डॉ. आशीष थत्ते
उद्योगांमध्ये कच्चा माल, उत्पादन आणि वितरण व्यवस्था अशी एक साखळी असते. कंपन्या ज्याप्रमाणे आपल्या वितरण व्यवस्थेमध्ये शिरतात त्याचप्रमाणे आपला कच्चा माल बनवण्याच्या व्यवस्थेमध्येदेखील कार्यरत होऊन नफा अधिक वाढण्याचा प्रयत्न करतात. त्यात कच्च्या माल पुरवणाऱ्या विविध कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचादेखील त्यांचा विचार असतो किंवा स्पर्धात्मक फायदा मिळवणे हेदेखील उद्दिष्ट असू शकते. यात स्वत:च कच्चा माल बनवणे किंवा कच्चा माल बनवणारा एखादा उद्योग ताब्यात घेण्याचा समावेश असतो. कपडे बनवणाऱ्या कंपनीने सूतगिरणीमध्ये गुंतवणूक करणे, जगप्रसिद्ध फर्निचर बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनीने चक्क जंगल विकत घेणे, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्या आता फक्त व्यासपीठ न राहता स्वत:चे सिनेमेसुद्धा बनवतात, टायर बनवणाऱ्या कंपन्या स्पर्धात्मक फायद्यासाठी स्वत:च नायलॉन बनवतात, वाहन निर्माता कंपन्या स्वत:च रबराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून उत्पादक घटकांची कमतरता निर्माण होऊ नये.
पूर्व उद्योगाचे एकीकरण करणे हे महत्त्वाचे उद्धिष्ट राखणारी भारतात बरीच उदाहरणे आहेत. यात बरेचसे उद्योग व्यवसाय ते व्यवसाय असा व्यवहार करत असल्यामुळे फारसे प्रकाशझोतात येत नाहीत. कॉफी किंवा चहाचा उद्योग करणारे बरेचशे उद्योग चक्क चहा-कॉफीचे मळेदेखील विकत घेतात. सॉफ्टवेअर वितरित करणाऱ्या कंपन्या स्वत:च सॉफ्टवेअर बनवतात, रसायनांच्या कंपन्या त्यांच्याशी संबंधित कच्चा माल बनवणाऱ्या उद्योगांचे अधिग्रहण करण्यासाठी उत्सुक असतात आणि व्यवसायवृद्धी करतात.
आपणदेखील हल्ली हे तंत्र शिकलो आहे. आमच्या घरी समारंभ आला म्हणजे माझ्याच पोटात गोळाच येतो. माझी वहिनी अजिबात श्रीखंड विकत आणू देत नाही. चक्का, साखर आणि केशर घालून केलेले घरचे श्रीखंड हे आमचे पूर्व उद्योग एकीकरणच. मसाले घरी बनवणे हेदेखील एक उदाहरण. काही वर्षांपूर्वी किंवा अजूनदेखील घराच्या सज्जामध्ये भाज्या लावणे आणि त्या स्वत:च स्वयंपाकात वापरतो. २० ते २५ वर्षांपूर्वी इडली आणि डोसा महाराष्ट्रीयांना फक्त हॉटेलातच मिळायचा पण हल्ली डोशाचे पीठ सर्रास दुकानात उपलब्ध असल्यामुळे आपण घरीसुद्धा सहजतेने बनवतो. एकेकाळी पॉट आइस्क्रीम बनवणे किती छान असायचे, मात्र हल्ली आपण ते विसरूनच गेलो आहोत. तयार पापड आणि लोणची बाजारात बरीच मिळतात, पण घरी लाटून केलेल्या पापडाची आणि घरच्या मुरलेल्या लोणच्याची चव काही वेगळीच असते. दुकानात मिळणाऱ्या दही आणि ताकापेक्षा लोकांचा कल घरी तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थामध्ये वाढू लागला आहे. पूर्वी दाढी ठेवणे तसा वेळकाढू आणि खर्चीकच प्रकार, पण नवीन आणि चांगल्या दाढी करणाऱ्या यंत्रांमुळे घरच्या घरी ते सहज होते. तसेच काही हेअरडायबाबत आहेत. माझा फोटो बघून तसा तुम्हाला अंदाज आलाच असेल. महिलांना पूर्वी फेशिअलसाठी सौंदर्य प्रसाधन केंद्रात जायची गरज होती आता ते काही उत्पादनांच्या मदतीने घरच्या घरीदेखील शक्य आहे. ज्यांना विकतचे पीठ आवडत नाही ते घरघंटी घरीच आणून पिठाच्या गिरणीवरचे अवलंबित्व कमी करतात. म्हणजे आपणसुद्धा पूर्व उद्योग एकीकरण अवलंबले आहे अगदी उद्योगांसारखे भव्य दिव्य नाही पण घरच्या घरी नक्कीच.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail.Com
@AshishThatte