सुधीर जोशी
कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबत फारशा अपेक्षा नसल्याने, ते वाईट आले तरी बाजारात त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटणार नाहीत. तथापि जगातील विकसित राष्ट्रांमधील महागाईतील मोठी वाढ, त्यामुळे होणारी व्याजदर वाढ तसेच रोकड सुलभता कमी करण्याचे उपाय याचा नकारात्मक पगडा बाजारावर कायम आहे. हे पाहता सध्या बाजारात आलेली तेजी किती टिकते हे पाहावे लागेल.
जागतिक बाजारातील सकारात्मक संदेशांमुळे सरलेल्या सप्ताहात बाजारात दिलासादायक बहर दिसून आला. इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंधने उठविल्यामुळे कच्च्या पाम तेलाच्या किमती गेल्या काही दिवसात ३५ टक्क्यांनी खाली आल्या. त्याचबरोबर गहू, सोयाबीन व मक्याच्या किमती देखील खाली आल्या आहेत. परिणामी हिंदूुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कन्झ्युमर, ब्रिटानियासारख्या कंपन्यांचे भाव वधारले. चीनकडून मोठय़ा आर्थिक प्रोत्साहन योजनेवर विचार होत असल्याच्या बातमीने धातू क्षेत्रातील समभाग उजळले. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा जोरदेखील कमी झाला. बाजारासाठी गेला आठवडा चैतन्यमय ठरला. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वर गेले व सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकात तीन टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
दीपक फर्टिलायजर्स :
भारतातील ही औद्योगिक रसायने व खत निर्मिती क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने उत्पन्नात २८ टक्के तर नफ्यात तब्बल १४४ टक्के वाढ साधली होती. नायट्रिक अॅसिड व अमोनियम नायट्रेट हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. रशियावरील निर्बंधांचा कंपनीला फायदा मिळाला. कारण भारतात अमोनियम नायट्रेटची २५ टक्के आयात होते. रसायनांच्या बाबत सर्व उद्योगांना चीनखेरीज आणखी एका उत्पादकाच्या भासलेल्या गरजेचा कंपनीला फायदा मिळत आहे. ६००-६५० रुपयाच्या पातळीत कंपनीच्या समभागात गुंतवणूक करण्याची संधी आहे.
जेके पेपर :
ही एक ब्रँडेड पेपर, कोटेड पेपर आणि पॅकेजिंग बोर्ड तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. मार्चअखेर सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांत कंपनीच्या उत्पन्नात जवळजवळ ५० टक्के वाढ तर नफ्यात २५ टक्के वाढ झाली होती. मार्चनंतर साधारणपणे कागदांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अधिग्रहण केलेल्या सिरपूर पेपर मिलमधील उत्पादन क्षमता वाढ व गुजरातमध्ये सुरू केलेल्या पॅकेजिंग बोर्ड उत्पादनामुळे ही प्रगती झाली आहे. फोटोकॉपीसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदामध्ये कंपनी सर्वात आघाडीवर असून या बाजारपेठेतील २५ टक्के वाटा या कंपनीचा आहे. डिजिटल व्यवहारांद्वारे होणाऱ्या खरेदीमुळे पॅकेजिंगला वाढलेली मागणी व एकल उपयोगाच्या प्लास्टिकवरील बंदी हे कागद उत्पादकांना वरदान आहे.
टाटा मोटर्स :
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्सने २.३१ लाख वाहनांची विक्री केली जी मागील वर्षांच्या याच काळात १.१४ लाख होती. यामध्ये इलेक्ट्रिकल वाहनांचा वाटा ९,२८३ होता. भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये सध्या कंपनीचा ७० टक्के वाटा आहे. कंपनी ‘अेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रकची इलेक्ट्रिकल आवृत्ती काढणार आहे. तिला सर्व उद्योगांतून चांगली मागणी आहे. समूहातील इतर कंपन्यांच्या सहकार्याने टाटा मोटर्स इलेक्ट्रिकल वाहनांसाठी लागणारी संपूर्ण परिसंस्था तयार करून आघाडीवर राहणार आहे. सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठय़ात सुधारणा होत आहे, ज्यामुळे कंपनीच्या चीनमधील उत्पादनावर परिणाम झाला होता. अॅल्युमिनियम व पोलादाच्या किमती आता स्थिर होत आहेत. चीनची प्रोत्साहन योजना चीनमधील इतर वाहन उद्योगांप्रमाणे टाटा मोटर्सच्या जग्वार गाडय़ांना फायद्याची ठरेल. कंपनीच्या वार्षिक सभेत व्यवस्थापनाने भविष्याबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या कंपनीची, टाटा टेक्नॉलॉजी ही उपकंपनी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे. टाटा मोटर्ससाठी ही सकारात्मक घडामोड असेल. सध्या ४४० रुपयांच्या पातळीवर कंपनीच्या समभागात एक ते दोन वर्षांच्या काळासाठी गुंतवणुकीची संधी आहे.
टाटा केमिकल्स :
जगातील सोडा अॅश उत्पादकांमधील पहिल्या पाच कंपन्यांत गणली जाणारी टाटा केमिकल्स ही एक ७८ वर्षांची प्रस्थापित कंपनी आहे. टाटा समूहात नवीन संचालकांनी राबवलेल्या पुनर्रचना योजनेनंतर कंपनीचे मूलभूत रसायन उद्योगावर लक्ष केंद्रित झाले आहे. सोडा अॅश, सोडियम काबरेनेटसारख्या मूलभूत रसायनांचा कंपनीच्या उत्पन्नात ७५ टक्के वाटा आहे. त्यामुळे सध्या जागतिक बाजारात सोडा अॅशच्या वाढलेल्या किमती कंपनीच्या पथ्यावर पडल्या आहेत. शेतकी रसायने उत्पादनांच्या बाजारात कंपनीची उपकंपनी रॅलीज कार्यरत आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत टाटा केमिकल्सने उत्पन्नात २३ टक्के तर नफ्याच्या प्रमाणात १८ टक्के वाढ झाली होती. या वर्षांत कंपनीची कामगिरी अशीच चालू राहण्याची अपेक्षा आहे. कंपनीचा समभाग सध्याच्या ८४० रुपयांच्या पातळीपासून मोठी उसळी घेऊ शकतो.
जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यातून जाण्याची भीती काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. या भीतीमुळेच जागतिक वायदे बाजारात खाद्यतेल व अन्नधान्याच्या किमती खाली येत आहेत. खनिज तेलाच्या किमतीदेखील कमी होत आहेत. जगातील ८.६ टक्क्यांची महागाईतील वाढ व त्यामुळे होणारी व्याजदर वाढ तसेच रोकड सुलभता कमी करण्याचे उपाय याचा देखील नकारात्मक पगडा बाजारावर आहे. त्यामुळे सध्या बाजारात आलेली तेजी किती टिकते हे पाहावे लागेल. टीसीएस व डी-मार्टच्या निकालांनंतर पहिल्या तिमाही निकालांची सुरुवात झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपन्यांकडून चांगल्या कामगिरीची फारशी अपेक्षा नाही. बाजाराने हे गृहीत धरले आहे. त्यामुळे निकालांनंतरही नकारात्मक प्रतिक्रिया येणार नाही.
सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:
- टाटा मेटॅलिक्स, टाटा एलेक्सी, एल अँड टी इन्फोटेक, एल अँड टी टेक्नॉलॉजी, एसीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, डेल्टा कॉर्पोरेशन, जिंदाल स्टील या कंपन्या मार्चअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
- टेक्नो इलेक्ट्रिक अॅण्ड इंजिनीयिरग कंपनी समभागांच्या पुनर्खरेदीची (बायबॅक) घोषणा करेल.