टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल या दोन कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याचं दिसून येतं. २०१०मध्ये जेव्हा अॅपलनं स्पत:ला जगातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून प्रस्थापित केलं, तेव्हापासूनच या दोन्ही कंपन्यामध्ये ही स्पर्धा सुरू झाली. २०२०मध्ये अॅपल ही अमेरिकेतील वॉल स्ट्रीट शेअर बाजारातली सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी ठरली होती. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, मायक्रोसॉफ्टनं अॅपलला मागे टाकत सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी अर्थात Most Valuable Company असल्याचा मान मिळवला आहे. गेल्या वर्षभरात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये तब्बल ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि याला करोनाची साथ कारणीभूत ठरल्याचं जाणकारांचं मत आहे.
गेल्या दीड वर्षात जगभरात करोनाच्या साथीनं थैमान घातलं आहे. यामुळे मोठ्या संख्येने कंपन्या आणि कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला. परिणामी मायक्रोसॉफ्टकडून पुरवण्यात येणाऱ्या क्लाऊड स्पेससारख्या सेवांना प्रचंड मागणी वाढली. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून आलं. मायक्रोसॉफ्टचे शेअर्स वर्षभरात ४५ टक्क्यांनी वाढण्यामध्ये करोना साथीच्या काळात क्लाऊड स्पेस सुविधांची वाढलेली मागणी एक महत्त्वाचं कारण ठरल्याचं सांगितलं जातं.
गेल्या तिमाहीमध्ये मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये ४.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचं बाजारमूल्य थेट २.४२६ ट्रिलियन डॉलर्स इतकं वाढलं आहे. याच तिमाहीमध्ये अॅपल पलनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचं बाजारमूल्य २.४६२ ट्रिलियन डॉलर्स इतकं आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ही आता सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी ठरली आहे.