*  प्रश्न: मला चारकोपमध्ये एप्रिल १९९६ मध्ये म्हाडाच्या घराची लॉटरी लागली. त्यानंतर ऑक्टोबर २००५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले घरासाठी एकूण खर्च २,९०,००० रुपये झाला, ते घर मी मार्च २०१६ मध्ये २८ लाख रुपयांना विकले. त्यापैकी २,०६,००० रुपये गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले. बाकीची रक्कम बँकेत ४५ दिवसांच्या मुदत ठेवींमध्ये ठेवली आहे. मला सप्टेंबर, २०१७ मध्ये माझ्या नावे नवीन घर विकत घ्यावयाचे आहे. या घरासाठी मला घर विक्रीतून मिळालेले पैसे आणि पतीच्या नावे गृहकर्ज घेणार आहे. माझे प्रश्न असे आहेत की नवीन घर घेईपर्यंत हे पैसे बँक, मुचुअल फंडात गुंतवले तर चालेल का? यावर मिळणारे व्याज करपात्र होईल का? पतीने नवीन घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाची वजावट घेता येईल का?

– नयना मोरवेकर, चारकोप

उत्तर : मार्च २०१६ मध्ये विकलेल्या घरावर दीर्घ मुदतीचा नफा होईल यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर २००५ पासूनचा कालावधी गणला जाईल. या घरावर आपल्याला झालेला दीर्घमुदतीचा नफा हा खालीलप्रमाणे:

घराची विक्री किंमत: २८,००,००० रु.

घरासाठी बांधकाम खर्च:२,९०,००० रु.

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :

२००५-०६चा महागाई निर्देशांक-  ४९७

२०१५-१६चा महागाई निर्देशांक- १०८१

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य : २,९०,००० ७ १०८१ रु  ४९७

* ६,३०,७६५ रुपये दीर्घ मुदतीचा भांडवली नफा: २१,६९,२३५ रुपये

या दीर्घ मुदतीच्या नफ्यावर कर वाचवायचा असेल तर या रकमेएवढी गुंतवणूक नवीन घरात करावी लागेल. नवीन घर आपल्याला दोन वर्षांच्या आत विकत घ्यावे लागेल. (घर बांधून घेणार असल्यास तीन वर्षांच्या आत!) म्हणजेच आपल्याला नवीन घर मार्च २०१८ पर्यंत (किंवा बांधून घेतले तर मार्च २०१९ पर्यंत) घेणे गरजेचे आहे. आपण सप्टेंबर २०१७ मध्ये नवीन घर घेणार आहात म्हणजेच मुदतीत घेणार आहात.

नवीन घरात गुंतवणूक करण्यापूर्वी हे पैसे आपल्याला बँकेत भांडवली नफा खात्यात (कॅपिटल गेन अकाऊंट स्कीम, १९८८) मध्ये जमा करावे लागतील. हे खाते आपल्याला त्या वर्षांचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी म्हणजेच ३१ जुलै २०१६ पूर्वी उघडून त्यात भांडवली नफ्याची रक्कम म्हणजेच २१,६९,२३५ इतकी रक्कम जमा करावी लागेल. या खात्यातून आपल्याला नवीन घरासाठी बिल्डर किंवा घर विक्री करणाऱ्याला पैसे द्यवे लागतील. या खात्यावरील व्याज हे करपात्र आहे. गृहकर्जावर व्याज आणि मुद्दल रकमेवर मिळणाऱ्या कर सवलती स्वत:च्या घरासाठी मिळतात. घर जर दुसऱ्याच्या नावाने असेल तर या सवलती मिळत नाहीत.

 

* प्रश्न: माझ्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर माझ्या आईला विम्याचे पैसे मिळाले हे पैसे तिने बँकेत मुदत ठेवीत गुंतविले यावर मिळणाऱ्या व्याजावर उद्गम कराची (ळऊर) वजावट होऊ नये यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल? माझ्या आईला ७,६०० रुपयांचे मासिक निवृत्ती वेतन मिळते. बँकेतून व्याजापोटी तिला १,५०,००० रुपये मिळतात, या शिवाय तिचे कोणतेही उत्पन्न नाही.

  – प्रतीक चव्हाण, जालना.

उत्तर : आपल्या आईचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर फॉर्म १५ जी भरावा लागेल आणि वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर फॉर्म १५ एच भरावा लागेल.

 

*  प्रश्न: माझे वय ७५ वर्षे आहे. मला आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये १,८५,००० रुपये निवृत्ती वेतन मिळाले आहे. मला शेतीचे ६,००० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवर २५,००० रुपये इतके व्याज मिळाले आहे. मी बँकेला १५ एच फॉर्म भरून दिला आहे. तसेच माझ्या पत्नीच्या नावे (ज्येष्ठ नागरिक) बँकेत मुदत ठेवी आहेत, त्यांनासुद्धा २५,००० रुपये व्याज मिळते आणि त्यांना शेतीचे ७०,००० रुपये एवढे उत्पन्न मिळते. मला आणि पत्नीला विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का?

  –  निखिल खडके, जळगाव. 

उत्तर : आपले उत्पन्न आणि आपल्या पत्नीचे उत्पन्न ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा (३ लाख रुपयांपेक्षा) कमी असल्यामुळे प्राप्तिकर भरावा लागणार नाही आणि विवरणपत्र भरणे गरजेचे नाही.

 

*  प्रश्न: मी एका घरासाठी गृहकर्ज घेतले आहे. आणि त्याचा हप्ता माझ्या पगारातून कापला जातो. माझे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनीसुद्धा दुसऱ्या घरासाठी गृहकर्ज घेतले आहे. आम्हाला दोघांना व्याज आणि मुद्दल परतफेडीची वजावट मिळू शकेल का?

–  सुजाता खोपकर, ठाणे.

उत्तर : गृहकर्जाच्या व्याज आणि मुद्दल परतफेडीची उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी प्रामुख्याने दोन अटींची पूर्तता करावी लागते. घर आपल्या नावाने असणे आणि त्या घराचा ताबा घेतला असला पाहिजे. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे पती आणि पत्नी हे दोन वेगळे करदाते असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाची वजावट घेता येईल.

 

* प्रश्न: मला माझ्या मित्राने माझ्या वाढदिवसाला २५,००० रुपये भेट दिले. मला या भेटीवर कर भरावा लागेल का?

  – हितेश जाधव (ई-मेलद्वारे)

उत्तर : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे ५०,००० रुपयांपर्यंतच्या भेटीवर कर भरावा लागत नाही. आपल्या मित्राने दिलेली २५,००० रुपयांची भेट ही करपात्र नाही. ही ५०,००० रुपयांची मर्यादा एकूण भेटीवर आहे. म्हणजेच समजा आपल्याला दुसऱ्या मित्राने ३०,००० रुपये भेट दिले तर आपल्याला एकूण भेट ५५,००० रुपये मिळाली तर या संपूर्ण भेटीवर आपल्याला कर भरावा लागेल.

 

*  प्रश्न: माझे वार्षिक उत्पन्न ४,८०,००० रुपये आहे. मी गेल्या काही वर्षांपासून नियमित कर भरत आहे. मला २०१५-१६ रोजी कर्करोगाचे निदान झाले. या उपचारासाठी खर्च झालेले ६७,००० रुपये मेडिक्लेम विम्यामुळे विमा कंपनीकडून परत मिळाले. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्येही अंदाजे २ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे व त्याचीही विम्याद्वारे भरपाई मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम करपात्र आहे का?

  –  संदीप घोडेकर, वांद्रे

उत्तर : विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईची रक्कम ही करपात्र नाही. उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची परतफेड विमा कंपनी करते. यामध्ये कोणताही नफा नसतो, त्यामुळे ही रक्कम उत्पन्नात गणली जात नाही.

 

*  प्रश्न: मी आमच्या गावातील एका सेवाभावी संस्थेला १०,००० रुपयांची देणगी दिली आहे. मला या देणगीची उत्पन्नातून वजावट मिळू शकेल का? आणि किती मिळेल?

– संदेश कुलकर्णी (ई-मेलद्वारे)

उत्तर : सेवाभावी संस्थेची जर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० जी अंतर्गत नोंदणी झाली असेल आणि त्यांनी तसे प्रमाणपत्र किंवा त्याचा क्रमांक पावतीवर दर्शविला असेल तर आपणाला एकूण देणगीच्या ५०% इतकी रक्कम म्हणजेच ५,००० रुपये उत्पन्नातून वजावट मिळू शकेल.

 

*  प्रश्न: मी माझ्या वडिलांच्या, भावाच्या, पत्नीच्या आणि मुलांच्या नावाने जीवन विम्याच्या पॉलिसी घेतल्या आहेत. आणि एकूण विमा हप्ता १,७५,००० रुपये इतका भरतो. मला कलम ८० सीनुसार किती वजावट मिळू शकेल?

– करण राणे

उत्तर : कलम ८० सीनुसार उत्पन्नातून वजावटीची कमाल मर्यादा १,५०,००० रुपये इतकी आहे. या कलमानुसार स्वत:च्या, पती किंवा पत्नीच्या आणि मुलांच्या नावे घेतलेल्या जीवन विमाच्या हप्त्याची उत्पन्नातून वजावट मिळते. वडिलांच्या आणि भावाच्या नावाने घेतलेल्या जीवन विमाच्या हप्त्याची उत्पन्नातून वजावट मिळत नाही.

 

प्रवीण देशपांडे
लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत. वाचकांना प्रश्न पाठविण्यासाठी
ई-मेल : pravin3966@rediffmail.com

 

 

 

 

 

Story img Loader