सुधीर जोशी
आधीच्या दोन सप्ताहांतील मोठय़ा घसरणीनंतर गेल्या सप्ताहातील बाजाराची वाटचाल दिलासादायक ठरली. एका दिवसाचा अपवाद वगळता निर्देशांक रोज सकारात्मक बंद झाले. आर्थिक मंदीच्या दिशेने सर्व प्रमुख देशांची वाटचाल होत असल्याच्या भीतीने जागतिक बाजारातील इंधन तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या नऊ दिवसांत खनिज तेलाचे दर १२ टक्क्यांनी खाली आले. धातू, खाद्यतेलाचे भाव खाली आले. त्यामुळे आपल्या बाजारातील ग्राहकोपयोगी वस्तू व वाहन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदी होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक सर्वात वरचढ ठरले. अमेरिकी बाजारही सकारात्मक होते. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मारा देखील कमी झाला. साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांकांतील वाढ अडीच टक्के होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॉलिकॅब :
इलेक्ट्रिकल वायर व केबल्सच्या विक्रीत २० ते २४ टक्के वाटा असणारी ही कंपनी घरगुती वापराचे पंखे, दिवे अशा उपकरणांच्या व्यवसायामध्ये देखील पाय रोवते आहे. कंपनी वायर व केबल्सचे ११ हजार प्रकार तर विजेवर चालणाऱ्या घरगुती उपकरणांचे सहा हजार प्रकार उपलब्ध करते. सध्या १२ हजार कोटींची विक्री करणाऱ्या या कंपनीने पुढील पाच वर्षांत २० हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या कच्च्या मालाच्या (रबर, तांबे, अॅाल्युमिनियम) किंमतीत काही महिन्यांपूर्वी बरीच वाढ झाली. पण आपल्या गुणवत्तेच्या व नाममुद्रेच्या बळावर कंपनी ही वाढ ग्राहकांकडून वसूल करण्यात यशस्वी झाली आहे. आता या किमती स्थिर होऊन थोडय़ा खाली येत आहेत. ज्यामुळे नफ्यामध्ये सुधारणा होईल. पुढील एक-दोन वर्षांचा विचार करता कंपनीमधील गुंतवणूक फायद्याची होईल.

सुप्राजित इंजिनीअिरग :
ही कंपनी वाहनांसाठी लागणाऱ्या विविध केबल्सची सर्वात मोठी पुरवठादार आहे. वाहनांमध्ये ब्रेक, क्लच, थ्रॉटल, गीयर, चोक, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, खिडक्यांच्या काचा, आरसे आसन व्यवस्था अशा अनेक गोष्टी केबलद्वारे जोडून नियंत्रित केल्या जात असतात. दुचाकीसाठी लागणाऱ्या केबल्सचा ७० टक्के पुरवठा तर चार चाकी वाहनांच्या केबल्सचा ३५ टक्के पुरवठा या कंपनीमार्फत केला जातो. बिगर वाहन क्षेत्रात कपडे धुण्याची यंत्रे, अवजड माल हाताळणी करणारी यंत्रे, सागरी वाहतूक व्यवसाय अशा क्षेत्रांना देखील ही कंपनी केबल्सचा पुरवठा करते. वाहन क्षेत्रातील मागणीत अपेक्षित सुधारणा व भारत-६ च्या निकषांसाठी वाहनातील केबल्सचे वाढलेले प्रमाण ध्यानात घेतले तर कंपनीला मागणीचा अभाव राहणार नाही. मागच्या अडचणीच्या काळातून जाताना कंपनीने मार्चअखेर तिमाहीतील कंपनीचा व्यवसाय विश्वास वाढवणारा होता. सध्याच्या बाजार मूल्यात या कंपनीत गुंतवणुकीसाठी संधी वाटते.

कोफोर्ज :
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सध्या झालेल्या घसरणीनंतर कोफोर्जचे समभाग गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने मिळकतीमध्ये दमदार कामगिरी केली होती. तसेच पुढील १२ महिन्यांसाठी २० टक्के वाढीचा अंदाज वर्तविला होता. कंपनी प्रवास, पर्यटन हॉटेल सेवा अशा व्यवसायांना सेवा पुरविते. या व्यवसायांना करोनाकाळात सर्वाधिक फटका बसला होता. आता यात सुधारणा अपेक्षित आहे. कंपनीच्या मिळकतीत डिजिटल व क्लाउड तंत्रज्ञानाचा वाटा ७१ टक्के आहे. मार्चअखेर कंपनीच्या हातात पाच हजार कोटी रुपयांच्या मागण्या होत्या ज्या आधीच्या वर्षी चार हजार कोटी रुपयांच्या होत्या. सध्याच्या भावात या समभागात गुंतवणुकीची संधी निश्चितच साधता येईल.

इंडियन हॉटेल्स :
इंडियन हॉटेल्सने ग्राहकांच्या विविध स्तराला साजेशा ३०० हॉटेल्सचा पल्ला गाठण़य़ाचे उद्दिष्ट या आर्थिक वर्षांसाठी ठेवले आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या हॉटेल्सचा वाटा ७४ टक्के असेल व स्वत:च्या मालकीच्या हॉटेल्सचा वाटा २६ टक्के असेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. कंपनीने गेल्या वर्षी दोन हजार कोटींचे हक्क भाग विक्री (राइट्स इश्यू) करून कर्जाची परतफेड केली आहे. एअर इंडिया आता टाटा समूहाच्या ताब्यात आल्यामुळे इंडियन हॉटेल्ससाठी विमानातील खान-पान सेवेची नवी संधी निर्माण होईल. करोनाकाळ संपल्यावर व्यावसायिक परिषदा, पर्यटन असे उद्योग पूर्वपदावर येत आहेत. दोन ते तीन वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीचे समभाग जमवता येतील.

बाजारातील जर आपण शीर्षस्थ ५०० समभागांवर नजर टाकली तर, ८० टक्क्यांहून अधिक समभागांमध्ये २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे आणि जवळपास ६० टक्क्यांच्या समभागात ३० टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. त्यामुळे असे समजायला वाव आहे की बाजार तळाच्या जवळ आहे. इंधन तेलाचे भाव सध्या तरी आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे पण त्याबाबत खात्री देता येत नाही. व्याज दरवाढ होणारच आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता तर राहणारच आहे. पण आता टप्प्याटप्प्याने खरेदी करायला वाव आहे.
sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market positive signals fuel oil economic downturn mineral oil consumer vehicle area companies amy