नांव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे
अवघा मुहुर्त शकून, हृदयी मारुतीचे ध्यान
जिकडे तिकडे भक्त, पाठी जाय हनुमंत
राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी
दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदयी धरा
समर्थ रामदास
‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ असा उपदेश करणारे समर्थ, मुहूर्ताला अवास्तव महत्व न देता ‘मारुतीचे नाव घेऊ तो मुहूर्त’ असे नि:संदिग्घपणे या अभंगातून सांगत आहेत. बाजारातसुद्धा ‘सेन्सेक्स’मधील मारुती सुझुकी, मिहद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर यासारख्या दिग्गज कंपनी समभाग घेण्यासाठी तुमच्या – माझ्या सारख्या लहान गुंतवणूकदारांना इच्छा होणे महत्वाचे आणि तीच उत्तम खरेदीची संधी. याच भावनेने ५२ आठवडय़ांचा उच्चांकी दराची शुक्रवारी नोंद केलेली कंपनी भेटीला आणली आहे.
मारुती सुझुकी इंडिया ही सुझुकी कॉर्पोरेशन, जपान या कंपनीची भारतातील उपकंपनी असून देशातील ५०% हून अधिक विक्री मारुतीच्या मोटारींची होते. मारुतीचे गुरगांव येथे तीन कारखाने असून एकत्रित उत्पादन वर्षांला ९ लाख गाडय़ा असून मानेसर येथे दोन कारखाने आहेत. या दोन कारखान्यातून वार्षकि ५.५ लाख तयार होतात. भारतात २८ प्रवासी मोटारनिर्माते आहेत. मारुतीची तब्बल १७ मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत व प्रत्येक मोडेलमध्ये कमीत कमी पाच प्रकार आहेत.
भारत हा एक प्रमुख वाहन निर्यातदार देश आहे. उदाहणादाखल सांगायचे तर फोर्डच्या चेन्नईच्या कारखान्यातील २०% उत्पादन निर्यात होते. हिच गोष्ट कमी अधिक प्रमाणात सर्वच वाहन निर्मात्यांच्या बाबतीत आहे. अमेरिकेच्या रस्त्यावरून चाकण येथे जुळणी झालेली ‘मर्सडीझ’ धावते तर घानाच्या रस्त्यावरून ‘टाटा इंडिका’ मार्गक्रमण करत असते. मध्य-पूर्वेत जवळजवळ प्रत्येक देशात सुझुकी मोटर्सची भारतात जुळणी झालेली ‘स्विफ्ट’ सहज नजरेस पडते. अनेक मोटार उत्पादक पुरवठा साखळीतील (Supply Chain) महत्वाचा घटक म्हणून भारताकडे पाहत आहेत. भारतीय बाजारपेठेत लहान प्रवासी वाहनाचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. मारुती-८००, अल्टो-८००, ह्युंदाई सॅन्ट्रो, फोर्ड फिगो, शेव्र्हले बीट या सर्व लहान मोटारी बाजारपेठेचा हिस्सा व्यापून आहेत. जागतिक दर्जाची प्रवासी वाहन निर्माती कंपनी जेव्हा भारतीय बाजार पेठेत पाऊल ठेवते तेव्हा भारतीय बाजारपेठेची आवड लक्षात घेऊन लहान वाहने खास येथील बाजारपेठेसाठी तयार करण्यात येतात. बाजारपेठेचा विचार करता प्रवासी वाहने सहा उपगटात विभागली आहेत. त्यापकी लहान गाडय़ा या व्यवसायवृद्धीस कारणीभूत ठरल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी एकूण वाहनाच्या विक्रीच्या ६५% हून अधिक हिस्सा असणारी या वाहनांच्या गटाची टक्केवारी टप्या-टप्याने कमी होत आता ५०% हून कमी झाली आहे. ओम्नी, आल्टो-८००, वॅगनआर या मोटारींचा खप घटला आहे. मारुतीकडे ओम्नी (रु. २.५० लाख) ते ग्रँड व्हिटारा (रु. २२ लाख) इतक्या विस्तृत वाहन उत्पादन मालिका आहेत.
वाहन उद्योग क्षेत्रासाठी गेली तीन वष्रे अतिशय खडतर ठरली आहेत. त्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. एक म्हणजे पेट्रोलच्या किंमती सरकारने नियंत्रणमुक्त केल्या. याचा परिणाम म्हणजे डिझेल इंधन असलेल्या वाहनांच्या विक्रीत २२% वाढ झाली. सध्या मारुती स्विफ्टसारख्या डिझेल व पेट्रोल दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध असलेल्या मोटारींच्या विक्रीत डिझेल वाहनाचा खप ६०% च्या वर गेला तर इंडिकामध्ये डिझेलचे इंधन असलेल्या वाहनाच्या विक्रीचे प्रमाण ९५% आहे. आता पुन्हा डिझेलच्या किंमती मर्यादित नियंत्रण मुक्त केल्यामुळे विक्रीत वाढ घटत जाईल.
दुसरे कारण म्हणजे व्याजाचे वाढलेले दर. रेपो दरात वाढ व रोख राखीव प्रमाणात वाढ केल्यामुळे पतपुरवठय़ात कपात झाली. याचा परिणाम विक्री घटली. ए-१ श्रेणीतील मोटारींची ९२% विक्री कर्ज पुरवठय़ाच्या आधारावर होते. तर ए-२ गटाच्या मोटारींची ८५% विक्री कर्ज पुरवठय़ावर होते. लहान मोटारींच्या विक्रीत डिसेंबर महिन्यात वार्षकि १.३६% घट झाली आहे. लहान मोटारींमध्ये डिझेल गाडय़ा फारशा उपलब्ध नाहीत. या गटात मारुतीचे निर्वविाद वर्चस्व आहे. कामगार आंदोलनामुळे गेल्या वर्षांत दोन वेळा मारुतीच्या मानेसर कारखान्यात पुरवठा विस्कळीत झाला होता. याचा परिणाम मारुतीच्या समभाग मूल्यावर पडला आहे. डिसेंबरमधील मारुतीचे विक्रीचे आकडे पाहिले तर कंपनीने मोटारींच्या संख्येत ३% वार्षकि वाढ दर्शविली आहे. ही वाढ मानेसर कारखान्याचे १,९०० मोटारी प्रती दिन इतक्या निम्न पातळीवर जाऊनसुद्धा झाली हे विचारात घेण्यासारखे आहे. हे उत्पादन कामगार आंदोलानानंतरचे सर्वात कमी प्रती महिना उत्पादन आहे. येत्या तिमाहीत हा कारखाना सरासरी २,४०० मोटारी प्रती दिन ही आंदोलन पूर्वीचा टप्पा गाठेल. ऑक्टोबर महिन्यात नवीन अल्टो ८०० विक्रीला आणूनदेखील मिनी गटात अल्टो ८०० व ओम्नी या दोन गाडय़ांच्या विक्रीत वार्षकि १५% तर मासिक १८% घट झाली. व्याजदर कपातीनंतर या दोन गाडय़ांची विक्री वाढेल. (हे दोन्ही मॉडेल सर्वाधिकसंख्येने विक्री असणारे आहेत) जेणे करून कारखान्याची उत्पादन क्षमता वापरली जाईल.
पेट्रोलच्या किंमती नियंत्रणाबाहेर ठेवल्यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा खप १७% कमी झाला. आता दर महिन्याला डिझेलच्या किमतीत वाढ होणार असल्यामुळे येत्या दोन तीन वर्षांत हा कल उलट झालेला दिसेल. ग्राहक पुन्हा पेट्रोलच्या म्हणजे मारुतीच्या वाहनांकडे वळणे क्रमप्राप्त आहे. तसेच कॉम्पॅक व मिड साईझ श्रेणीतील वाहनांच्या किंमतीतील दोन वर्षांपूर्वीचा व आजचा यामधला फरक कमी होत असल्यामुळे मारुतीच्या (स्विफ्ट, डिझायर, एसएक्स४) या गटात जास्त मोटारी येत्या दोन वर्षांत विकल्या जातील. या गाडय़ांत प्रती गाडी नफ्याचे प्रमाण (Contribution) जास्त असल्यामुळे व नफ्याचे जास्त प्रमाण असणारया गाडय़ा जास्त विकल्या जाण्याच्या प्रमाणात (Product Mix ) सकारात्मक बदल झाले आहेत. येत्या सहा महिन्यात मारुतीची नफा क्षमता २०-२५% सुधारणे अपेक्षित आहे. त्यानंतर तीन ते चार वर्ष सुधारत राहिल. म्हणून पुढील चार ते पाच वष्रे आपल्या गुंतवणुकीत ठेवण्यासाठी हा शेअर घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
मारुती सुझुकी इंडिया
दर्शनी मूल्य : रु. ५
बंद भाव : रु १,६००.२० (२४ जाने.)
वर्षांतील उच्चांक : रु. १,६०७.६५
वर्षांतील नीचांक : रु. १,०५१.००
गुंतवणूकभान : ‘सदा मारुती हृदयी धरा’
नांव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे अवघा मुहुर्त शकून, हृदयी मारुतीचे ध्यान जिकडे तिकडे भक्त, पाठी जाय हनुमंत राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदयी धरा समर्थ रामदास
आणखी वाचा
First published on: 28-01-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki india