गेले दोन आठवडे भारताच्याच नव्हे तर जगभरच्या भांडवली बाजाराचा मुख्य मापदंड असलेला अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक निरंतर घसरणीला लागला आहे. अमेरिकेतील कथित ‘फिस्कल क्लिप’च्या परिणामासंबंधी तर्क-वितर्कातून हे अर्थातच घडत आहे. अमेरिकेतील धनाढय़ांवर वाढीव करदायित्व लादल्याने तेथील औद्योगिक मंदीला आणखीच खतपाणी घातले जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. आपल्या निफ्टी निर्देशांकालाही याचे चटके जाणवत आहेत. जरी त्याने आपल्या अल्पावधीतील निसरडय़ा प्रवाहावर मात करून, पुढल्या ५८०० या उच्चांक पातळीकडे प्रवास कायम सुरू ठेवला असला तरी काही खरे दिसून येत नाही. मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वित्तीय अरिष्टाशी सामना करताना आपल्या कडव्या भूमिकेला काहीशी मुरड घालण्याची तयारी दाखविली असली तरी श्रीमंतांना जास्तीचा कर भरावा लागण्याबाबत कोणतीही तडजोड त्यांना अमान्य दिसत आहे. यातून जगभरच्या शेअर बाजारातील चिंतातूरांचे मोहोळ आणखीच वाढत चालले आहे.
देशांतर्गत आपल्या अर्थमंत्र्यांनी गुरुवारी  बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत, गरजवंत सरकारी बँकांना पुनर्वित्ताच्या रूपात भांडवली सहाय्य करण्याचे अभिवचन दिले. या वृत्ताच्या परिणामी बँक निर्देशांकाने बाजाराला तात्पुरता आधार जरूर दिला. परंतु शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने ५६०० ही महत्त्वपूर्ण तांत्रिक पातळी भेदल्याचेही दिसून आले.
पुढे काय?
निफ्टी निर्देशांक सध्या एका नाजूक वळणावर आहे. निर्देशांकाने सप्ताहअखेर नेमक्या भाव प्रवाहाच्या खालच्या तटाशी विश्राम घेतला आहे. डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांचा क्रियाकलाप तर तद्दन नकारात्मक कल दर्शविणारा आहे. त्याच्या हवाल्याने भाकीत करायचे तर चालू आठवडय़ात निर्देशांकाने आपल्या प्रवाह रेषेचा कडवा आधार स्तर गमावून बसण्याची शक्यता दिसते आहे. तथापि ५४४७ ते ५५२७ ही निफ्टी निर्देशांकासाठी पोकळी क्षेत्र बनले असल्याचेही ध्यानात येते. त्यामुळे कोणत्याही अफरातफरीच्या स्थितीत ही पोकळीच निफ्टी निर्देशांकासाठी मोठा आधार बनू शकेल. त्याचवेळी निफ्टी निर्देशांकाच्या वरच्या दिशेने प्रवासालाही आता खूपच मर्यादा पडल्याचे स्पष्ट होते. डेरिव्हेटिव्हज्मध्ये सर्वोच्च ओपन इंटरेस्ट हा ५८०० या स्ट्राइक प्राइसवर जवळपास एक कोटीच्या घरातील कॉन्ट्रॅक्ट्सद्वारे एकवटलेला दिसतो. त्या उलट सर्वाधिक कॉल ऑप्शन्स हे शुक्रवारी ५७०० या स्ट्राइक प्राइसवर आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या फ्युचर्स व ऑप्शन्स मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत ५७५० या पातळीवर निर्देशांकाला अवघड प्रतिरोधाला सामोरे जावे लागेल असे दिसून येते.     
सप्ताहासाठी शिफारस
*    हिंडाल्को : (सद्य दर १०९ रु.)     
    विक्री: लक्ष्य- रु. १०५-१०३
*    आयटीसी :  (सद्य दर २७४.६५ रु.)     
    विक्री : रु. २७२ खाली;  लक्ष्य: रु. २६७-२६२
*    भारती एअरटेल : (सद्य दर ३०१ रु.)     
    खरेदी: रु. ३०४ वर;  लक्ष्य: रु. ३१४

Story img Loader