मागील आठवडय़ात विचारात घेतलेल्या मार्केट कॅपिटलायझेशनशी निगडीत ‘फ्री फ्लोट’ ही संज्ञा आहे. मागे आपण अभ्यासल्याप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे संबधित कंपंनीच्या समभागाचा बाजारभावाचा वितरीत (इश्यू) समभागांशी (आऊटस्टँडिंग शेअर्स) गुणाकार. परंतु वितरीत केलेले सर्वच शेअर्स बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात असे नाही. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक काढताना फक्त बाजारात उपलब्ध असलेले शेअर्स विचारात घेतले जातात. शेअर बाजारात सौद्यासाठी उपलब्ध असलेले शेअर्स म्हणजे त्या कंपनीचा फ्री फ्लोट होय. उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल.
क्ष कंपनीचे बाजार मूल्य किंवा मार्केट कॅपिटलायझेशन १०,००,००० रुपये आहे. म्हणजेच कंपनीच्या एकूण १,००,००० शेअर्सचा बाजारभाव १० रुपये आहे. (१,००,००० x १० = १०,००,०००). परंतु क्ष कंपनीने वितरीत केलेल्या १,००,००० शेअर्सपकी केवळ ३०% शेअर्स बाजारात उलाढालीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजेच फ्री फ्लोट फॅक्टर केवळ ३०/१००= ०.३ असा आहे. महणून क्ष कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पुढील प्रमाणे काढता येईल :
१,००,००० x १० = १०,००,००० x ०.३ = रु. ३,००,०००
फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन काढताना एकूण इश्यू केलेल्या शेअर्सपकी प्रवर्तकांचा हिस्सा, स्टॉक ऑप्शन, लॉक-इन केलेले शेअर्स इत्यादी सौदा न करता येणारे शेअर्स वजा केले जातात आणि केवळ त्या त्या वेळी खरेदी-विक्री उलाढालीसाठी उपलब्ध असलेले शेअर्स विचारात घेतले जातात. आपल्याकडे सप्टेंबर २००३ पासून ‘फ्री फ्लोट’वर आधारित सेन्सेक्सला सुरुवात झाली.
पोर्टफोलियोसाठी शेअर विचारात घेताना फ्री फ्लोट तपासणेही आवश्यक असते. कारण फ्री फ्लोटवरुन वरुन एकूण मार्केट कॅपिटलायझेशनपकी प्रत्यक्षात किती शेअर्स जनतेकडे किंवा सौद्यासाठी उपलब्ध आहेत याची कल्पना येते.
लुपिन ही केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील नावाजलेली कंपनी आहे. भारतातल्या सातव्या क्रमांकाच्या या कंपनीचा एकूण भारतीय बाजारपेठेतील हिस्सा २.८२% असून तो कंपनीच्या उलाढालीच्या २७% आहे. देशांतर्गत २३० ब्रॅण्ड्स विकणारी लुपिन, क्षयरोधक (Anti-TB) औषधांसाठी प्रसिद्ध आहे. खेरीज दमा, मधुमेह आणि इतर अॅण्टीबायोटिक्सचेही कंपनी उत्पादन करते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी सुमारे ८०% उत्पन्न हे भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांतून होते. अमेरिकेत कंपनीने आपली ४५ उत्पादने दाखल केली असून बहुतांश उत्पादनात लुपिन आघाडीवर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जपानसारख्या देशात एखादी कंपनी ताब्यात घेऊन जपानी बाजारपेठेत शिरकावही लुपिनने साध्य केला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत औषधी क्षेत्राने १६% वाढ नोंदवली आहे. येती पाच वष्रे ही वाढ साधारण १५-१६% राहील अशी आशा आहे. नवीन ड्रग्सवरचे संशोधन, सरकारचे किमतीवरील नियंत्रण तसेच नवीन शहरांतून आपल्या उत्पादनांचे वितरण आणि विपणन इ. बाबींवर लुपिनची मदर राहील. लुपिनने आपले निर्यातलक्ष्यी प्रकल्पाचा दर्जा गमावल्यामुळे कंपनीला जास्त करही भरावा लागत आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील कंपनीची प्रगती आणि त्यातील सातत्य बघता येणाऱ्या वर्षांतही कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.
तुमच्या पोर्टफोलियो मध्ये ‘डिफेन्सिव्ह स्टॉक’ नसेल तर लुपिनसारखा एखादा शेअर तुमच्याकडे हवाच. अर्थात असे शेअर खरेदी करून दीर्घ काळासाठी ठेवल्यावर त्याची फळे गोडच मिळणार!
लुपिन लिमिटेड
सद्य बाजारभाव रु. ५८८
प्रमुख व्यवसाय औषधी उत्पादन
भरणा झालेले भाग भांडवल रु. ८९.४८ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा ४६.८ %
पुस्तकी मूल्य : रु. ८३.५० दर्शनी मूल्य : रु. २
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. २५.८
प्राइस अìनग गुणोत्तर (पी/ई) २३.५
मार्केट कॅपिटलायझेशन रु. २७,०४० कोटी
फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन रु. १३,९०० कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ६३२ / रु. ४१२
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४६.८
परदेशी गुंतवणूकदार २८.०
बँका / म्युच्युअल फंडस् १५.४
सामान्य जनता ७.२
इतर २.६
पोर्टफोलियो : ‘फ्री फ्लोट’
मागील आठवडय़ात विचारात घेतलेल्या मार्केट कॅपिटलायझेशनशी निगडीत ‘फ्री फ्लोट’ ही संज्ञा आहे. मागे आपण अभ्यासल्याप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे संबधित कंपंनीच्या समभागाचा बाजारभावाचा वितरीत (इश्यू) समभागांशी (आऊटस्टँडिंग शेअर्स) गुणाकार.
First published on: 21-01-2013 at 01:19 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfoliofree floot