योगायोगाने या वेळी पुन्हा एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवतोय. खरे तर ही बँक माझ्या रडारवर गेले अनेक दिवस आहे. मात्र काही वेळा चांगली गोष्ट घडण्यासाठी योग जुळून यावा लागतो तसे काहीसे या शेअरबाबतीत झाले. गेली ४० वष्रे सातत्याने नफ्यात असणाऱ्या आणि लाभांश देणाऱ्या या बँकेने यंदा हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करतानाच, १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करून २०१२-१३च्या आíथक वर्षांत १०५५.१० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत (८०३.२५ कोटी) तो ३१.३५% ने अधिक आहे. मार्च २०१३साठी संपलेल्या तिमाहीतही बँकेने गेल्या वर्षांच्या (३१ मार्च २०१२ची तिमाही) तुलनेत २०.१६% वाढ नोंदवून २५०.०८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. सध्या ६८५ शाखा आणि ६१३ एटीएम केंद्रे असलेल्या जे अँड के बँकेचे २०१५पर्यंत १००० शाखांचे उद्दिष्ट आहे. जम्मू आणि कश्मीर राज्यातील बँकेचे प्राबल्य आणि तेथील राज्य सरकारची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा असलेली ही बँक आता अन्य राज्यांतही अनेक शाखांद्वारे विविध सुविधा पुरवणार आहे. बँकेचे भागभांडवल केवळ ४८.४८ कोटी रुपयांचे असल्याने भागधारकांना यंदा  स्प्लिट आणि/ किंवा बोनस भागांची अपेक्षा होती. पण हिरक महोत्सवी वर्षांचे औचित्य म्हणून बँकेने ५००% ( गेल्या वर्षी ३३५%) विशेष लाभांश जाहीर केला आहे. तरी स्र्1+ असे उच्च मानांकन असलेली ही एकमेव बँक गुंतवणूकदारांना कायम फायद्याचीच ठरेल यात शंका नाही.

‘एंट्री’ची नामी संधी!

सध्या शेअर बाजारात सेल लागला आहे की काय अशी परिस्थिती आहे. ‘फिच’ या नामांकित पतमापन संस्थेने भारताचे मूल्यांकन वाढवून ते ‘स्थिर’ गटात केले असले तरीही शेअर बाजारावर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. येत्या आíथक वर्षांत आíथक प्रगतीचा दर ५% राहील असा विश्वासही या पतमापन संस्थेने व्यक्त केला आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती, चालू खात्यातील वाढती तूट, घसरता रुपया, औद्योगिक उत्पादनात झालेली घसरण, महागाई आणि दिवसागणिक बाहेर निघणारे अर्थिक घोटाळे या सर्वाचा एकत्रित परिणाम बाजारावर न झाला तरच नवल! आजच रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य-तिमाही धोरण जाहीर होणार असून व्याजकपातीची वेडी आशा अजूनही कायम आहे. उत्तम कंपन्यांचे शेअर्सही वेगात घसरत असल्याने नक्की कुठल्या भावात खरेदी करावी की, आहेत त्या किमतीला विकून खालच्या भावात शेअर्स खरेदी करावेत अशी द्विधा मनस्थिती होणे साहजिक आहे. यंदा पोर्टफोलियोमध्ये सुचविलेले बहुतांशी शेअर्स दीर्घ मुदतीसाठी सुचविले असल्याने हे शेअर्स विकायची घाई करू नये किंबहुना चांगले शेअर्स खरेदी करायची ही नामी संधी असेल. अजून किती काळ बाजार असा राहणार? असाही प्रश्न काही गुंतवणूकदार विचारत असतील. परंतु आपली खरेदी ही किमान २-३ वर्षांसाठीची गुंतवणूक असल्याने त्याचे उत्तरही तुमच्याकडेच मिळेल. ज्या गुंतवणूकदारांना झटपट पसे कामवायचे असतील त्यांनी मात्र या पडेल बाजारात ‘एंट्री’ घेऊन तीन-सहा महिन्यांत नफा कमवावा.

वाचकांसाठी विशेष सूचना : ‘पोर्टफोलियो’ या सदरात सुचवलेला प्रत्येक शेअर घ्यायलाच हवा असं नाही. कुठल्याही परिस्थितीत तुमच्या पोर्टफोलिओत १५ पेक्षा जास्त शेअर्स होणार नाहीत याची काळजी घ्या. एकाच क्षेत्रातील दोनपेक्षा जास्त कंपन्यात गुंतवणूक टाळा. घेतलेला शेअर सातत्याने पडत असेल तर त्याचे कारण शोधा आणि शक्य असेल तर पडणारा शेअर बघत जास्त तोटय़ात जाण्याऐवजी तो शेअर विकून टाकून तोटा थांबवा. कधी कधी तोटा सहन करणेही फायद्याचे ठरते.

Story img Loader