शतकभराहून जास्त काळ अस्तित्वात असलेल्या अमृतांजन या ब्रँडबद्दल काही लिहायची गरज आहे असे मला वाटत नाही. भारतातील पेन बाम उत्पादन वर्गवारीमधील अमृतांजन एक सर्वात मोठी कंपनी आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून गेल्या काही वर्षांत कंपनीने अनेक नवीन उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत. यात प्रामुख्याने वेदनाशामक (पेन मॅनेजमेंट- डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी इ.), सर्दी-पडसे यावरील उत्पादने (कन्जेशन मॅनेजमेंट- कोल्ड रब, कफ सिरप, इनहेलर इ.), सॅनिटरी नॅपकिन्स, कॉर्न कॅप्स, त्वचा रोग इ. नवीन उत्पादनांचा समावेश आहे. याखेरीज कंपनीने फ्रूटनिक नावाचे नवीन शीतपेय बाजारात आणले आहे. सध्या दक्षिण भारतात हे पेय उपलब्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने चेन्नई येथे पहिलेच वेदनाशमक केंद्र (एपीएमसी) चालू केले. त्याला प्रतिसाद उत्तम आहे. कंपनी लवकरच हैदराबाद आणि बंगळुरू येथे अशी केंद्रे सुरू करीत आहे. कु ठलेही कर्ज नसलेल्या अमृतांजन कंपनीची आर्थिक प्रगतीदेखील उत्तम आहे. मार्च २०१६ अखेर समाप्त आर्थिक वर्षांसाठी कंपनीने १९४.५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २०.५८ कोटी (गेल्या वर्षी १५.०७ कोटी) रुपयांचा नक्त नफा कंपनीने कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३५% हून अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतदेखील कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी नवीन उत्पादनांसाठी आपले विपणन संपूर्ण भारतात तसेच परदेशांत मजबूत करेल, अशी आशा आहे. उत्तम व्यवस्थापन, सक्षम आर्थिक परिस्थिती आणि गुणवत्ता यामुळे अमृतांजनसारखी स्मॉल कॅप कंपनी एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकते.

stocksandwealth@gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती % पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

Story img Loader