सुधीर जोशी
जगभरात सुरू असलेल्या मोठय़ा उलथापालथीत, भारतीय बाजार चिवटपणे टिकून आहे. हे कशामुळे? बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ या काळात झाली आहे. व्याजदर कमी असल्यामुळे गुंतवणुकीसाठी दुसरे मार्ग उपलब्ध नाहीत. त्यामुळे म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणुकीचा ओघ आटलेला नाही. भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या प्रगतीवर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून असल्याचेच हे द्योतक आहे..
बाजारात गेले अनेक महिने चर्चेत राहिलेला अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या (फेड) व्याजदरवाढीचा निकाल सरल्या सप्ताहात लागला. अपेक्षित अशी पाव टक्का दरवाढ झाली आणि एका अनिश्चित घटकाचा अंत झाला. फेडच्या अध्यक्षांनी अमेरिकी अर्थव्यवस्था अजून चार- पाच व्याजदरातील वाढ सहज पेलू शकेल, असा विश्वास व्यक्त केला आणि मंदी येण्याची शक्यता फेटाळून लावली. जागतिक बाजारात त्याचे स्वागत झाले. भारतीय बाजारातही त्याचे पडसाद उमटले. त्याचबरोबर खनिज तेलाची किंमत शंभर डॉलरच्या खाली येण्याने व रशियाकडून स्वस्त पुरवठा मिळण्याच्या शक्यतेने बाजारात उत्साह संचारला. लागोपाठ दुसऱ्या सप्ताहात बाजारात तेजीचा संचार होऊन प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांनी वर आले.
भारत इलेक्ट्रॉनिक्स :
भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ घोषणेचा व संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या धोरणाचा फायदा मिळवू शकणारी भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी युद्धासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांमध्ये वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक घटक बनविते. कंपनीकडे ५६ हजार कोटींच्या अपूर्ण मागण्या आहेत. सध्या १० ते १५ टक्के होणारी निर्यात वाढविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सरकारने आयात बंदी केलेल्या १०१ संरक्षण उत्पादनांपैकी ५५ उत्पादने ही कंपनी बनविते तर २३ नव्या उत्पादनांवर काम चालू आहे. सध्याचा भाव गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.
भारत फोर्ज :
ही पुणेस्थित भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी वाहन तसेच ऊर्जा, तेल व वायू, खाणकाम, रेल्वे, सागरी तसेच हवाई क्षेत्र, संरक्षण उत्पादने अशा अनेक उद्योगांना फोर्ज करून बनविलेले धातूंचे सुटे भाग पुरविते. कंपनीचा कारभार अमेरिका, युरोप व भारतात विभागलेला आहे. विद्युत वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या परदेशातील अॅल्युमिनियम फोर्जिग बनविणाऱ्या उप-कंपनीला चांगला व्यवसाय मिळत आहे. भारतातही संघवी फोर्जिग, जेएस ऑटोकास्टसारख्या इतर लहान कंपन्या आपल्या अधिपत्याखाली घेऊन कंपनी अपारंपरिक ऊर्जा तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील आपला व्यवसाय वाढवत आहे. गेल्या काही महिन्यांत सेमीकंडक्टर चिपच्या तुटवडय़ाची कंपनीला झळ बसली असली तरी आता ती परिस्थिती सुधारत आहे. दोन ते तीन वर्षांच्या उद्दिष्टाने कंपनीत गुंतवणूक करता येईल.
परसिस्टन्ट सिस्टीम्स:
या कंपनीने मीडिया अॅजिलिटी या गूगल क्लाउडशी संबंधित महत्त्वाच्या कंपनीचे अधिग्रहण केले. त्यामुळे कंपनीला यापूर्वीच्या मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, सेल्सफोर्ससारख्या कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या क्लाउड परिसंस्थेशी निगडित सेवा आणि प्रणाली व्यवसायाला बळ मिळेल. डिसेंबरअखेर कंपनीची मिळकत ४४ टक्क्यांनी वाढून ९२८ कोटी, तर नफा ३७ टक्क्यांनी वाढून १७३ कोटी झाला होता. डिजिटल अभियांत्रिकी क्षेत्रातील मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ अपेक्षित असून व्यवस्थापनाला एक ते दोन वर्षांत एक अब्ज डॉलरची मिळकत अपेक्षित आहे. शिल्लक रोकड वापरून कंपनी अशी व्यवसायवृद्धी करीत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी व्यवसायांचे अधिग्रहण होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभागासाठी या कंपनीचे समभाग जमवणे फायद्याचे ठरेल.
गेले सहा महिने परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. एकूण २६ अब्ज डॉलरची विक्री त्यांनी केली. भारतीय बाजार त्यांच्यासाठी इतर उभरत्या अर्थव्यवस्थेतील देशांपेक्षा महाग आहेत. अमेरिकेतील व्याजदर वाढीला सुरुवात आणि या वर्षांत अजून पाच वेळा दरवाढ करण्याचे संकेत तसेच डॉलरमधील मूल्यवाढ या त्यांच्याकडून विक्रीचा मारा करायला पूरक बाबी आहेत. तरीही भारतीय बाजार चिवटपणे टिकून आहे. बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ या काळात झाली आहे आणि व्याजदर कमी असल्यामुळे गुंतवणुकीसाठी दुसरे किफायतशीर मार्ग देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणुकीचा ओघ आटलेला नाही. भारतीय उद्योगांच्या प्रगतीवर गुंतवणूकदारांचा विशवास टिकून आहे. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात ४८ टक्के वाढ झाली जी करोनापूर्व काळापेक्षाही ४० टक्क्यांनी जास्त आहे. ही आकडेवारी आर्थिक प्रगती व सरकारच्या कर संकलनातील कार्यक्षमता दाखविते. सरकारला वित्तीय तूट कमी करण्यासाठी याचा फायदा होईल. बाजारातील अशा परस्परविरोधी घटकांची रस्सीखेच यापुढे अशीच सुरू राहील. त्यात चीन, हाँगकाँग, द.कोरियाबरोबर जर्मनीमध्ये देखील करोना विषाणूने परत डोके वर काढले असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे युद्धाबरोबर टाळेबंदीमुळे देखील जागतिक माल वाहतुकीमध्ये पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बाजाराला स्थैर्य लाभण्यासाठी वाट पाहावी लागेल.
sudhirjoshi23@gmail.com