सुधीर जोशी
आधीच अमेरिकन बाजाराच्या महागाई दरावरील प्रतिक्रियेमुळे चिंताग्रस्त झालेल्या भारतीय बाजाराला गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भारतातील घाऊक किमतींवर आधारित महागाई निर्देशांकांची आकडेवारीने झटका दिला. ऑक्टोबर महिन्यात या निर्देशांकात १२.५४ टक्क्यांनी झालेली वाढ ही सलग सातव्या महिन्यांत दोन अंकी पातळीवरील होती. परिणामी आधीच्या दोन सप्ताहातील कमाई बाजाराने गमावली. शेवटच्या दिवशी साप्ताहिक सौदे पूर्तीच्या बरोबरच, पेटीएमच्या पदार्पणातील घसरणीचा बाजाराला धक्का बसला. वाहन क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरले. सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा कमी होण्याच्या संकेतांमुळे वाहन क्षेत्रातील कंपन्यांमधे खरेदी सुरू झाली. टाटा मोटर्स व महिंद्र अॅरण्ड महिंद्रच्या समभागांनी वार्षिक उच्चांक गाठला. कुबोटा या जपानी कंपनीच्या एस्कॉर्ट्समधील भांडवल वाढविण्याच्या निर्णयाने एस्कॉर्ट्सच्या समभागात तेजी आली. परंतु बाकी सर्व क्षेत्रातील नफावसूलीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६० हजारांच्या व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी १८ हजारांच्या मानसिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्यांखाली बंद झाले.
पिडिलाईट : फेव्हिकॉल या नाममुद्रेने प्रसिद्ध असणाऱ्या या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील उलाढालीत ४० टक्के वाढ झाली. नफ्याचे गुणोत्तर कमी झाल्यामुळे निव्वळ नफा मात्र पाच टक्क्यांनीच वाढला. सामान्य ग्राहकाभिमुख असलेल्या फेव्हिकॉल, रंग व त्या निगडित रसायने या व्यवसायात कंपनीची ८० टक्के उलाढाल आहे तर औद्योगिक बाजारपेठेमधून २० टक्के उलाढाल होते. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढ या कंपनीला लाभकारक ठरेल. दीर्घ मुदतीत मोठा फायदा मिळवून देणारा हा समभाग आहे.
एशियन पेंट्स : कंपनीने सलग दुसऱ्या महिन्यांत उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. या आर्थिक वर्षांत आता एकूण वाढ २० टक्के झाली आहे. त्यामुळे बाजार या सप्ताहात कमजोर असला तरी कंपनीच्या समभागांनी मागील महिन्यांतील घसरण भरून काढली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कच्चा माल व वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीला दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात १३ टक्क्यांची घट सहन करावी लागली होती. वाढत्या किमतींचा फटका इतर कंपन्यांनाही बसला असल्यामुळे कंपनीच्या विक्रीवर या किंमतवाढीचा परिणाम होणार नाही. ऐंशी वर्षांची परंपरा व उत्कृष्ट विपणन व्यवस्था असणारी कंपनी नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यात अग्रेसर आहे. सध्याच्या बाजारभावात थोडी घसरण झाली तर ती खरेदीची संधी असेल.
सुंदरम फास्टनर्स : मुख्यत्वे वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणारी ही कंपनी उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. जगातील चार देशात व्यवसाय वृद्धी करत असलेल्या या कंपनीला चांगले प्रवर्तक लाभले आहेत. कंपनी बिगर वाहन उद्योगांसाठी व इलेक्ट्रिकल वाहनांसाठी देखील नवीन उत्पादने विकसित करीत आहे. चिपच्या तुटवडय़ामुळे वाहन उद्योगाकडून मागणी कमी झाली तरी कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील विक्रीत वार्षिक ४० टक्के वाढ साध्य केली आहे. करोना पूर्वीच्या वर्षांतील उलाढाल कंपनी या वर्षांत पार करेल. सध्याच्या बाजारभाव गुंतवणुकीसाठी योग्य आहे.
झी एंटरटेन्मेंट : भारतातील मनोरंजनांच्या विविध व्यासपीठावर ठळकपणे दिसणाऱ्या या कंपनीचे सोनी पिक्चर्सच्या भारतातील व्यवसायाबरोबर विलीनीकरण होणार आहे. गेल्या तिमाहीत उत्पन्नात १५ टक्क्यांची तर नफ्यात ४८ टक्के वाढ झाल्यावर पुढील काळात कंपनीला अधिक यशाची अपेक्षा आहे. सिनेमागृहे व मॉल उघडण्यास सुरुवात झाली आहे तसेच इतर व्यवसाय सुरू होण्याबरोबर जाहिरातींचे उत्पन्न वाढू लागेल. बाजारातील सध्याच्या भावातील खरेदी एक वर्षांच्या मुदतीत चांगला फायदा मिळवून देईल.
करोनापश्चात आर्थिक व औद्योगिक घडामोडींचा मागोवा घेत बाजारातील मोठे गुंतवणूकदार सध्या मोठय़ा प्रमाणात त्यांच्या पोर्टफोलियोत क्षेत्रीय अदलाबदल करत आहेत. त्यामुळे धातू, औषधे, बँकिंग, वाहन, एफएमसीजी व माहिती तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत खरेदी अथवा विक्रीच्या लाटा येत आहेत. पण त्यामुळे बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात मोठे बदल घडत नाहीत. बँकिंग क्षेत्राच्या निर्देशांकात मात्र गेल्या काही दिवसांत नऊ टक्क्यांची घसरण झाली आहे. अर्थचक्र व्यवस्थित सुरू होण्याबरोबर थकीत कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदींमधे घट झाल्याचा लाभ या क्षेत्राला मिळेल. त्यामुळे या क्षेत्रातील खासगी बँकांमधे गुंतवणुकीला वाव आहे. शेतीविषयक कायदे मागे घेण्याच्या घोषणेमुळे राजकीय फायद्यासाठी सरकार आर्थिक विकासाच्या धोरणांपासून दूर जात असल्याचे बाजाराला वाटते काय, की विद्यमान सरकारच्या राजकीय स्थिरतेला प्राधान्य मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.