भक्ती रसाळ
भांडवली बाजारात तेजी-मंदीचे ऋतूचक्र अनेक दशके असेच चालू आहे. भविष्यातदेखील असेच ते चालू राहील. गुंतवणूकदारांनी तेजी मंदीचा फायदा घेऊन गुंतवणुकीतील सातत्य राखणे महत्त्वाचे असते.
गेल्या आठवडय़ातील रशियाच्या लष्करी कारवायांमुळे जागतिक पातळीवरील सर्वच देशांच्या भांडवली बाजारांमध्ये घसरण झाली. देशांतर्गत शेअर भांडवली बाजारातदेखील ऐतिहासिक पडझड झाली. नवीन गुंतवणूकदार जे करोनाकाळात भांडवली बाजार किंवा म्युच्युअल फंडाकडे वळाले त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. हातातील वाळूसारखे गेल्या सहा महिन्यांतील आभासी नफ्याचे आकडे लाल रंगाने पुसले गेले. जोखीम व्यवस्थापन आणि जीवन लक्ष्यांवर आधारित आर्थिक नियोजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सामान्य गुंतवणूकदार महागाई, चलनवाढ, करोनाकाळातील मिळकतींचा तोटा या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा म्हणून ज्या भांडवली बाजाराकडे आशेने बघतो, त्याच भांडवली बाजारातील अनपेक्षित नुकसान त्याला संभ्रमात टाकत आहे. गुंतवणूकदारांनी अस्थिर निर्देशांकांची ही वेळ कशी निभावून न्यावी?
युद्धजन्य परिस्थितीतही तर्कशुद्ध विचार कसा करावा? या विषयीची पंचसूत्री
१) म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे
म्युच्युअल फंड योजना किमान तीन ते पाच वर्षांसाठी असाव्यात. म्युच्युअल फंड म्हणजे अल्पावधीत सहज श्रीमंत होण्याचा मार्ग नव्हे! कोणतीही फंड योजना आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाशिवाय उघडून केवळ वर्तमानपत्रे, मासिके आणि संकेतस्थळावरील माहिती वाचून करण्याइतक्या सोप्या आणि जोखीमशून्य नसतात. त्यामुळे फक्त पंचतारांकित म्युच्युअल फंड योजनांमध्ये पैसे गुंतवून आर्थिक नियोजन झाले असल्याचा गैरसमज गुंतवणूकदारांनी बाळगू नये.
२) प्रत्येक गुंतवणूक जीवनलक्ष्यांशी जोडलेली असावी
म्युच्युअल फंड म्हणजे दोन अंकी परताव्यासाठीचा राजमार्ग नसून आपल्या कौटुंबिक जीवनलक्ष्यासाठीचे एक साधन आहे. जीवनलक्ष्यांच्या पूर्ततेसाठी उद्दिष्टे पूर्ण झाल्यास नियोजन यशस्वीपणे पार पडते.
३) म्युच्युअल फंड योजना वारंवार बदलणे अयोग्य
प्रत्येक म्युच्युअल फंड घराण्याची जोखीम व्यवस्थापन हातोटी वेगवेगळी असते. म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक समीकरण फंड व्यवस्थापकानुसार बदलत असते. गुंतवणूकदारांनी बाजारातील तात्पुरत्या तोटय़ामुळे हवालदिल होऊन फंडातून बाहेर पडणे जास्त नुकसान घडवतो. सतत एका म्युच्युअल फंडातून बाहेर पडत नवीन फंडात गुंतवणूक करणे अयोग्य आहे. आर्थिकदृष्टय़ा असे नियोजन तर्कविसंगत असते. केवळ वार्षिक आढावा घेतानाच चालू गुंतवणुकीचा पुनर्विचार करणे गुंतवणूकदारांनी हिताचे ठरते.
४) जोखमांच्या मूल्यमापनावर आधारित नियोजन
गुंतवणूकदारांवरील ताण नाहीसा करते आर्थिक नियोजनकार गुंतवणूकदारांची जोखीम सहन करण्याची ताकद लक्षात घेऊनच गुंतवणुकीचे विविध पर्याय सुचवत असतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमांकावर आधारित योजना आहेत. निश्चित आणि शाश्वत परतावा देत नाहीत असे वारंवार ठळकपणे अस्वीकृतीद्वारे नियामक मंडळ सांगत असते. बाजाराच्या तेजीच्य दिवसांत या जोखमांचा गुंतवणूकदारांना विसर पडतो. तेजीच्या बाजारात सतत मुद्दल वाढविण्यासाठी मानसिकताही बळावते. बाजारातील मोहाचे आकर्षण नव्या गुंतवणूकदारांना जिंकणे जास्त कठीण जाते. यामुळे आपल्या मिळकतीतून किती टक्के मिळकत आपण गुंतवली तर ती व्यक्तिगत आर्थिक मर्यादेत राहील, असे तारतम्य ठेवणे गरजेचे आहे. सामान्य गुंतवणूकदार जेव्हा वर्तमानपत्रांतून काही लाख कोटींचे नुकसान झाल्याचे वाचतो तेव्हा त्याच भांडवली बाजाराविषयी भयगंड बळावतो. नवीन गुंतवणूकदार निराश होतो. नफा-तोटा-नफा हे आर्थिक वृद्धीचे जीवनचक्र आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार हे चक्र असेच अविरत चालू आहे. कोणत्याही नकारात्मक घटनेचा परिणाम बाजारावर होतो. मात्र ती घटना दीर्घ मुदतीत बाजारावर मात करू शकत नाही, तर बाजार त्यावर मात करतो. प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या जोखीम क्षमतेचा अब्यास करूनच पाऊल उचलणे सुज्ञपणाचे ठरते.
५) वारंवार गुंतवणुकीचा आढावा घेणे टाळणे
गुंतवणुकीचे व्यवस्थापन जर कुटुंबाच्या जीवनलक्ष्यांवर आधारित असेल तर वारंवार किती नफा किंवा तोटा झाला याविषयी विचार करणे गरजेचे ठरत नाही. जसे मुलामुलींचे उच्चशिक्षण, निवृत्त जीवनाचे जीवनलक्ष्य गाठायचे असेल तर दर शुक्रवारी आपली गुंतवणूक कीर्तीने वाढली हे बघणे निरुपयोगी ठरते. सतत मूल्यमापन केल्याने मनात नकारात्मक विचार येण्याने ताण वाढतो. मुळात पैशाचे सुयोग्य नियोजन करून ताणमुक्त होणे आर्थिक नियोजनाचा पायाभूत विचारच अशाने साध्य होत नाही. शिस्तबद्ध नियोजन केवळ गुंतवणूकदारास चिंतामुक्त होण्याकरता केले जाते. वारंवार परताव्याकडे लक्ष देणे चिंता वाढवत असल्यास गुंतवणूकदारांची उमेद नाहीशी करण्यास कारणीभूत ठरते. दहशतवादी हल्ले, बदलते राजकारण. युद्धजन्य परिस्थिती, चलनफुगवटा, नकारात्मक अर्थसंकल्प अशा अनेक घडामोडी ज्या सामान्य नागरिकांच्या अवकाशाबाहेरील आहेत, त्या अल्पकाळापुरत्या बाजाराला नाउमेद करू शकतात. मात्र त्यामुळे रात्रंदिवस कष्ट करून जमवलेली आर्थिक मालमत्तेची स्वप्ने मात्र अबाधित राहावी. कुटुंबाच्या सदस्यांनी भविष्याविषयीची उमेद कायम ठेवावी.
बाजारातील तेजी मंदीचे ऋतुचक्र कित्येक दशके असेच चालू आहे. भविष्यातदेखील असेच चालू राहाणार आहे. गुंतवणूकदारांनी नाउमेद न होता गुंतवणुकीतील सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.
लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार