|| सुधीर जोशी
मागील वर्षापेक्षा सध्याच्या करोना लाटेची तीव्रता जास्त असली तरी बराचसा पूर्वानुभव सरकार व उद्योगांच्या गाठीशी आहे. शिवाय लसीकरणाचा उपाय सापडला आहे आणि मोहिमरूपात ती सर्वत्र सुरूही आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीयुक्त अस्वस्थता, सावधगिरी यांसह आशेचा एक जागता कोपराही आहे.
करोना रुग्णांची विक्रमी वाढ आणि अनेक राज्यांतील एकापाठोपाठ वाढणारे टाळेबंदीचे निर्बंध यामुळे बाजारातील संकट गहिरे बनू लागले आहे. चारच दिवस झालेल्या व्यवहारात सप्ताहाच्या अखेर प्रमुख निर्देशांक सतत तिसऱ्या सप्ताहात घसरणीने बंद झाले; परंतु घसरणीमध्ये घबराट दिसली नाही.
निफ्टी या बाजारातील महत्त्वाच्या निर्देशांकाला गेल्या सप्ताहात २५ वर्षे पूर्ण झाली. १९९५ ला आधारभूत वर्ष मानून १९९६ साली १,१०७ अंशांवर सुरुवात करून त्याने आता १४,३०० चा पल्ला गाठला आहे. कंपन्यांच्या भांडवली बाजारातील मूल्याप्रमाणे निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्या व त्यांचा निर्देशांकातील प्रभाव यात बदल होत असतात. निफ्टीच्या ५० समभागांपैकी एचडीएफसी बँक, रिलायन्स, एचडीएफसी, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी, एसबीआय, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅब्ज, टाटा स्टील, ग्रासिम, हिरो मोटर्स आणि हिंडाल्को या १३ कंपन्यांनी आपले निफ्टीमधील स्थान गेली २५ वर्षे कायम राखले आहे. यातच त्यांच्या बाजारातील कामगिरीची व गुंतवणूक पात्रतेची प्रचीती येते. मात्र इतर ३७ कंपन्या वगळल्या जाऊन नवीन कंपन्यांचा समावेश झाला. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या निवडताना त्यांचा निफ्टीमधे समावेश असणे हा निकष महत्त्वाचा ठरतो.
एचडीएफसी बँकेने मार्चअखेर समाप्त आर्थिक वर्षात नफ्यामध्ये १८ टक्के वाढ जाहीर केली आहे जी सध्याच्या काळात समाधानकारक म्हणता येईल. बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायावर काही निर्बंध आहेत. त्याला कारण होते ग्राहकांच्या वाढीव मागणीमुळे माहिती तंत्रज्ञान सुविधांवर आलेला ताण व परिणामी ग्राहकांना सहन करावा लागलेला मनस्ताप; पण खासगी बँक व्यवसायातील मानक समजली जाणारी ही बँक अशा संकटातून नक्कीच मार्ग काढेल. बँकेच्या ‘कासा रेशो’त झालेली २७ टक्के वाढ, पुरेशी भांडवल उपलब्धता, करोनामुळे होऊ शकणाऱ्या बुडीत कर्जांसाठी पुरेशी तजवीज अशा निकषांवर बँकेचे समभाग सध्याच्या पातळीत गुंतवणुकीसाठी योग्य आहेत.
ओमानमधील व्यवसायातून बाहेर पडल्यामुळे जिंदल आयर्न अँड स्टीलच्या कर्जाचे प्रमाण कमी होईल. वाढत्या पोलाद किमतींमुळे कंपनीच्या समभागांमध्ये इतर स्टील कंपन्यांपेक्षा सरस असे तेजीचे वातावरण आहे. कंपनीच्या मार्चअखेर निकालामध्ये याचे मोठे परिणाम दिसतील.
नेस्लेने मार्चअखेरच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात १४.६ टक्के वाढ जाहीर करून अंतरिम लाभांशाची घोषणा केली. पुन्हा सुरू झालेली टाळेबंदी ही कंपनीच्या तयार खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला पूरक ठरेल. मागील वर्षाच्या अनुभवावरून कंपनी वितरकांकडे पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेत आहे तसेच अनेक नवीन उत्पादने बाजारात आणत आहे. निकालांनंतर आलेल्या विक्री दबावामुळे सध्याचा भाव खरेदीयोग्य पातळीवर आल्यामुळे दीर्घ मुदतीसाठी खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
एसीसीच्या मार्चअखेरच्या तिमाहीतील उत्पन्नात २२.५ टक्के, तर नफ्यात तब्बल ७४ टक्के वाढ झाली. सरकारच्या पायाभूत सुविधांवर खर्च वाढविण्याच्या धोरणाचा कंपनीला फायदा मिळेल. गेल्या सप्ताहात टाळेबंदीच्या तात्कालिक कारणांमुळे सिमेंट कंपन्यांचे समभाग खाली आले. श्री सिमेंट, अल्ट्राटेक, अंबुजा अशा इतर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत एसीसीचे समभाग किफायतशीर किमतीत मिळत आहेत. वर्षभराच्या मुदतीसाठी या समभागात गुंतवणुकीला वाव आहे.
प्राणवायूच्या कमतरतेची परिस्थिती असताना, एक महिन्यापूर्वी या सदरात सुचविलेल्या एव्हरेस्ट कान्टो या सिलिंडर्स बनविणाऱ्या कंपनीच्या समभागात सप्ताहातील चारही दिवस वरचे सर्किट लागले. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा आधीच नाजूक अवस्थेतील भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी संकटात टाकणारा ठरणार आहे. देशव्यापी टाळेबंदी जरी जाहीर झाली नाही तरी कैक भागांत टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २०२० सालापेक्षा सध्याच्या लाटेची तीव्रता जास्त असली तरी बराचसा पूर्वानुभव सरकार व उद्योगांच्या गाठीशी आहे. लसरूपी उपाय सापडला आहे. लसीकरणाच्या वेगाकडे व वार्षिक निकालांकडे लक्ष ठेवून बाजार आशावादी आहे.
sudhirjoshi23@gmail.com