पोर्टफोलियो म्हणजे काय? त्यासाठी कुठल्या कंपन्या निवडाव्यात? कंपनी निवडतानाचे निकष, गुंतवणुकीचा कालावधी इत्यादी अनेक गोष्टी आपण गेल्या वर्षांत शिकलो. यंदाच्या वर्षांत आपण थोडे अधिक पुढे जाऊन शेअर्सचा ट्रेण्ड, रेशो अ‍ॅनालिसीस वगैरे महत्त्वाच्या खरेदीकारक बाबींचा विचार करणार आहोत..
नव्याने सुरू होत असलेल्या ‘माझा पोर्टफोलियो’ स्तंभात यंदा शिकणाऱ्या गोष्टी आणि गेल्या वर्षी शिकलेल्या गोष्टी यांचा संयुक्तपणे अभ्यास करायचा आहे. म्हणूनच या वर्षीची खरेदी जास्त शास्त्रोक्त पद्धतीने होईल अशी आशा आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन :
नवीन लेखमालेची सुरुवात आपण मार्केट कॅपिटलायझेशन या अतिशय महत्वाच्या संज्ञेने करूयात. मला खात्री आहे की, तुमच्यापकी अनेकांनी हा शब्द शेअर बाजारात अनेकदा ऐकला असेल किंवा वाचला असेल. परंतु त्याचा नक्की अर्थ तुम्हाला माहिती नसेल. खरे तर या शब्दाचा अर्थ त्या शब्दातच दडलेला आहे. मार्केट म्हणजे बाजार आणि कॅपिटलायझेशन म्हणजे एकूण शेअर्सच्या संख्येचे मूल्य! तुम्हाला एखाद्या कंपनीचे सर्व शेअर्स बाजारातून विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला किती किंमत मोजावी लागेल, ती किम्मत म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन!
मार्केट कॅपिटलायझेशन = शेअरचा बाजारभाव बाजारात वितरीत केलेले समभाग (आऊटस्टँिडग शेअर्स)
मार्केट कॅपिटलायझेशन ही खूप महत्त्वाची संज्ञा आहे कारण त्यामुळे त्या कंपनीचे बाजारमूल्य कळते. अर्थात हे बाजारमूल्य असल्याने केवळ शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपनीचेच मार्केट कॅपिटलायझेशन काढता येऊ शकते. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, हे बाजार भाव असल्याने जसा शेअर बाजारात चाड उतार होईल तसे मूल्य बदलेल. आणि बाजारभाव हा कंपनीची भूत काळातील कामगिरी तसेच अपेक्षित कामगिरी आणि इतरही अनेक बाबींवर अवलंबून असते.
मार्केट कॅपिटलायझेशनवरून कंपनीचे आकारमान आणि पत यांची कल्पना येऊ शकते. अर्थात प्रचंड मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यादेखील तोट्यात असू शकतात. उदा. रिलायन्स पॉवरसारख्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे २६,५६५ कोटी रुपये आहे तर अदानी पॉवरचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे १३,९८५ कोटी रुपये आहे. म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन जास्त म्हणजे कंपनी सरस आहे किंवा तिची कामगिरी उत्तम आहे असे नव्हे. एखादी कंपनी लार्ज कॅप आहे की मिड / स्मॉल कॅप हे जाणून घेण्यासाठी मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. शेअर बाजाराच्या एकूण मार्केट कॅपिटलायझेशनपकी लार्ज कॅपच हिस्सा ८०%, मिड कॅपचा १५% तर स्मॉल कॅपचा ५% हिस्सा मानला जातो. स्मॉल कॅप म्हणजे २,००० कोटी रुपयांपर्यंत तर मिडकॅप म्हणजे २,००० ते १०,००० कोटींपर्यंत मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या कंपन्या. लार्ज कॅप कंपन्याचे मार्केट कॅपिटलायझेशन १०,००० कोटी रुपयांच्या वर असते. मार्केट कॅपिटलायझेशन ठरविण्यासाठी कंपनीच्या शेयर्सचा बाजारभाव तसेच त्याचे किती समभाग आहेत हे महत्वाचे घटक आहेत, एखादी कंपनी केवळ तिच्या प्रचंड भागभांडवलामुळे लार्ज कॅप बनते तर एखादी तिच्या शेयरच्या बाजारभावामुळे (उदा. बॉश, नेस्ले, हीरो मोटोकोर्प इ.). निफ्टी किंवा मुंबई शेअर बाजरातील ‘अ’ गटातील कंपन्या या लार्ज कॅप आहेत.
आपण पहिले की, लार्ज कॅप कंपनी बनण्यासाठी मोठे भागभांडवल अथवा मोठा बाजारभाव असणे आवश्यक आहे. लार्ज कॅप कंपनीतील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. कारण या कंपन्यांच्या शेअर्सची उलाढाल प्रचंड असते तसेच नुकसान होण्याचा धोका तुलनेने कमी असतो. उत्तम कामगिरी करून स्माल कॅप किंवा मिड कॅप कंपनीही कालांतराने लार्ज कॅप बनू शकते. पोर्टफोलियोसाठी शेअर निवडताना आपल्याला त्या कंपनीचे वर्गीकरण करणे आवश्यक ठरते. स्मॉल अथवा मिड कॅप कंपनी जेव्हा उत्तम कामगिरीमुळे लार्ज कॅप बनते तेव्हा त्या गुंतवणुकीला ‘मल्टीबॅगर’ गुंतवणूक म्हणतात. आपल्याला यंदा असेच मल्टीबॅगर शोधायचे आहेत. मग लागणार ना आता कामाला?
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही नवरत्नातील एक सरकारी कंपनी. गेल्याच महिन्यात सरकारने या कंपनीतील आपला १०% हिस्सा विकून ५,९०० कोटी रुपयांची निर्गुतवणूक केली. देशातील सर्वात मोठ्या लोहखनिजाचे उत्पादन घेणाऱ्या या कंपनीने गेल्या आíथक वर्षांत २७.३ मेट्रिक टन उत्पादन केले. देशाच्या एकूण उत्पादनापकी १६.१% उत्पादन एकटय़ा एनएमडीसीचे आहे. गेली ५४ वष्रे खाण आणि खनिज उद्योगात आपले वर्चस्व सिद्ध केल्याने एनएमडीसी ही भारतातील एक अग्रेसर कंपनी मानली जाते. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार येत्या पाच वर्षांत भारतातील पोलादाचे उत्पादन ७८ मेट्रिक टनावरून १४९ मेट्रिक टनावर जाईल. जागतिक स्तरावरही पोलादाच्या मागणीत वार्षकि सरासरी ६% वाढ अपेक्षित आहे. देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी कंपनीने उत्पादनक्षमता वाढविण्याचे नियोजन हाती घेतले असून येत्या दोन वर्षांत कंपनीची उत्पादनक्षमता ४८ मेट्रिक टनावर जाईल. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत परदेशी कंपन्याही ताब्यात घेतल्या आहेत. यात प्रामुख्याने टांझानियातील सोन्याची खाण तसेच ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिक येथील खाणी ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात लोहखनिजाच्या किमती कमी केल्याने एनएमडीसीचा शेअर थोडा खाली आला आहे. अवैध खाणकाम, इतर घोटाळे यामुळे सरकारने खाण उद्योगावर अनेक नियंत्रणे आणली आहेत. त्यामुळे येणाऱ्या आíथक वर्षांतही उत्पादनावर परिणाम होईल मात्र मागणी वाढतीच राहिल्याने लोहखनिजाच्या किमती पुन्हा वाढतील आणि चढय़ाच राहतील अशी अपेक्षा आहे. सध्या १६० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
सद्य बाजारभाव             रु. १६१.६५
प्रवर्तक                भारत सरकार
प्रमुख व्यवसाय             खाणकाम आणि खनिज उद्योग
भरणा झालेले भाग भांडवल          रु. ३९६.४७ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा              ८० %
पुस्तकी मूल्य :  रु. ६१.५६              दर्शनी मूल्य : रु. १
प्रति समभाग उत्पन्न    (ईपीएस)        रु. १७.८७
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        ९.०५
मार्केट कॅपिटलायझेशन        रु. ६४,०९० कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक    :     रु. २०६ / रु. १५०

Story img Loader