गेल्या वर्षी पोर्टफोलियोसाठी सुचविलेला हा शेअर – ज्यात फायदाही झालेला नाही – तो पुन्हा का सुचविला आहे, असे काही गुंतवणूकदार म्हणतील. परंतु काही कंपन्यांमधील गुंतवणूक फळाला येण्यास वेळ लागू शकतो. त्यापकीच केर्न इंडिया हा एक आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक निष्कर्षांनुसार, २०१२-१३ या संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ९,२०० कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून ६,४८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तेल उत्खननातील एक सर्वात मोठी कंपनी म्हणून केर्न ओळखली जाते. राजस्थानमध्ये सध्या तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही कंपनीचे प्रकल्प कार्यरत आहेत. मूळची ब्रिटिश कंपनी असलेल्या केर्न पीएलसीचे बहुतांशी समभाग वेदान्त समूहाने खरेदी करून ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. सध्या वेदान्त समूहाकडे स्टरलाइट, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, सेसा गोवा, हिंदुस्तान झिंक इत्यादी कंपन्यांचे व्यवस्थापन असून खाणकाम क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. केर्नचा राजस्थानातील प्रकल्प हा ओएनजीसीच्या सहकार्याने कार्यरत असून त्यापकी ७०% हिस्सा केर्नचा आहे. चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी आयात कमी व्हायला हवी. आपल्याकडील एकूण आयातीपैकी ८०% आयात ही मुख्यत्वे कच्चे तेल व वायूची आहे. केर्न आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांकडून तेलाचे नियमित उत्पादन सुरू झाल्यास ही तूट कमी होण्यास मदत होऊ शकेल. येत्या आर्थिक वर्षांत कंपनीकडून भरीव कमगिरीची अपेक्षा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केर्न जरूर बाळगावा.

Story img Loader