सुधीर जोशी
संवत्सर २०७९ ची दिमाखदार सुरुवात झाली. मुहूर्त खरेदीचा असा उत्साह गेल्या चौदा वर्षांनंतर पुन्हा अनुभवायला मिळाला. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सुमारे १ टक्क्याने वधारले. सलग पाचव्या वर्षी मुहूर्ताच्या दिवशी बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. मात्र चारच दिवस झालेल्या व्यवहारात मासिक सौदा पूर्तीचा दबाव असल्यामुळे बाजार दोलायमान होता. रिझव्र्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या मध्यावधी बैठकीमुळे बाजाराने सावध पवित्रा घेतला होता. मात्र जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि मारुती सुझुकीचे दमदार तिमाही निकाल यामुळे बाजारात उत्साह भरला. परदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा एकदा बाजाराला साथ मिळू लागली आहे.
अल्ट्राटेक सिमेंट :
सध्याच्या काळात गृह निर्माण क्षेत्रात वाढलेली मागणी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नवीन रस्ते प्रकल्पांमुळे सिमेंटची मागणी पुढील दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढेल. त्यासाठी सर्व कंपन्यांनी विस्तार योजना आखल्या आहेत. अदानीसारखा मोठय़ा उद्योग समूहाने यात उडी घेतली आहे. अल्ट्राटेक सिमेंट ही भारतातील सर्वात मोठी कंपनी यात मागे राहणे शक्य नाही. या कंपनीदेखील आपली क्षमता सध्याच्या ११६ दशलक्ष टनांवरून १३१ दशलक्ष टनांवर नेत आहे. या वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक तुलनेत कंपनीची विक्री १५.६ टक्क्याने वाढली. मात्र नफ्यामध्ये मात्र ३१ टक्क्यांची घट झाली. याला वाढलेले इंधनाचे दर हे प्रमुख कारण होते. सध्या एकूण उत्पादन क्षमतेचा ७६ टक्के वापर होत आहे, जो पुढे वाढून नफा क्षमता सुधारण्यास हातभार लावेल. निकालानंतर समभागात झालेली घसरण सध्याच्या खरेदीवर वर्षभरात २० टक्के वाढीची संधी देऊ शकेल.
आयसीआयसीआय बँक:
बँकेने दुसऱ्या तिमाहीचे दमदार निकाल जाहीर करून परत एकदा खासगी क्षेत्रातील आपले दुसरे स्थान बळकट केले. बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ३७ टक्क्यांनी वाढला. रिटेल क्षेत्रातील नफा सक्षम कर्जामध्ये झालेल्या वाढीमुळे व्याजरूपी नक्त मिळकतीचे प्रमाण ४.०१ टक्क्यांवरून ४.३१ टक्के झाले. बुडीत कर्जाचे प्रमाणही कमी झाले. बँकेकडे किरकोळ ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात असलेली बचत खाती आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने झालेले सेवांचे सबलीकरण यामुळे बँकेचा कासा रेशो उत्तम आहे. सध्या समभागाने केलेल्या विक्रमी चढाईनंतर थोडय़ा घसरणीची संधी घेऊन एक-दोन वर्षांच्या मुदतीसाठी बँकेचे समभाग घेणे फायद्याचे ठरेल.
अतुल लिमिटेड:
या रसायने बनविणाऱ्या कंपनीच्या उलाढालीमध्ये दुसऱ्या तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच नफा १३ टक्क्यांनी वधारला आहे. वाढलेल्या उत्पादन घटकांच्या किमती आणि वाहतूक खर्चामुळे या आधीच्या काळात कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला होता. जगातील मोठय़ा कंपन्यांकडून वाढणाऱ्या मागणीचा आणि भारताकडे उत्पादन घटकांचा चीननंतरचा दुसरा मोठा पुरवठादार म्हणून पाहण्याच्या धोरणाचा कंपनीला फायदा मिळेल. कंपनीने आतापर्यंत ६०० कोटी रुपये विस्तार योजनेवर खर्च केले आहेत. येत्या दोन वर्षांच्या कालावधीत आणखी एक हजार कोटी खर्च होणार आहेत. त्याचा फायदा उत्पादन घटकांची किंमत कमी करण्यावर होईल. कंपनीचा नफा गेल्या दहा वर्षांत ८० कोटींवरून ६०८ कोटींपर्यंत वाढला आहे. सध्या घसरलेल्या भावात गुणवणुकीची संधी आहे.
भारताकडे असलेल्या जमेच्या बाजू म्हणजे मोठी लोकसंख्या, गेले काही वर्षे असणारे स्थिर सरकार आणि तरुण आणि कमावत्या वर्गाचा लोकसंख्येतील मोठा वाटा. जगाच्या १८ टक्के असणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करताना कंपन्यांना मागणीचा तुटवडा भासत नाही. वाढणाऱ्या डॉलरच्या मूल्यामुळे इंधन खर्च वाढत असला तरी माहिती तंत्रज्ञान कंपन्या परकीय चलन मिळवून त्याची भरपाई करत असतात. सध्याचे सरकार उद्योगांना पूरक अशी अनेक आर्थिक धोरणे राबवत आहे, त्याचादेखील फायदा कंपन्यांना मिळतो आहे. सध्या जभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी व्याजदर वाढ परदेशी गुंतवणूकदारांना उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधून गुंतवणूक काढून घेण्यास भाग पाडते आहे. मात्र ही दरवाढ पुढील सहा महिन्यांत स्थिरावेल, अशी आशा आहे. त्यानंतर परदेशी गुंतवणूकदार परत येतील आणि बाजाराला मोठा हातभार लावतील. त्यामुळे सध्या पोर्टफोलियोमध्ये चांगले समभाग जमविण्याची आणि संयम राखण्याची गरज आहे. या सप्ताहात अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्र्हकडून पाऊण टक्क्यांची दरवाढ अपेक्षित आहे. रिझव्र्ह बँकेकडूनदेखील व्याजदर वाढीचे अतिरिक्त पाऊल उचलले जाते का, याकडे बाजाराचे लक्ष राहील.
येत्या सप्ताहातील महत्त्वाच्या घडामोडी
* टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, कॅस्ट्रॉल, लार्सन अॅण्ड टुब्रो, सारेगामा, ईआयएच हॉटेल्स, कन्साई नेरोलॅक, चंबळ फर्टिलायझर्स, सन फार्मा, टाटा पॉवर, टेक मिहद्र, यूपीएल, व्होल्टास, ग्राइंडवेल नॉर्टन, जेके पेपर, कजारिया, रेमंड, टायटन, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक अशा अनेक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
* सप्टेंबर महिन्यांतील वाहन विक्री आणि वस्तू व सेवाकर (जीएसटी) संकलनाचे आकडे.
* रिझव्र्ह बँकेच्या पत धोरण समितीची विशेष बैठक
sudhirjoshi23@gmail.com