ही हिरकणी मराठवाडय़ात जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे. त्या घरातील थोरल्या असल्याने कुटुंबाची आíथक जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावरच आहे. त्यांचे वडील पोलीस कोतवाल आहेत.
आई गृहिणी असून पाठचा एक भाऊ (२१) व बहिण (२२) हे पुण्यात शिकत आहेत. ही दोन भावंडे नागरी सेवा परिक्षेची तयारी करत आहेत. हिरकणीला वजावटीपश्चात मासिक २९,००० वेतन मिळते.
शासकीय निवासस्थान अद्याप न मिळाल्याने त्या एका महिला अधिकाऱ्याबरोबर नोकरीच्या ठिकाणी खोली घेऊन राहत आहेत. आपल्या वेतनातील ठरावीक रक्कम त्या आईला घर खर्चासाठी देतात.
त्या अंदाजे दरमहा १५ हजार बचत करू शकतात. त्यांनी ‘पीएलआय (पोस्टल लाईफ इन्शुरन्स) संतोष’ व ‘एलआयसी’ची ‘जीवन आनंद’ या दोन योजना घेतल्या होत्या; परंतु त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत हप्ता भरण्यात अडचणी आल्याने त्या सध्या बंद आहेत.
आíथक नियोजनाची नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नसल्याने त्यांनी नियोजन मार्गदर्शनाची विनंती केली. भविष्यात पुणे परिसरात घर घेण्याची त्यांची इच्छा आहे.
हे घर घेण्यासाठी निदान २० टक्के रक्कम जमा करावी (अंदाजे १० लाख रुपये) हे त्यांचे प्रमुख वित्तीय ध्येय आहे. जेव्हा सवड होईल तेव्हा त्यांना परदेशात पर्यटनाला जायला आवडेल; हे त्यांचे दुसरे वित्तीय ध्येय आहे.
हिरकणीला सल्ला :
साधरणत: तुमच्या वयोगटातील मंडळी व्यावसायिक वित्तीय नियोजकाकडे जाण्यापेक्षा आपल्या वित्तीय उद्दिष्टांशी फारकत घेणारी पॉलिसी विकत घेतात.
पोलीस दल व महसूल खात्यातील कर्मचारी आपली बचत ही विमा विक्रेत्यांच्या भूलथापांमुळे जीवन विमा विकत घेतात. परंतु आपल्या या बचतीवर परताव्याचा दर ३.५ ते चार टक्के दरम्यान असतो, हे विमा खरेदी इच्छुकास विक्रेते सांगत नाहीत.
हिरकणी घरातील कर्ती आहे. पोलिसांना कर्तव्यावर असताना कायदा व सुव्यवस्था राखताना अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगात जीव धोक्यात घालावा लागतो. मागील तीन महिन्यात कर्तव्याववर असताना दोन पोलिसांचे अपघाती निधन झाल्याच्या बातम्या माध्यमात चíचल्या गेल्या.
पोलिसांचे आरोग्य हा सुद्धा चिंतेचा विषय आहेच. घरातील कर्ता पोलिसात असेल तर त्याला पुरेसे विमा संरक्षण असणे जरुरीचे आहे. नुकतेच पोलीस खात्याने या हिरकणीला िहगोली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दहशतवाद्यांशी सामना करण्याचे प्रशिक्षण दिले.
भविष्यात दहशतवादविरोधी पथकात नेमणूक होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने सर्वच पोलिसांना सुचवावेसे वाटते की, जेव्हा त्यांची बदली दहशतवादविरोधी पथक किंवा बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकात अथवा तत्सम जीवासाठी जोखीम असलेल्या ठिकाणी बदली झाल्यास या कालावधीसाठी तरी मोठय़ा रक्कमेचा विमा घेणे गरजेचे आहे.
हिरकणीच्या नोकरीची अजून ३० वष्रे शिल्लक आहेत. आíथक नियोजनाची सुरुवात किमान ५० लाख विमाछत्र असलेला व ३० वष्रे मुदतीचा विमा घेऊन करणे आवश्यक वाटते.
तुमचे कामाचे स्वरुप पाहता तुम्ही खाजगी विमा कंपन्यांपेक्षा ‘एलआयसी’ची पॉलिसी घेणे योग्य ठरेल. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्यात जीव गमवावा लागलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने केलेला दावा खाजगी विमा कंपन्यांनी सुरवातीला नाकारला होता व ‘एलआयसी’ने मंजूर केला होता. कायदेशीर उपायांनी खाजगी कंपन्या नंतर वठणीवर आल्या व दावा मंजूर केला.
अशा परिस्थितीत हिरकणी यांनी ‘एलआयसी’ची ‘ई टर्म’ ही ५० लाखाचे विमाछत्र ३० वष्रे देणारी पॉलिसी खरेदी करावी. यासाठी वार्षकि ६,००० रुपये हप्ता भरावा लागेल.
आजारपणातील खर्चाचा मर्यादित परतावा देण्याची शासनाची कर्मचाऱ्यांसाठी योजना असली तरी ती पुरेशी नाही व घरी आई-वडिलांसारखी ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणून २ लाखाचे संरक्षण देणारी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी’ची ‘फॅमिली फ्लोटर’ पॉलिसी घेणे गरजेचे वाटते. यासाठी अंदाजे वार्षकि ५,००० रुपये हप्ता भरावा लागेल.
आता हिरकणीच्या प्रमुख वित्तीय ध्येयाकडे वळू. तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत. शासनाच्या योजनेअंतर्गत ७ लाख रुपये कर्ज घेऊन समान ८० हप्त्यात फेडायचे तर सध्याच्या १५,००० रुपयांच्या बचतीतून ८,७५० रुपये वेतनातून कपात होतील. साधारणत: तेवढाच हप्ता बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा भरावा लागेल.
दुसरा पर्याय असा की, पुढील वर्ष – दीड वर्षांत शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लाऊ होईल. पगार वाढेल तशी तुमची कर्ज पात्रताही वाढेल. तसेच तुमची भावंडेसुद्धा कमवायला लागतील व तुमची बचतयोग्य शिल्लक वाढेल.
तेव्हा एक ते दीड वर्ष धीर धरणे सोयीचे ठरेल. जर तुम्ही लगेचच घर घेतले तर तुमच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. जर वर्ष – दीड वर्ष थांबायची तयारी असेल तर दोन वर्षांसाठी १२ हजार रुपयांची गुंतवणूकयोग्य शिल्लक गुंतविण्यासाठी काही फंडांची शिफारस येथे देत आहोत.
हिरकणीचे वेतन शासन ‘अॅक्सिस बँके’त जमा करते. फंड खरेदी करण्यासाठी हिरकणी ‘अॅक्सिस बँके’चा संकेतस्थळ म्युच्युअल फंड खरेदी मंच (Online Platform) वापरू शकतात. अथवा ‘अॅक्सिस बँके’त प्रत्यक्ष जाऊनदेखील या फंडांची खरेदी करू शकतात.
हिरकणी यांची टपाल विभागाची ‘पीएलआय संतोष’ ही एक अव्वल योजना आहे. टपाल विभागाच्या विमा योजना केवळ केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारीच घेऊ शकतात. परंतु या योजनेबद्दल शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये फारच कमी जागरुकता आहे. म्हणूनच हिरकणी यांनी या योजनेचे शिल्लक हप्ते भरून ही योजना पुनर्जीवित करावी.
थोडक्यात, पोलीस शिपाई आणि अधिकारी कर्तव्यावर असताना प्रत्येक कृती ही ‘पोलीस मॅन्युअल’प्रमाणे करत असतो. कायदा व सुव्यवस्था राखतांना छडी केव्हा उगारायची, अश्रुधुराचा वापर कधी करायचा व गोळीबार कधी करायचा व गोळीबार करण्याचे आदेश कुठल्या हुद्यावरील अधिकाऱ्याने द्यायचे हे सुनिश्चित केले आहे. यात कधीही गोंधळ होत नाही.
याच पध्दतीने आíथक नियोजनाचे नियमही काटेकोरपणे पाळायचे असतात. म्हणूनच हिरकणी यांच्या वर्दीची शिस्त त्यांच्या आíथक नियोजनात असणे गरजेचे आहे, हेच या निमित्ताने सांगता येईल.
shreeyachebaba@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा