अजय वाळिंबे
अनेकदा आपल्याला ब्रॅण्ड्स माहिती असतात. परंतु तो कुठल्या कंपनीचा ब्रॅण्ड आहे हे माहित नसतं. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या इमामी कंपनीकडे बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेन्थोप्लस बाम, फास्ट रिलीफ आणि केश किंग यासारख्या घरगुती ब्रॅण्ड नावांचा हेवा करण्याजोगा परिपूर्ण गुच्छ आहे. इमामी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य आणि वेगाने वाढणाऱ्या वैयक्तिक निगा आणि आरोग्य निगा उत्पादने पुरवणारी आघाडीची कंपनी आहे.
कंपनीकडे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनवर आधारित ३०० पेक्षा जास्त उत्पादनांचा पोर्टफोलिओ असून इमामीच्या सध्याच्या बाजारपेठांमध्ये सार्क, आफ्रिका, आखाती देश, पूर्व युरोप आणि राष्ट्रकुल देशांसह ६० हून अधिक देशांचा समावेश आहे. जगभरात कुठे ना कुठे तरी प्रत्येक सेकंदामागे इमामीची जवळपास १२१ उत्पादने विकली जात असतात. समूहाची प्रमुख कंपनी इमामी लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षांत ३,१९२ कोटी रुपयांची उलाढाल केली होती.
इमामीने आपल्या व्यवसाय विस्तारीकरणासाठी २००८ मध्ये झंडू हा हेरिटेज ब्रॅण्ड व्यावसायिक समन्वयावर आधारित घेतल्यानंतर २०१५ मध्ये ‘केश किंग’चा आयुर्वेदिक केस आणि स्कॅल्प व्यवसायदेखील विकत घेतला. जानेवारी २०१९ मध्ये, कंपनीने क्रेम-२१ हा जर्मन ब्रॅण्डदेखील विकत घेतला. तर यंदाच्या वर्षांत कंपनीने भारतातील अग्रगण्य प्रिकली हीट आणि कूल टाल्क ब्रॅण्डपैकी एक ‘डर्मीकूल’ विकत घेतले. कंपनी आपली विविध उत्पादने २८०० हून अधिक वितरकांच्या नेटवर्कद्वारे ४९ लाख रिटेल विक्रेत्यांपर्यंत पोहोचते करते. इमामीचे भारतात ७ उत्पादन प्रकल्प असून भारतभर २६ वितरण केंद्रे, ४ प्रादेशिक कार्यालये, ५ आंतरराष्ट्रीय कार्यालये, १ परदेशी युनिट, ८ परदेशी उपकंपन्या आहेत.
गेल्या तिमाहीत ७७८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७३ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या या कंपनीचे सप्टेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल शुक्रवारी, ११ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. सध्या मंदीसदृश वातावरण असले तरीही एफएमसीजी कंपन्या आगामी कालावधीत उत्तम कामगिरी करून दाखवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अत्यल्प बिटा असलेल्या इमामीचा एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करायला हरकत नाही.