आता क्रेडिट कार्डावरील व्यवहार बचतकारक आणि कर वजावटीसही पात्र ठरतील, असा सरकारचा प्रस्ताव आहे. अर्थातच तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असावे, असे तुम्हाला वाटत असणार.. आधीपासून असेल तर त्यावरील खर्च मर्यादा बँकेने आणखी वाढवावी, अशी तुमची अपेक्षा असणार. क्रेडिट कार्ड असो वा तुम्हाला घर, वाहन, महागडय़ा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अथवा गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज हवे असल्यास, सर्वच बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून तुमची ‘पत’ सर्वात आधी तपासली जाणार. तुमचे पत स्वास्थ्यच तुमची प्रधान पात्रता आजच्या व्यवहारात ठरली आहे.
तर पत स्वास्थ्य तपासण्याचे काही निश्चित ठोकताळे आहेत. पण सर्वाधिक वापरात येणारे दोन महत्त्वाचे निकष आहेत. बहुतांश वित्तीय संस्था त्यांच्याकडे कर्जासाठी येणाऱ्या ग्राहकांचा ‘पत गुणांक (क्रेडिट स्कोअर)’ आणि त्याच्या प्राप्तिचा अंदाज घेत त्याची पत ठरवीत असतात. अनेक व्यक्तिगत कर्जइच्छुकांच्या गावी नसलेले अनेक बारकावे या प्रक्रियेत वापरात येतात, त्याचा सारांशात वेध घेऊ या.
पत गुणांक (क्रेडिट स्कोअर)
संस्थाच्या माध्यमातून देवघेव केलेल्या प्रत्येकाचा एक पत गुणांक ‘ऋण संदर्भ संस्था – क्रेडिट ब्युरो’ तयार करीत असतात. गेल्या दशकभरात ‘सिबिल’ आणि ‘इक्विफॅक्स’ या सारख्या ऋण संदर्भ संस्थांनी अशा व्यक्तिगत कर्जदार ग्राहकांचा प्रचंड मोठा डेटाबेस तयार केला आहे. बँका, वित्तीय कंपन्या, सहकारी संस्थांशी या ना त्या प्रकारचा कर्ज व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचा व त्यांच्या कर्जफेडीचा अगदी बारीकसारीक तपशील या संस्थांकडे नोंद होत असतो. कर्ज खाती किती, कर्ज प्रकार काय, कर्जाचा कालावधी, परतफेडीचे ग्राहकाचे वर्तन या निकषांच्या आधारे त्या ग्राहकाचा पत गुणांक निश्चित केला जातो. ज्याचा अर्थात नवीन कर्ज वितरणासमयी वित्तीय कंपन्या- बँकांकडून आधार म्हणून वापर केला जातो. उदाहरणार्थ, सिबिलकडून पत गुणांक हा आकडय़ांमध्ये दिला जातो, म्हणजे ग्राहकाची संपूर्ण पत-इतिहास आणि विश्वासार्हता तिने बहाल केलेल्या तीन अंकी संख्येत सामावली जाते. या गुणांकासाठी साधारणत: ३०० ते ९०० गुणांची मोजपट्टी वापरात आणली जाते. हा गुणांक म्हणजे कर्जदार ग्राहकाची विद्यमान पत आणि पूर्व इतिहास यांचा एकत्रित सार असतो. तुमचा पत गुणांक ९०० च्या जितक्या जवळ असेल तितकी तुम्हाला कर्जमंजुरीची शक्यता अधिक असे त्यातून ध्वनित होते. इतकेच नाही जर व्यक्तिगत कर्ज हवे असेल तर पत गुणांक जितका अधिक तितके व्याजाचा दरही बँका व वित्तीय कंपन्यांनी खालावत आणला, असेही अनुभवास येते.
बँकांच्या कर्जाचे दोन प्रकार असतात, एक तारणयुक्त सुरक्षित कर्ज तर दुसरे विना तारणी असुरक्षित कर्ज. गृहकर्ज, वाहन कर्ज हे सुरक्षित कर्जाचे प्रकार असून, त्यासाठी तुमचा पत गुणांक किमान ६५० वा त्याहून अधिक असेल, याची खात्री करून घेतली जाते. त्या उलट असुरक्षित कर्जे जसे व्यक्तिगत कर्ज, क्रेडिट कार्ड वगैरेसाठी तुमचा पत गुणांक ७५०च्या वरच असायला हवा. शिवाय पत गुणांक ठरविताना, ग्राहकाकडून कर्ज रकमेचा झालेला वापर, त्याच्या एकूण पत इतिहासात सुरक्षित व असुरक्षित कर्जाची मात्रा, त्याने कर्जासाठी विविध ठिकाणी केलेली मागणी व अर्ज फेटाळले गेल्याचे प्रमाण वगैरे देखील महत्त्वाचे निकष असतात. जर एखाद्याची आधीच वेगवेगळ्या प्रकारची कर्ज खाती सुरू आहेत आणि त्याने त्या उपर क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल, तर अशा ग्राहकाकडे साहजिकच संशयाने पाहिले जाईल. कर्जाबाबत हे अधाशीपण ऋण संदर्भ संस्थांकडून उपलब्ध डेटावरून अगदी चुटकीसरशी बँका व वित्तीय कंपन्यांना ताडता येते.
‘लिव्हरेज’-पत :
बडय़ा कॉर्पोरेट ग्राहकांच्या बाबतीत बँका व वित्तीय कंपन्यांकडून वापरात येणारा सामान्य निकष म्हणजे ‘लिव्हरेज’, जे त्यांच्या प्राप्तिनुसार केले जाणारे पत मूल्यांकन असते. सामान्य व्यक्तिगत ग्राहकांच्या बाबतीत मात्र हीच बाब ‘फिक्स्ड ऑब्लिगेशन्स टू इन्कम रेशो (फॉयर)’ अर्थात तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमच्यावरील सकल दायित्वाचे हे गुणोत्तर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर तुमच्या मासिक प्राप्तितून दरमहा कर्जाचे हप्ते जाण्याचे अर्थात ईएमआयचे प्रमाण किती याचा अदमास यातून घेतला जातो. उदाहरणार्थ, तुमचे मासिक वेतन हे १ लाख रुपये असेल आणि ईएमआयची रक्कम ६० हजार रुपये असेल, तर तुमचा फॉयर हा ६० टक्के होईल. या गुणोत्तराची मात्रा जितकी कमी तितके तुमच्या कर्ज मागणीच्या अर्जावर मंजुरीचा शिक्का उमटण्याची शक्यता अधिक असते. त्या उलट फॉयर आधीच खूपच जास्त असेल, तर नवीन कर्ज घेतल्यानंतर तुमच्याकडे खर्चासाठी काही शिल्लकच राहणार नाही, याची बँका व वित्तीय कंपन्या दखल घेतात आणि अशा ग्राहकाबाबत सावधगिरीचाच पवित्रा घेतात.
तर पत गुणांक आणि फॉयरवर आधारीत हे मूल्यांकनच केवळ सर्वत्र वापरात येते असेही नाही. प्रत्येक संस्थेच्या कर्ज मूल्यांकनाच्या अंतर्गत पद्धतीही असतात. त्या उलट अनेक बँका आणि वित्तीय कंपन्यांनी व्यक्तिगत कर्जासारख्या असुरक्षित कर्ज प्रकरणांसाठी पत गुणांक आणि फॉयरच्या विशिष्ट मात्रा निश्चित केलेल्या असतात, त्या मात्रेपल्याड येणारे अर्ज काहीही झाले तरी विचारातच न घेण्याचे धोरण त्या काटेकोरपणे पाळताना दिसतात. फार तर गृह कर्ज, वाहन कर्जासारख्या सुरक्षित कर्जाबाबत ते काहीसे उदारता दाखविताना दिसतील.
कर्जाची तातडीने निकड असो वा नसो, प्रत्येक व्यक्तीला उत्तम पत स्वास्थ्य राखणे काळाची गरज बनली आहे. अर्थात उच्चतम पत गुणांक आणि निम्नतम फॉयर राखणे हे ज्याच्या त्याच्या हाती असते. त्यासाठी किमान आर्थिक शिस्त पाळावी लागते. असे उमदे स्वास्थ्य ज्याकडे असेल त्याला विनासायास कर्ज उपलब्ध होतेच, पण ते त्याला इच्छित मात्रेत आणि तुलनेने स्वस्त व्याजदरात आणि प्रसंगी अन्य प्रक्रिया शुल्कात माफीही असे कर्जदार मिळवू शकतील.
कर्जदार ग्राहकाने करावयाच्या काही गोष्टी
१. तुमचे विद्यमान कर्जाचे हप्ते न चुकता वेळेत भरा.
२. दंडाची रक्कम मामुली आहे म्हणून विलंबाने भरणा केला तरी चालेल ही प्रवृत्ती टाळावी.
३. तुमच्या कर्जामध्ये सुरक्षित व असुरक्षित कर्जाचे संतुलित प्रमाण असावे.
४. महागडे कर्ज लवकर फेडण्याचा प्रयत्न करा, ज्यायोगे व्याजापोटी जाणारा पैसाही वाचेल आणि हप्त्यांचा भारही हलका होईल.
५. अंतिमत: त्यायोगे तुमचा फॉयर कमीत कमी राहील.
६. नियत कालावधीत ऋण संदर्भ संस्थांकडून पत गुणांक जाणून घ्या. तो विहित शुल्क चुकते करून सहजपणे मिळविता येतो.
(लेखक, बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये मुख्य पत अधिकारी आहेत.)