चंद्र तेथे चंद्रिका। शंभू तेथे अंबिका।
संत तेथे विवेका। असणे की जे।
राव तेथे कटक। सौजन्य तेथे सोयरिक।
वन्ही तेथे वाहक। सामथ्र्य की दया ते धर्मु।
– संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरीतील वरील वेचा हा मराठीच्या पाठय़ पुस्तकात होता. मराठीच्या बर्डेबाईंनी माऊलींनी दिलेला दृष्टांताचे विवेचन करताना वर्गात म्हणाल्या, ‘प्रत्येकाचा एक धर्म (स्वभाव) असतो आणि सहसा हा स्वधर्म कोणीही बदलत नाही’. या आठवडय़ातील बाजाराची वाटचाल पाहिली तर बाजाराने त्याच्या धर्माचे पालन केले असेच म्हणावे लागेल. मागील एका आठवडय़ात सेन्सेक्समध्ये २०३.५० अंकांची भर पडली. परंतु ही भर पडताना ३९.७०, -४३०.६५, ३०.६२, ४९०.६७, ३४.३७, ३८.७९ इतके चढ-उतार झाले. एका मित्राने याचे वर्णन ‘रुठी हुई मेहबूबा’ असे केले. चढ-उताराचा विचार करता बाजाराने त्याच्या धर्माचे पालन केले असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी सेन्सेक्स ५२ आठवडय़ाच्या उच्चांकावर बंद झाला. सामान्यत: नवीन उच्चांक गाठण्यापूर्वी कुठे स्थिरावेल हे सांगता येत नाही. म्हणून नवीन खरेदी की सावध पवित्रा हा विचार करावा.
मंगळवारी एप्रिल महिन्याचे महागाईचे आकडे जाहीर झाले. जानेवारीत नवीन वर्ष चालू झाल्यापासून महागाई टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. एप्रिल महिन्यात महागाई कमी होण्यात इंधने व उत्पादित वस्तू यांचे मोठे योगदान आहे. एप्रिल महिन्यात गहू, डाळी, कडधान्ये, फळे, अंडी, मांस-मासे यांच्या भावात घसरण झाल्यामुळे अन्नधान्यांच्या किमतीवर आधारित महागाई कमी झाली.
भारतात दोन प्रकारे इंधनाच्या किमती ठरतात. सरकारी नियंत्रण असलेल्या व नियंत्रणाबाहेरील. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल, विमानाचे इंधन, फन्रेस ऑइल, नैसर्गिक वायू, विना अनुदानित स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमती कमी झाल्या. तर डिझेलच्या किमतीत वाढ झाली. याचा परिणाम इंधनाच्या दरावर आधारित महागाईची दरवाढ मागील मार्च महिन्यात १०.२% वरून ८.८% झाली. उत्पादित वस्तूंवर आधारित महागाईचा दर मुख्यत्वे साखर व खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे झाला.
महागाई कमी होत असली तरी सोने आयातीमुळे परदेशी व्यापारी तूट वाढत आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती ‘टकमक कडय़ावर’ येऊन ठेपली आहे. त्वरित आणि ठोस उपाय केले तर ठीक. अन्यथा सोन्यामुळे कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. बुधवारचे कामकाज संपताना रिझव्र्ह बँकेकडून व्यापारी बँकांनी रेपो दराने केलेली कर्ज उचल १,०९,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे प्रमाण रिझव्र्ह बँकेला अपेक्षित असलेल्या एकूण ठेवींच्या १% (६०,००० कोटी) पातळीच्या कितीतरी वर आहे. रिझव्र्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या जम्मू येथील बठकीनंतर गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी, अर्थव्यवस्थेत रोखतेची कमी असल्याची जाणीव असल्याचे सांगितले व तातडीची उपाययोजना म्हणून बँकांकडून १०,००० कोटी रुपयांची रोखेखरेदी जाहीर केल्याचे सांगितले. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुढील मध्य त्रमासिक पतधोरण आढावा बठकीची म्हणजे १७ जूनची वाटही न बघता रोख राखीव प्रमाणात कपात करेल, असेही ते म्हणाले. १७ जूनपूर्वी मे महिन्याच्या महागाईचे आकडे व एप्रिल महिन्याचे औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर होतील. याच सुमारास १५ जूनला कंपनी कराचा पहिला हप्ता भरला जाईल. तेव्हा रिझव्र्ह बँक दर कपात करेल या निष्कर्षांपर्यंत पोहोचता येणार नाही.
* टाटा कॉफी
Lot can happen over cup of coffee हे वाक्य आजच्या तरुणांच्या बरोबरीने सगळ्यांनीच आपलेसे केले आहे. मागील आठवडय़ात कोणाला तरी भेटायचे होते. ती भेट औपचारिक स्वरूपाची होती. ज्या गृहस्थांना भेटायवचे होते तेच म्हणाले, Cafe Coffee Day मध्ये भेटू. भेट औपचारिक असो अथवा सहज, शिळोप्याच्या गप्पा मारायच्या निमित्ताने कॉफी प्यायला भेटायची संस्कृती उदयाला येत आहे. गेल्या दशकात भारतात वेगवेगळया नाममुद्रेने कॉफी विकणाऱ्या दुकानांची साखळी भारतात उभी राहिली. मुंबई, पुण्यातून सुरू झालेली ही साखळी तुलनेने लहान परंतु दरडोई मोठे उत्पन्न असलेल्या शहरात पोहोचली आहे. भारतात कॉफीचा दरडोई वापर तुलनेने नगण्य आहे. भारतात दरवर्षी कॉफीची मागणी १०.६५% वाढत आहे. भारतात कॉफीचे उत्पादन कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या तीन राज्यात होते. एकूण उत्पादनाच्या ८०% उत्पादन कॉफी निर्यात होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा