मागील लेखात म्हटल्याप्रमाणे पोर्टफोलिओ किंवा गुंतवणूक करताना ‘ग्रोथ ओरिएंटेड’ कंपन्यांच्या शेअरची निवड आवश्यक असते. तुमच्या पोर्टफोलिओमधील प्रत्येक शेअर फायदा देईलच असे नसते. किंबहुना, तुमच्या पोर्टफोलिओमधील केवळ दोन ते तीन शेअरमधील गुंतवणूक तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ फायद्यात आणू शकतात. म्हणूनच काही पटीने फायदा देणारे ‘ग्रोथ शेअर’ शोधणे आवश्यक ठरते. असे ‘मल्टिबॅगर्स’ शक्यतो स्मॉल किंवा मिड कॅप शेअरमधून मिळण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा काही चांगल्या कंपन्या केवळ त्या वेळच्या परिस्थितीमुळे चांगली कामगिरी करू शकत नाहीत. गेली काही वर्षे पायाभूत सुविधा देणाऱ्या कंपन्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनही चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. याला बहुतांशी देशांतर्गत परिस्थितीखेरीज जागतिक मंदीसदृश स्थितीही जबाबदार आहे. असे शेअर याच काळात खरेदी करून ठेवल्यास चांगला फायदा होऊ  शकतो. कारण परिस्थिती बदलत असते. आज सुचवलेली संघवी मूव्हर्स ही त्यापैकीच एक.

संघवी मूव्हर्स ही भारतातील सर्वात मोठी, तर जगातील सहाव्या क्रमांकाची क्रेन रेंटल कंपनी आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात मध्यम ते मोठय़ा अशा हायड्रॉलिक, टेलिस्कोपिक, क्रोलिंग अशा विविध प्रकारच्या ३८४ क्रेन असून, त्यांची क्षमता २० मेट्रिक टन ते ७५० मेट्रिक टन आहे. पायाभूत क्षेत्रातील ही कंपनी गेली २० वर्षे क्रेन भाडय़ाने देण्याव्यतिरिक्त टर्न की प्रोजेक्टस, उपयुक्त अवजारे, तांत्रिक सल्लागार, कुशल मनुष्यबळ आदी सेवा पुरवते. कंपनीचा प्रमुख व्यवसाय पायाभूत उद्योगाशी संबंधित असल्याने आणि गेली दोन – तीन वर्षे या क्षेत्रातील मंदीमुळे कंपनीची आर्थिक कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. मात्र गेल्या आर्थिक वर्षांत (मार्च २०१५) कंपनी तोटय़ातून नफ्यात आल्यानंतर कंपनी पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. डिसेंबर २०१५ साठी संपलेल्या तिमाहीत १३३.८० कोटीच्या उलाढालीवर (५५% वाढ) कंपनीने २८.२० कोटी (२९२% वाढ) रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत कंपनीची कामगिरी अशीच सरस असेल अशी अपेक्षा आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पांत पायाभूत क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ मोहीम आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अशा योजनांमुळे या क्षेत्राला चालना मिळेल आणि कंपनीसाठी आगामी काळ आर्थिक प्रगतीचा असेल अशी आशा आहे. दोन वर्षांसाठी पोर्टफोलिओमध्ये ठेवायला अवश्य विचार करा.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

*   २९ फेब्रुवारी २०१६ रोजी संसदेत सादर झालेल्या चालू आर्थिक वर्षांच्या – २०१६-१७ चा अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलत मर्यादेच्या दृष्टीने फार मोठा बदल झाला नाही. घर भाडे भत्त्याची मासिक/वार्षिक मर्यादा तेवढली विस्तारली गेली.

*   ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’कडे ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न व त्यावरील कराबाबतची विचारणा केली गेली. याबाबत ‘खासगी शिकवणीचे शुल्क वजावटीस अपात्र!’ या लेखाद्वारे स्तंभलेखक प्रवीण देशपांडे यांनी ‘कर समाधान’द्वारे केलेले स्पष्टीकरण पुन्हा येथे देत आहोत.

Untitled-27

Untitled-29

Untitled-30

Untitled-31

 

अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com

Story img Loader