००४) एकंदर सोळा विमा पॉलिसी गळ्यात मारलेले उदाहरण माझ्याकडे आहे. त्यापैकी आठ त्याच्या नावाच्या आणि आठ त्याच्या पत्नीच्या नावाच्या. त्यातही कळस म्हणजे पत्नीला विमाछत्राची गरज नव्हती. कारण ती गृहिणी (housewife) आहे. तिची ‘इकॉनॉमिक व्ह्य़ॅल्यू’ शून्य!
अशा प्रकारच्या पॉलिसींचे हप्ते भरण्यामध्ये गुंतवणूकदाराच्या एकूण बचतीपैकी ७०% पेक्षा जास्त रक्कम खर्च होत असते. या वास्तवाची जेव्हा त्याला जाणीव होते तेव्हा फार विचित्र परिस्थिती निर्माण होते. निवृत्तीपर्यंत बऱ्यापैकी धनराशी तयार करण्यासाठी त्याला इतर पर्यायांमध्ये जास्त रक्कम गुंतविण्याची गरज असते आणि इथे तर बरीच मोठी रक्कम भाववाढीच्या दरापेक्षा ५०% कमी अशा परताव्यामध्ये जमा होत असते. अशा परिस्थितीत बचतीचे प्रमाण वाढविणे किंवा आहेत त्या पॉलिसी सरेंडर किंवा पेड अप करून गुंतवणूकयोग्य रक्कम वाढविणे (जेणेकरून इतर पर्यायांचा लाभ घेता येईल.) त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील धनसंचय करण्याच्या काळामध्ये गॅरंटिड परताव्याच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये पूर्ण रक्कम जमा करून स्वत:च्याच धनराशीला वाळवी लावली तर पैशाची आवक जेव्हा बंद होते तेव्हा आर्थिकदृष्टय़ा फार ओढाताण होते.
आयुर्विमा हा प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे. किंबहुना आजच्या ‘हम दो हमारे दो’ या प्रकारच्या कुटुंबप्रणालीमध्ये तर त्याची नितांत गरज आहे. पुढील २० ते ३० वर्षे अर्थार्जन करणार आहे, त्यासाठी कमीतकमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त विमाछत्रे देणारी प्युअर टर्म इन्शुरन्स हीच योग्य प्रकारची पॉलिसी आहे. ९०% पेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशिओ असलेल्या विमा कंपन्यांच्या अशा प्रकारच्या पॉलिसी अगदी मामुली प्रीमियममध्ये उपलब्ध आहेत. (तीस वर्षांच्या व्यक्तीसाठी १ कोटी रु.च्या विमाछत्रासाठी ३० वर्षांची टर्म असलेल्या पॉलिसीचे वार्षिक प्रीमियम आहे १० ते ११ हजार रु.) त्यामुळे गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करता येते.
या इतर पर्यायांपुैकी सर्वात जास्त पर्याय म्हणजे म्युचुअल फंड. आपल्या देशात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक या एका अप्रतिम संधीचा म्हणावा तितका फायदा घेतला जात नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये परताव्याची हमी नसते. जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात त्यापैकी बहुतांशी गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीचे टायमिंग चुकीचे असते. शेअरबाजार जेव्हा तेजीच्या परिसीमेला पोहोचलेला असतो तेव्हा ते इक्विटी स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक करतात. त्यानंतरची तीन-चार वर्षे स्वत:च्या नशिबाला  आणि म्युच्युअल फंडाला दोष देत बाजार जेव्हा मंदीचा तळ गाठतो त्या वेळी नुकसान सोसून बाहेर पडतात.
भाववाढीच्या भस्मासूरावर मात करून साधारणत: २० ते ३० वर्षांमध्ये बऱ्यापैकी गंगाजळी तयार करायची असेल तर शेअर बाजारातील गुंतवणुकीला पर्याय नाही. परंतु नवशिक्यांनी त्यामध्ये थेट गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. त्यांनी म्युच्युअल फंडामार्फत प्रवेश करावा. बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी त्या ठिकाणी फंड मॅनेजर असतो. त्यातही पहिल्या वेळेस गुंतवणूक करणाऱ्यांनी सेन्सेक्स किंवा निफ्टी या निर्देशांकाच्या ईटीएफमधील गुंतवणुकीने ‘श्रीगणेश:’ करावा. बीएसई सेन्सेक्सच्या सुरुवातीपासूनचा (१९७८) प्रवास बघितला तर आजपर्यंतची सरासरी वार्षिक वाढ आहे १६.५% अशी दमदार आहे.
आयकर वाचविण्यासाठी म्युच्युअल फंडांच्या  ईएलएसएस स्कीम आहेत. परताव्याची हमी नसली तरी कमीत कमी चार स्कीम अशा आहेत की त्यांनी सुरुवातीपासूनच्या काळाचा विचार केला तर द.सा.द.शे. सरासरी २४% पेक्षा जास्त वाढीची नोंद केलेली आहे. आपल्या गणतीसाठी संरक्षित असा १२% परतावा गृहीत धरला तरी पीपीएफपेक्षा २७% जास्त परतावा पदरात पडतो. शिवाय ‘लॉक-इन् पीरियड’ तीन वर्षांचा असल्याकारणाने त्यातून लवकर सुटका करता येते.
निष्कर्ष : आयुर्विमा हा मोठय़ा विमाछत्रासाठी बिननफ्याच्या प्युअर टर्म पॉलिसीचा घेऊन प्रीमियमच्या रकमेमधील बचत पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा निर्देशांक आणि सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतविली तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुटुंबासाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि सर्व काही सुरळीत झाले तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी भक्कम गंगाजळी तयार होऊ शकते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा