सुधीर जोशी
सरलेल्या सप्ताहात बाजारावर परिणाम करणाऱ्या अनेक घटनांनी बाजारातील वातावरण उल्हसित ठेवले होते. मासिक सौदापूर्तीचा दबाव, अमेरिकी मध्यवर्ती बँक-फेडरल रिझव्र्हची व्याजदर आढावा बैठक तसेच अनेक नामवंत कंपन्यांचे चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे आर्थिक कामगिरीचे निकाल यामुळे बाजारात मोठे चढ-उतार झाले. लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, टाटा स्टीलसारख्या अग्रणी कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरीची नोंद केली आहे. गेल, बजाज फिनसव्र्ह, सोनाटा सॉफ्टवेअर या कंपन्यांनी बक्षीस (बोनस) समभाग जाहीर केले. अमेरिकी मध्यवर्ती बँक-फेडरल रिझव्र्हने केलेली व्याजदर वाढ बाजाराने गृहीत धरली होती. मात्र आता आगामी व्याज दरवाढ तीव्र असणार नाही अशा संकेतांमुळे अमेरिकी बाजाराने उसळी घेतली. त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटले. आधीच्या सप्ताहातील तेजीचे वातावरण पुढे नेत बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गेल्या दोन आठवडय़ांत सात टक्क्यांची कमाई केली.

सेंच्युरी प्लायबोर्डस : प्लायवूड आणि डेकोरेटिव्ह व्हीनियरची ही सुप्रसिद्ध उत्पादक आहे. भारतीय संघटित प्लायवूड बाजारपेठेमध्ये प्लायवूड आणि डेकोरेटिव्ह व्हीनियरची सर्वात मोठी विक्री करणारी ही कंपनी आहे. ते सेंच्युरीप्लाय या नाममुद्रेने त्यांची उत्पादने बाजारात आणतात. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये प्लायवूडची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. कंपनी लॅमिनेट, डेकोरेटिव्ह व्हीनियर आणि प्रीलॅमिनेटेड मीडियम डेन्सिटी फायबर (एमडीएफ) बोर्डदेखील बनवते. कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील विक्रीमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्के वाढ झाली तर नफ्यात ८८ टक्के वाढ झाली. कंपनी उत्पादनांच्या किमती वाढवून कच्च्या मालामधील दरवाढीचा सामना करू शकते. कंपनीच्या उत्पादन विस्ताराच्या योजना प्रगतिपथावर आहेत. शहरीकरण, वाढणाऱ्या गृह प्रकल्पांमुळे कंपनीच्या उत्पादनांस मागणी कायम राहील. सध्याचा ६०० रुपया खाली असलेल्या समभागात वर्षभरात २० टक्के वाढीची अपेक्षा ठेवता येईल.

अतुल लिमिटेड : ही कंपनी कृषी रसायने, रंग रसायने, सुगंधी द्रव्ये, औषधे व पॉलिमर अशा क्षेत्रांतील तीस प्रकारच्या विविध उद्योगांना कच्चा माल पुरविते. कंपनी संपूर्ण कर्जमुक्त असून गेली ४५ वर्षे देशात आणि विदेशात कार्यरत आहे. कंपनीच्या विक्रीच्या आकडेवारीत जूनअखेरच्या तिमाहीमध्ये ३७ टक्के वाढ झाली. मात्र या कालावधीत नफा स्थिर राहिला. याच तिमाहीत कंपनीला एका कारखान्यात लागलेल्या आगीमुळे ३५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे नफा वाढू शकला नाही. आपल्या दीर्घ मुदतीच्या पोर्टफोलियोमध्ये या समभागाचा समावेश करता येईल. बाजाराच्या घसरणीत ८,००० ते ८,५०० च्या किंमतपट्टय़ात हे समभाग जरूर जमवावेत.

लार्सन ॲड टुब्रो : अभियांत्रिकी बांधकाम क्षेत्रातील या कंपनीच्या तिमाही कामगिरीचे बाजाराने स्वागत केले. कंपनीने सरलेल्या तिमाहीत कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि वस्तुपुरवठय़ात अडथळे अशी दुहेरी आव्हाने असूनही १,७०२ कोटींच्या नफ्याची नोंद केली. गेल्या वर्षांतील तुलनेत ती ४५ टक्के अधिक आहे. कंपनीला मिळणाऱ्या कंत्राटी कामांचा ओघ कायम असल्यामुळे सर्वच विश्लेषकांनी कंपनीमधील गुंतवणूक कायम राखण्याचा सल्ला दिला आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजी : ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी वाहन उद्योगांना तांत्रिक सेवा पुरविते. कंपनीने पहिल्या तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. गेल्या वर्षांच्या तुलनेत महसुलामध्ये २० टक्के, तर नफ्यात ४५ टक्के वाढ साधली आहे. कंपनी त्यांच्या २५ मोठय़ा ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत महसूल अशा ग्राहकांच्या कार्यादेशातूनच मिळतो. वाहननिर्मिती आणि विशेष करून विद्युत (इलेक्ट्रिक), स्वयंचलित वाहनांच्या जडणघडणीत सॉफ्टवेअरचा वाटा वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या सहभागासाठी केपीआयटीचे समभाग घसरणीच्या काळात घेण्यासारखे आहेत.

जगभरातील मध्यवर्ती बँकांचे व्याज दरवाढीचे धोरण अंगीकारून महागाई नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच जागतिक आर्थिक मंदी येण्याचे भाकीत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याच भारतामध्ये अशी मंदी येण्याची शक्यता जवळजवळ नसल्याचे म्हटले आहे. मूलभूत कच्च्या मालाच्या किमती आटोक्यात येत आहेत. कंपन्यांना त्याचा फायदा होईल. भारतात महागाईचे प्रमाण कमी झाले तर उत्पादनांची मागणी वाढून अर्थव्यवस्था गतिशील राहील. रिझव्र्ह बँकेकडून रेपोदरात ०.३५ टक्क्यांनी वाढवले जाण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीची शक्यता अमेरिकेत आणि भारतातही गुंतवणूकदारांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या तेजीला खीळ बसण्याचे कोणतेही मोठे कारण सध्या दिसत नाही. मात्र या जर-तरच्या गोष्टी प्रत्यक्षात कशा घडतात हे पाहावे लागेल. तेजी-मंदीच्या लाटा येतच राहतील. अस्थिरता हा बाजाराचा स्थायिभाव असतो. त्यामुळे प्रत्येक तेजीच्या लाटेत थोडा नफा बाजूला काढायलाच हवा तरच मंदीच्या काळात खरेदी करता येईल.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:
अरिवद लिमिटेड, बजाज कन्झ्युमर, आयटीसी, कन्साई नेरोलॅक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ इंडिया, यूपीएल, त्रिवेणी टर्बाईन, बॉश, दीपक नाईट्राईट, गोदरेज प्रॉपर्टीज, गुजरात गॅस, इंडस टॉवर, आयॉन एक्सचेंज, जे कुमार, सिमेन्स, थरमॅक्स, व्होल्टास, केईसी, डाबर व अदानी समूहातील कंपन्या जून तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
जुलै महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाची आणि वाहन विक्रीसंबंधित आकडेवारी रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीकडून रेपो दरवाढीची शक्यता
sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader