श्रीकांत कुवळेकर

पाम ऑइल किंवा पाम तेल. रोजच्या व्यवहारात बहुतेक सर्वाना परिचित असलेला हा शब्द. परंतु अनेकांना व्यवहारात त्याचे असलेले स्थान, त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व, इतकेच काय पाम तेल कुठून मिळते यापासून ते कसे तयार होते यापर्यंतच्या गोष्टींबाबत अनभिज्ञता आढळून येते. अलीकडच्या काळात पाश्चिमात्य देशांनी पाम तेलाच्या अन्नपदार्थातील वापराविरूद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे बऱ्याचदा ते खाद्यतेल चर्चेत आले आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये याविषयी बरीच ओरड होताना दिसत आहे. त्या अनुषंगाने इंडोनेशियन सरकारने पाम तेलाविषयी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारतातील पत्रकारांची उत्तर सुमात्रामधील पाम तेल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची आणि शेतकऱ्यांची भेट घडवून आणली होती. भारत पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असल्यामुळेच त्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ही भेट असल्यास त्यात काहीच गैर नाही.

येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, पाश्चिमात्य देशांचा पाम तेलाला विरोध हा वर वर पर्यावरणीय आणि आरोग्य असुरक्षितता या कारणांसाठी दिसत असला तरी यामागे जागतिक कृषी अर्थकारणामध्ये आणि कमोडिटी बाजारातील खाद्यतेल क्षेत्रामध्ये आशियाई देशांची वाढणारी मक्तेदारी याची कुठे तरी भीती पाश्चिमात्य देशांना भेडसावत असावी असे लक्षात येते. वस्तुस्थिती अशी आहे की, आरोग्य असुरक्षिततेपेक्षाही जगाची खाद्यतेल सुरक्षा आज पाम तेल बजावताना दिसते. पाम तेल क्षेत्रातील गेल्या दोन दशकांत झालेली क्रांती आणि भविष्यात या तेलाचे वाढते महत्त्व पाहिल्यावर तर या गोष्टीची खात्रीच पटते. झपाटय़ाने वाढणारे पाम तेल उत्पादन पर्यावरणीयदृष्टय़ा धोकादायक आहे का आणि असल्यास किती धोकादायक आहे यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. तरी या सदरातून आपण अर्थव्यवस्था आणि कमोडिटी बाजाराच्या दृष्टिकोतूनच या क्षेत्राकडे पाहू.

सर्वप्रथम पाम तेलाबद्दल थोडी माहिती घेऊ. भारत खाद्यतेलातील जगातील सर्वात मोठा आयातदार देश असून आपल्या गरजेच्या सुमारे ७० टक्के तेल, म्हणजे चक्क १५५ लाख टन खाद्यतेल आपण दरवर्षी आयात करतो. यासाठी सुमारे ८०,००० कोटी रुपये एवढे प्रचंड परकीय चलन खर्च करतो. या आयातीत सुमारे ६५ टक्के म्हणजे ९०-९५ लाख टन आयात केवळ पाम तेलाची असते. तुम्ही पाम तेल वापरत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास वस्तुस्थिती लक्षात घ्या की, कुठल्याही ब्रॅण्डच्या सोयाबीन किंवा सूर्यफूल तेलामध्ये पाम तेलाची मात्रा २० ते ३० टक्के एवढी असते. तांत्रिकदृष्टय़ा त्याला ‘ब्लेंडिंग’ किंवा मिश्रण म्हटले तरी ती चक्क भेसळ आहे हे लक्षात घ्यायला हवे. परंतु त्याबद्दल कोणाची तक्रार असण्याची शक्यता नाही. कारण शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफूल अथवा इतर प्रकारची सौम्य आणि ‘आरोग्यवर्धक’ तेले १०० टक्के शुद्ध स्वरूपात हवी असल्यास त्याला सध्याच्या दीडपट किंवा दुप्पट किंमत मोजण्याएवढी भारतीय ग्राहकाची आर्थिक आणि मानसिक तयारी नजीकच्या भविष्यात तरी होणार नाही. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ९५ टक्के हॉटेलांमधून तळण्यासाठी रिफाईंड तेलाचा वापर होतो ते दुसरे तिसरे नसून रिफाईंड पामोलिन हेच तेल आहे.

आयात ही मुख्यत: कच्च्या पाम तेलाची होत असली तरी अलीकडील काळातील आयात शुल्काच्या फरकामुळे रिफाईंड तेल जास्त प्रमाणात आयात होताना दिसते. या व्यतिरिक्त  वनस्पती तूप आयातही अप्रत्यक्ष पाम तेल आयातच आहे. वनस्पती तूप म्हणजे पाम तेलामध्ये हायड्रोजन मिसळून झालेले घट्ट पाम तेल आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या वनस्पतीची किमान चार ते पाच लाख टन आयात आपल्या देशात होते. ही आयात येथेच थांबत नाही. पाम तेलाच्या उत्पादनातून मिळणारे उपपदार्थदेखील प्रचंड प्रमाणात आयात होतात. हार्मनी, चॅम्पियन अथवा लाव्‍‌र्हिया हे भारतातील अलीकडील काळातील प्रसिद्ध अंगाचे साबण असोत किंवा आइस्क्रीम, रोजच्या वापरातील शुद्ध (?) गायीचे किंवा म्हशीचे तूप आणि बहुतेक सौंदर्यप्रसाधने यात पाम तेलाचे उपपदार्थ मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळेच अमूल वगळता सर्व कंपन्यांना वेष्टणावर आइस्क्रीमऐवजी ‘फ्रोझन डेझर्ट’ लिहिणे बंधनकारक केले गेले आहे. म्हणजेच जरी आरोग्यास हानिकारक आहे हे खरे मानले तरी पाम तेल आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असल्याचे लक्षात येते.

पाम तेलाचे महत्त्व भारतीयांसाठी किती आहे हे एवढय़ा संक्षिप्त माहितीवरून निश्चित येऊ शकते. भारताप्रमाणेच चीन, बांगलादेश, पाकिस्तान आणि अगदी आफ्रिका, युरोपीय आणि अमेरिकन देशांमधील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेमध्ये पाम तेलाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर वाढताना दिसत आहे. कारण म्हणजे पाम तेल इतर कुठल्याही खाद्यतेलांपेक्षा अत्यंत स्वस्त आहे.

इंडोनेशियामध्ये आजघडीला सरासरी ५० दशलक्ष टन आणि मलेशियात २० दशलक्ष टन एवढे पाम तेलाचे उत्पादन होते. एकत्रितपणे ते जागतिक उत्पादनाच्या ८५ टक्क्यांहून अधिक होते. भारत इंडोनेशियामधून सुमारे सहा दशलक्ष टन एवढे तेल आयात करतो तर उरलेले तीन दशलक्ष टन मलेशियामधून येते. भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा विचार करता परदेशात पाम तेल अति स्वस्त झाले तर त्याची आयात वाढून त्याचा विपरीत परिणाम येथील तेलबिया उत्पादकांच्या उत्पन्नावर होतो. अशा परिस्थितीत आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करून त्या प्रमाणात किंमत पातळी ठेवता येते. ही परिस्थिती मागील तीन वर्षांत आपण अनुभवली. मात्र येणाऱ्या वर्षांत या उलट परिस्थिती राहणार आहे. याचा अनुभव आपण सध्या घेतच आहोत. उदाहरणार्थ, मलेशियामधील वायदे बाजारात पाम तेल आज दोन वर्षांतील उच्चांक गाठताना दिसत असून त्यामुळे भारतातील वायदे बाजारात सोयाबीन आणि पाम तेलाने घाऊक बाजारात विक्रमी पातळी गाठली आहे. यामुळेच किरकोळ बाजारात गेल्या महिन्यात सर्व खाद्यतेलाच्या किंमतीत ५-६ टक्के वाढ झाली असून पुढील काळात अजून किमान १०-१२ टक्के वाढ अपेक्षित आहे.

ही भाववाढ अनेक कारणांमुळे झाली असली तरी मुख्यत्वेकरून पाम तेलाचा ऊर्जानिर्मितीसाठी वाढता वापर खाद्यतेल क्षेत्रासाठी नवी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. एकीकडे पुरवठय़ाचा विचार करता इंडोनेशियामधील उत्पादनवाढ २०२० मध्ये जेमतेमच राहणार असून मलेशियामध्ये देखील त्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. उलटपक्षी, २०२० मध्ये मलेशियामध्ये पाम तेलापासून निर्माण केलेल्या जैवइंधनाचे डिझेलमध्ये मिश्रणाचे प्रमाण १० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय झाला आहे, तर इंडोनेशियामध्ये तो ३० टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे खाद्यान्न क्षेत्रामध्ये या तेलाची उपलब्धतता कमी होणार आहे.

आता पाश्चिमात्य देशांना नक्की काय खुपतेय हे पाहू. जगातील बाजारात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या पुरवठय़ाचा मक्ता अर्जेन्टिना, ब्राझील, पॅराग्वे सारखे दक्षिण अमेरिकन देश आणि रशिया, युक्रेन सारख्या देशांकडे आहे. तर मोहरी तेलाचे उत्पादन उत्तर अमेरिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर होते. आजघडीला या देशांमध्ये या तेलांच्या उत्पादनवाढीला फार वाव राहिलेला नाही. तर दुसरीकडे २०५० सालापर्यंत वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, १०० दशलक्ष टन खाद्यतेलाची अतिरिक्त मागणी राहण्याचे अंदाज आहेत. अशा परिस्थितीत सतत वाढणाऱ्या पाम तेल उत्पादनामुळे या बाजारावर आशियाई देशांची पकड मजबूत होत जाईल हे पचणे पाश्चिमात्य देशांना अवघड जात असावे असे बोलले जाते. अमेरिकन कृषी खात्याचा मागील वर्षांचा अहवाल असे सांगतो की, जागतिक कृषी क्षेत्राखालील जमिनीपैकी ६९ टक्के जमीन पशुधन उद्योग, २.५ टक्के सोयाबीन, ११.२ टक्के  जमीन गहू, तांदूळ आणि मका, तर केवळ ०.४ टक्के जमीन पाम वृक्षलागवडीखाली आहे. यातच सारे आले.

आता इंडोनेशियामधील थक्क करणाऱ्या पाम तेल क्षेत्राच्या वाढीवर एक नजर टाकू. मुळात इंडोनेशियामधील नसलेले पाम वृक्ष तेथे डच लोकांनी आणले. १९४०च्या दशकात जेमतेम एक लाख हेक्टर क्षेत्रावर असलेले पाम वृक्षाचे क्षेत्र २००० साली ४२ लाख हेक्टरवर पोहोचले, तर पुढील १८ वर्षांत ते १६० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. अशीच वाढ मलेशियामध्ये देखील झाली आहे. अर्थातच ही वाढ बेसुमार जंगलतोड आणि वन्यजीव हानी करूनच झाली हे सांगायला पर्यावरणतज्ज्ञांची आवश्यकता नाही. दोन्ही देशांतील सरकारी अधिकारी आणि उत्पादक कंपन्या आणि लहान शेतकरीदेखील ही गोष्ट मान्य करत आहेत. नेमका हाच मुद्दा घेऊन त्याला पाम तेलाच्या आरोग्य असुरक्षिततेच्या मुद्दय़ाची जोड देऊन या देशांविरुद्ध झोड उठवली जात आहे. मात्र सोयाबीन, सूर्यफूल किंवा मोहरीच्या उत्पादनवाढीच्या काळात आणि औद्योगिक वाढीसाठी पाश्चिमात्य देशात झालेली अतिप्रचंड जंगलतोड आणि त्यामुळे आज आशियाई विकसनशील देशांना भोगावे लागत असलेले परिणाम याबद्दल पाश्चिमात्य देश मूग गिळून गप्प असतात. यात कोणाची बाजू घेण्याचा हेतू नसून एक गोष्ट सर्वच जण कबूल करतात. वाढती लोकसंख्या, आर्थिक प्रगती, वाढते शहरीकरण आणि बदलती जीवनशैली याच्या रेटय़ात जंगलतोडही होतच राहणार. फक्त त्याचा वेग कमी कसा करता येईल यावर एकमत झाले तरी हेही नसे थोडके.

या पार्श्वभूमीवर देखील पाम तेलाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. कारण पुढील तीन दशकांतील खाद्यतेलाची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी इतर तेलबियांखालील क्षेत्रामध्ये जेवढी वाढ आणि पर्यायाने जंगलतोड करावी लागेल त्याच्या केवळ १०-१५ टक्के एवढीच वाढ पाम वृक्षांच्या क्षेत्रात करावी लागेल, असे सॉलिडॅरिदाद सारख्या शाश्वत पाम तेल उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे आणि अनेक मोठय़ा पाम तेल उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे. कारण प्रति हेक्टरी पाम तेल उत्पादन ३,५००-४,००० किलो एवढे मिळू शकते, तर सोयाबीन सूर्यफूल आणि मोहरी तेल केवळ ५००-८०० किलो एवढेच मिळते असेही अनेक अहवाल सांगतात. दुसरे म्हणजे जंगलांच्या जागी पाम वृक्षलागवड होते तेव्हा जैवविविधता आणि काही वन्यजीवनाची काही प्रमाणात हानी झाली तरी जमिनी ओसाड न राहता त्यावर पाम वृक्ष उभे राहत असल्यामुळे इतर तेलबियांच्या तुलनेत ते केव्हाही चांगले असेही बोलले जाते.

असे हे पाम वृक्षाचे झाड आधुनिक कल्पवृक्ष ठरले आहे. आज नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते, कारण धार्मिक विधींपासून ते सामाजिक प्रथा, अन्न, याप्रमाणेच कात्या उद्योगापासून ते फर्निचर आणि शोभेच्या वस्तूंमध्ये नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग वापरला जातो. किंबहुना केरळमधील ग्रामीण अर्थव्यवस्थेत नारळाचा मोठा वाटा आहे. हे पाहता असेही म्हणता येईल की, पाम वृक्ष नारळाच्या देखील कित्येक मैल पुढे गेला असून मलेशिया आणि इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. भारतात पाम वृक्षाची लागवड करण्याचे सरकारी मदतीने बरेच प्रयोग झाले असले तरी त्यातून येणारे उत्पादन खूपच कमी आहे, कारण जवळपास वर्षभर पडणारा पाऊस यासाठी महत्त्वाचा असतो. पूर्वोत्तर क्षेत्रातील त्रिपुरा, आसाम, मणिपूर याप्रमाणेच आंध्र प्रदेशमध्ये देखील याबद्दल प्रयोग होत असले तरी सामाजिक उपयुक्तता सोडली तर त्याचा फारसा उपयोग नाही.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार  विश्लेषक )