समीर नेसरीकर

म्युच्युअल फंडांच्या परिभाषेत ‘एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गातील गुंतवणूक’ अशा अर्थाने हायब्रिड हा शब्द पुढे येतो. भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या २०१७ च्या परिपत्रकानुसार, म्युच्युअल फंडात ‘हायब्रिड’ श्रेणी औपचारिकपणे ओळखली जाऊ लागली. त्याविषयी आजचा लेख. गुंतवणूकदारांना संपूर्णत: एकाच मालमत्ता वर्गात (१०० टक्के समभाग (इक्विटी) / रोखे (डेट) ) गुंतवणूक करायची नसल्यास ते हायब्रिड श्रेणीत गुंतवणूक करू शकतात.
यातील वेगवेगळय़ा उपश्रेणीत समभाग, रोखे, सोने इत्यादी एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गाचा समावेश असतो. त्या मालमत्ता वर्गाचा सहसंबंध (को-रिलेशन) खूपच कमी असतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (ॲम्फी) ऑगस्ट २०२२ च्या आकडेवारीनुसार, ओपन एंडेड फंड मालमत्तेच्या साधारण १३ टक्के गुंतवणूक ही हायब्रिड श्रेणीतून येते. हायब्रिड श्रेणीत खालील उपश्रेणींचा समावेश होतो.

१. कॉन्झरवेटिव्ह हायब्रिड फंड:
समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या १० ते २५ टक्के गुंतवणूक. रोखे साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या ७५ ते ९० टक्के गुंतवणूक.

२. बॅलन्स्ड हायब्रिड फंड:
समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या ४० ते ६० टक्के गुंतवणूक. रोखे साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या ४० ते ६० टक्के गुंतवणूक. आर्बिट्राजमध्ये गुंतवणूक परवानगी नाही.

३. ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड:
समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या ६५ ते ८० टक्के गुंतवणूक. रोखे साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या २० ते ३५ टक्के गुंतवणूक.

४. डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन (बॅलन्स्ड ॲडवांटेज फंड)
समभाग आणि रोखे यातील बदलती गुंतवणूक.

५. मल्टी-ॲसेट ॲलोकेशन
कमीत कमी तीन मालमत्ता वर्गात केलेली गुंतवणूक (कमीत कमी १० टक्के प्रत्येक वर्गात आवश्यक). समभाग, रोखे, सोने अशांचा यात समावेश असतो.

६. आर्बिट्राज फंड
आर्बिट्राज धोरणाच्या अनुषंगाने चालवली जाणारी योजना. समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या कमीत कमी ६५ टक्के गुंतवणूक. उदाहरणार्थ, इथे कॅश आणि फ्युचर्स मार्केटमधील किमतीमधील फरकाचा फायदा घेतला जातो.

७. इक्विटी सेव्हिंग
समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या कमीत कमी ६५ टक्के गुंतवणूक. रोखे साधनांमध्ये एकूण मालमत्तेच्या कमीत कमी १० टक्के गुंतवणूक. कमीत कमी किती टक्के हेज्ड आणि अनहेज्ड असणार याविषयी योजना माहितीपत्रात नमूद करणे आवश्यक आहे. आपल्यासाठी योग्य हायब्रिड फंड कोणता? याचे उत्तर शोधण्याआधी आपली जोखीम क्षमता किती? किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे? नजीकच्या काळात पैशांची गरज आहे का? याचा स्वत:चा अभ्यास पक्का पाहिजे. गुंतवणुकीआधी वरील उपश्रेणींची सखोल माहिती करून घेणे आवश्यक आहे. वयपरत्वे आपले ‘ॲसेट ॲलोकेशन’ थोडे बदलत जाईल. तसेच ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ (एसडब्ल्यूपी) हायब्रिड फंडामधून चालू करायचा असल्यास आपली दर महिन्याची पैशांची गरज आणि त्यानुसार कोणती म्युच्युअल फंड योजना योग्य, यासाठी तुम्ही अनुभवी सल्लागाराची मदत घ्यावी. आपण सुरुवात इक्विटी हायब्रिड आणि डेट हायब्रिडपासून करू शकता. तसेच या उप श्रेणीतल्या ‘बॅलन्स्ड अॅडवांटेज फंड’ विषयीचा माझा स्वतंत्र लेख ती ‘अंडय़ांची टोपली आणि आपला बीएएफ’ १८ एप्रिल २०२२ च्या अर्थवृतान्तमध्ये प्रसिद्ध झाला होता, तो वाचण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा. सर्वसाधारणपणे अनुभवी गुंतवणूकदार या श्रेणीत गुंतवणूक करतातच. मात्र नवीन गुंतवणूकदारांनी आपल्या पहिल्या गुंतवणुकीवेळी हायब्रिडला हॅलो करायला विसरू नये.

‘अंडय़ांची टोपली आणि आपला बीएएफ’ १८ एप्रिल २०२२ च्या अर्थवृतान्तमध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)
sameernesarikar@gmail. com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)