पोर्टफोलियोचा वारंवार आढावा घेणे आवश्यक आहे हे आपण मागील काही लेखांतून पाहिले आहे. ‘माझा पोर्टफोलियो’ या स्तंभातून सुचविल्या गेलेल्या रिलॅक्सो फूटवेअर, सुंदरम क्लेटॉन, तळवळकर्स बेटर हेल्थ आणि येस बँक या शेअर्सनी गेल्या १० दिवसात वर्षांतील उच्चांकी भाव गाठले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेऊन विक्री केली असेल त्यांना फायदा निश्चितच झाला असणार. एखादा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेतला असला तरीही त्याची अपेक्षित किंमत/ बाजारभाव आला तर तो शेअर विकून नफा पदरात पाडून घेणे कधीही उत्तम. तसेच ज्या शेअरमध्ये कुठलीही हालचाल नसेल त्याचीही कारणे शोधून निर्णय घेणे आवश्यक असते. आपल्या पोर्टफोलियोतही असे काही शेअर्स आहेत काय ते शोधा आणि या दिवाळीत पोर्टफोलियोलाही नवे रूप द्या..
गेली तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटनिर्मिती आणि वितरण व्यवसायात गुंतलेली ‘इरॉस इंटरनॅशनल’ तशी सर्वाना परिचयाची असणारी कंपनी आहे. फरारी की सवारी, कॉकटेल, इंग्लिश-विंग्लीश आणि नुकताच प्रदर्शित झालेला चक्रव्यूह अशा अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करणारी ही कंपनी दोन वर्षांपूर्वी भांडवल बाजारात उतरून आपला आयपीओ तिने यशस्वी केला. कंपनी केवळ हिंदीच नव्हे तर तामिळ, मराठी आणि पंजाबीसह इतर भाषिक चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये एकंदर वितरणापैकी सुमारे ४५% हिस्सा इरॉसचा आहे. मोठय़ा शहरांखेरीज आता दुय्यम शहरांतूनही मल्टिप्लेक्स पोहचल्याने मनोरंजन व्यवसायाची वार्षिक वाढ सुमारे ११% दराने होत आहे. केवळ हिंदी चित्रपट व्यवसायच २०१६ पर्यंत सुमारे १५,००० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. येत्या आर्थिक वर्षांसाठी म्हणजे मार्च २०१३ अखेर इरॉसकडून १७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित असून, सध्या साधारण रु. १६०च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर वर्षभरात तुम्हाला चांगला फायदा कमावून देईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा