आज ‘माझा पोर्टफोलियो’ स्तभांला एक वर्ष पूर्ण झालं. २०१२ हे वर्ष शेअर बाजारासाठी तितकेसे चांगले गेले नसले तरीही ज्या गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले असतील आणि मुख्य म्हणजे पडेल काळातही संयम दाखवला त्या गुतवणूकदारांनी नफा कमावला असेलच. ‘माझा पोर्टफोलियो’ लेखमालेचा मुख्य उद्देश ‘टिप्स’ देणे नव्हताच. मराठी वाचकांना शेअर बाजारात गुंतवणूक करताना कंपन्या कशा निवडाव्यात, शेअर बाजाराचा अभ्यास कसा करावा आणि गुंतवणुकीची गोडी लागावी असा तिहेरी हेतू त्यात होता. वाचकांचा प्रतिसाद पाहता हा हेतू बहुतांशी सफल झाला असे वाटते. नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर आपणही शेअर बाजारात चांगली कमाई करू शकतो असा विश्वास आता वाचकांना वाटत असेल अशी आशा आहे.
या स्तंभातून वर्षभरात एकंदर ४९ शेअर्स गुंतवणुकीसाठी सुचविले होते. सुचविलेल्या अनेक कंपन्या मिडकॅप किंवा स्मॉलकॅप आहेत आणि तरीही बहुतांशी शेअर्सनी चांगला फायदा करून दिला आहे. सुचविलेला प्रत्येकी एक शेअर खरेदी केला असेल तर तुमच्या ३६,७७८ रुपयांचे आज ४४,२८१ रुपये झाले असतील. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीत २०.४०% वाढ झाली आहे. परंतु ही गुंतवणूक दर आठवड्याला केली असल्याने आपल्याला ‘आयआरआर’ पद्धत्तीने परतावा काढायल हवा. असा परतावा ३९% इतका येईल. इतर कुठल्याही गुंतवणुकीत इतका चांगला फायदा मिळणे कठीण आहे. शेजारच्या तक्त्यात सुचविलेल्या शेअर्सचा पुन्हा फिरून घेतलेला वेध या दृष्टीने पुरता बोलका आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे आणि काही लेखांतून सांगितल्याप्रमाणे वाचकांचाही अभ्यास यात अपेक्षित होता. ज्या वाचकांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून, खरेदीचे निकष तपासून योग्य वेळी शेअर्स खरेदी केले असतील आणि योग्य वेळी विकलेही असतील त्यांना फायदा झालाच असेल. केवळ या स्तंभातून सुचविलेलेच नव्हे तर तुम्ही स्वत: अभ्यास करून शेअर्स खरेदी/ विक्री केली असेल तर त्यातही किती फायदा किंवा तोटा झाला आहे तो तपासून पाहा. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असतील तर संयम दाखवून शेअर्स राखून ठेवा. आत्मविश्वासाने केली गेलेली आणि दीर्घकालीन स्वरूपाची गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते हे तुमच्या लक्षात येईलच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा