रिझव्‍‌र्ह बँकेने पुन्हा एकदा महत्त्वाचे धोरणदर जैसे थे ठेवले असून रोख राखीव दर पाव टक्क्यांनी कमी करून ते ४.२५ टक्क्यांवर आणले आहेत. अर्थात हे अपेक्षितच होते आणि अनेक तज्ज्ञांनी रिझव्‍‌र्ह बँकेचा चलनवाढीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन तसे भाकीत वर्तविलेही होते. शिवाय सप्टेंबर महिन्यातील चलनवाढ गत दहा महिन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ७.८१ टक्के एवढी होती. तसेच अर्थव्यवस्थेत थोडी वृद्धीसदृश सुधारणा दिसत असली तरी भविष्यकालीन घटकांबाबत चिंता कायम  आहे. या सर्व ज्ञात घटकांपायी शेअर बाजार निर्णायक वळणावर नाही आणि ही गोष्ट लपूनही राहिलेली नाही. निफ्टी गेल्या पाच आठवड्यांपेक्षाही जास्त काळ १०० अंकांच्या टप्प्यात हेलकावे घेताना दिसत आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल तसेच विद्यमान आर्थिक सुधारणांवर भर देणाऱ्या धोरणामुळे महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे जेव्हा रिझव्‍‌र्ह बँकेकडून घोषणा केली गेली तेव्हा बाजारात निराशेचे  आणि विक्रीचा दबाव वाढल्याचे दिसून आले. विशेषत चढय़ा व्याजदरांमुळे परिणाम होणारे उद्योगक्षेत्र जसे स्थावर मालमत्ता, ऑटो आणि बँकिंग यावर या निराशेचा परिणाम जाणवला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि बँकिंग क्षेत्रालाही रिझव्‍‌र्ह बँकेने पुनर्बाधणी कर्जाविरूद्ध तरतूद करण्यासाठीची रक्कम दोन टक्क्यांवरून २.७५ टक्के केल्यामुळे फटका बसला आहे.
नजीकच्या कालावधीत बाजारभावनांवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच तांत्रिकदृष्टयाही निफ्टीही आपल्या ५६३५ आधार पातळीच्या खाली कोसळला आहे. त्यामुळे लघुकालीन प्रवाह मंदीचा दिसतो आहे. सप्टेंबरमध्ये बाजार सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे सावरला असला तरी अर्थव्यवस्था आजही मंदीच्या चक्रात अडकलेली आहे. ती वाढीसाठी मार्ग शोधते आहे आणि बदलांनंतरच्या परिणामांची आतुरतेने वाट पाहते आहे. गुंतवणूकदार बाजार स्थिर होईपर्यंत थांबू शकतात आणि नंतर खरेदी करू शकतात. आगामी महिन्यात निफ्टीचा आधार दर ५५००-५४५०च्या आसपास दिसतो आहे. याही महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे १०,००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून त्यांनी अत्यावश्यक असलेली रोखता (तरलता) बाजारात ओतली आहे. म्युच्युअल फंडही सकारात्मक बाजू दर्शवीत असून त्यामुळे खालच्या पातळीवरून झटपट सुधारणा होणे अपेक्षित आहे.
बाजार सुधारणेच्या परिस्थितीत एफएमसीजी, फार्मा आणि खासगी क्षेत्रातील बँका खरेदीस आकर्षक असल्याचे दिसत असून इतर क्षेत्रांच्या तुलनेत खालच्या पातळीवरून जास्त सुधारणा हेच क्षेत्र करतील असे दिसते आहे. विक्रीच्या आकड्यांवर ताण असतानाही आयटीसी आणि िहदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात वाढ झालेली दिसते. फार्मा विभागामध्ये ल्युपिनची कामगिरी चांगली राहिली आहे आणि रूपया वधारल्यामुळेही या क्षेत्राला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील सहकाऱ्यांपेक्षा जास्त चांगली असून मध्यम कालावधीत त्या चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. मालमत्ता, पायाभूत सुविधा, सार्वजनिक क्षेत्रातील उद्यम सध्यातरी टाळलेलेच बरे.
भारतीय शेअर बाजारावर स्थानिक कारणांबरोबर जागतिक घटनांचाही परिणाम होणे अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या निर्देशांकात झालेली सुधारणा ही जागतिक स्तरावरील सुधारणांसोबत जाणारी आहे. काही विशिष्ट मुद्यांवर आपल्या बाजाराचे वर्तन हे जागतिक भांडवली बाजारापासून फारकत घेत वेगळे राहिले असल्याची नोंद घेता येईल. त्यात आर्थिक सुधारणा किंवा देशांतर्गत राजकीय प्रश्नांचा समावेश करता येईल. परंतु एकूणच जागतिक घडामोडीचे काही परिणाम निश्चितच संभवतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे अपेक्षित असलेले निकाल आपल्या बाजारावर कमी कालावधीसाठी परिणाम करू शकतील.
भारतीय शेअर बाजाराचा विचार करता एक्स्चेंजमधील गुंतवणूकदार वर्गाचे एकूण आकारमान हे त्याच्या एकूण क्षमतेपेक्षा अजूनही खूप कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे समभाग आणि समभागाशी संबंधित इतर अनेक पर्यायांबाबत उदा. म्युच्युअल फंड आणि युलिप्स पुरेशी जागृती असतानाही रिटेल गुंतवणूकदार आजही आपल्या बचत ही मुदत ठेवी, विमा आणि सोने-चांदी यांच्यासारख्या मौल्यवान धातूंमध्ये वळविण्यास जास्त प्राधान्य देतात. तसेच बाजारातील अनिश्चितता आणि यंत्रणेतील पारदर्शकतेचा अभाव यांच्यामुळे समभागातील गुंतवणुकीची भीती वाढली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काही सवलती किंवा फायदे दिले जायला हवेत. त्याचप्रमाणे प्रक्रियेत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी सुदृढ यंत्रणाही उभारणे आवश्यक आहे. आपण अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पाहतो त्याप्रमाणे भारतीय कंपन्यांनाही आपल्या कामाच्या पद्धतीत जास्त कार्यक्षमता आणणे आवश्यक आहे. त्या उच्च किंमत/ उत्पन्न (पी/ई) गुणोत्तरालाही मग मागणी जरूर मिळविताना दिसतील.
आपण एमसीएक्स-एसएक्सचा एक नवीन शेअर बाजार म्हणून उदय होताना लवकरच पाहू शकतो. आपल्या व्यवसाय दृष्टिकोनात एमसीएक्स-एसएक्स जास्त आक्रमक असून आपल्या सदस्यांना ते तांत्रिकदृष्टया खूप स्पर्धात्मक व्यापार व्यासपीठ निर्माण करून देऊ शकतात. शिवाय गुणात्मक सॉफ्टवेअर क्षमता आणि धोक्याच्या प्रमापकांचा उत्तम रितीने उपयोग यांच्या माध्यमातून हे एक्स्चेंज अल्पावधीतच आपली व्याप्ती वाढवू शकतील. विक्रय वस्तूंमधील (कमॉडिटीज्) त्यांचे आतापासूनच मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असून ते इक्विटीतील प्रस्थापित स्पर्धकांशी उत्तम रितीने स्पर्धा करतील असा विश्वास त्यांच्याबद्दल लोकांना वाटू लागला आहे. तसेच ते अत्यंत कठोर आणि निरोगी स्पर्धा निर्माण करतील असेही मत आहे. ही स्पर्धा सामान्य गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडणारी निश्चितच असेल. समभाग क्षेत्राच्या सर्वसामान्यांचा सहभाग वाढीला लागण्याच्या बाबतीच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)ने एक चांगली भूमिका बजावली आहे. त्यांनी ओडीआयएन व्यासपीठ निर्माण केले असून त्याशिवाय अशी इतर अनेक व्यासपीठे आणि सुधारित सुविधा त्यांनी दिल्या आहेत.
आज शेअर बाजारात फार लोक कार्यरत नाहीत. विशेषत रिटेल विभाग थंडावलेलाच आहे. गेल्या अनेक महिन्यात आयपीओ जवळपास बेपत्ताच आहेत आणि सरकारने घोषणा केल्याप्रमाणे सार्वजनिक उद्योगातील निर्गुतवणुकीची प्रक्रियाही फारशी घडताना दिसत नाही. अलीकडच्या काळात वातावरण थोडे थंड असून पुढील एका किंवा दोन वर्षांमध्ये ते वर येऊ शकते. एमसीएक्स-एसएक्स ही या व्यवसाय विभागातील आणखी एक संधी असून पुढील काही वर्षांमध्ये त्याचे खूप उत्तम परिणाम दिसून येण्याची आशा आहे. इक्विटी मार्केटच्या रिटेल विभागामध्येही त्यातून निश्चितच सुधारणा घडून येतील.     

Story img Loader