सुधीर जोशी

बाजाराने सध्या जरी एक पाऊल मागे घेतले असले तरी ते तात्पुरतेच ठरावे. जागतिक अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदाला येत आहे. भारतातही थोडय़ा धिम्या गतीने निर्मिती उद्योग पूर्वपदाला येत आहे. जून महिन्याचे वाहन विक्रीचे आकडे उत्साहवर्धक आहेत. जूनअखेर तिमाहीच्या कंपन्यांच्या निकालाकडे म्हणूनच बाजाराचे बारकाईने लक्ष असेल.

स प्ताहाच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून जाहीर झालेल्या प्रोत्साहन योजनांमध्ये कर्ज हमी योजनांवर भर असल्यामुळे बाजाराने त्यांना सपशेल दुर्लक्षित केले. निर्देशांकांच्या नव्या विक्रमी टप्प्यावरून गुंतवणूकदारांनी नफावसुलीचे धोरण अवलंबिले. गेला आठवडाभर बाजारावर मंदीवाल्यांचे वर्चस्व राहिले. औषधनिर्मिती क्षेत्राचा निर्देशांक सोडून बाकी सर्व क्षेत्रांत नफावसुलीचा दबाव पाहायला मिळाला.

विद्यमान २०२१ सालाचे पहिले सहा महिने संपताना बाजारातील प्रमुख व क्षेत्रीय निर्देशांकांवर नजर टाकली तर निफ्टीच्या धातू निर्देशांकाने सर्वात जास्त – ६१ टक्के परतावा दिला आहे. त्या खालोखाल सरकारी बँका (४३ टक्के) व माहिती तंत्रज्ञान (१९ टक्के) क्षेत्राचा नंबर लागतो. पहिल्या सहा महिन्यांत निफ्टी-५०चा परतावा १३ टक्के होता तर मिडकॅपचा २६ टक्के व स्मॉलकॅपचा ३६ टक्के होता. टाळेबंदीच्या काळात जगात सर्वत्र निर्मिती क्षेत्रावर परिणाम झाला. पण जशी टाळेबंदी उठत गेली व साठलेल्या मागणीचा फायदा धातू क्षेत्रास मिळाला.

चीनच्या कार्बन नियंत्रण उपायांमुळे तेथील पोलाद कारखाने बंद झाले तसेच चीनने निर्यातीवर कर वाढवले. ज्यामुळे जागतिक बाजारात पोलादाच्या किमती वाढू लागल्या. त्याचा फायदा भारतीय पोलाद उत्पादकांना झाला. स्टील कंपन्या अतिरिक्त नफ्याचा वापर कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी करीत आहेत. धातू कंपन्यांत नवीन क्षमता वाढण्यास वेळ लागतो व करोनानंतर निर्मिती क्षेत्रातील वाढीस आता जरा सुरुवात झाली आहे त्यामुळे अजूनही या क्षेत्रातील टाटा स्टील, सेल, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टीलसारख्या कंपन्यांमध्ये सध्याच्या घसरणीच्या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

‘आयआरसीटीसी’च्या मार्चअखेर तिमाही नफ्यात अपेक्षेप्रमाणे २३ टक्के घट झाली. रेल्वे प्रवाशांचे तिकिटांचे आरक्षण, खानपान सेवांवर मक्तेदारी असणारी ही कंपनी टाळेबंदीच्या आपत्तीची बळी आहे. बहुतेक सर्व सेवांचे आगाऊ पैसे घेणारी ही कंपनी संपूर्ण कर्जमुक्त आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्या की लगेचच ती नफा कमावू लागेल. रेल्वेच्या खासगीकरणामध्ये ११ विभागांसाठी ही कंपनी पात्र ठरली आहे. सध्याचा हप्त्याहप्त्याने समभाग जमविले तर भविष्यात चांगली मिळकत होऊ शकेल.

सोलारा अ‍ॅक्टिव्ह फार्मा सायन्स या मुख्यत्वे एपीआय पुरविणाऱ्या कंपनीच्या मार्चअखेरच्या तिमाहीचे निकाल कंपनीच्या विशाखापट्टनम कारखान्यातील उत्पादन वाढीची साक्ष देतात. कंपनीने आयबुप्रोफेन या एपीआयची उत्पादन क्षमता वाढवून जगात दुसरा क्रमांक गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोलाराकडे पन्नास मोलेक्यूलच्या उत्पादनांची क्षमता, दोन संशोधन केंद्रे व सहा उत्पादन कारखाने आहेत. कंपनीला चीनमधील कंपन्यांवरील अवलंबन कमी करण्यासाठी पर्यायी स्रोत शोधण्याच्या अनेक कंपन्यांच्या प्रयत्नांचा फायदा होईल. अरोरे या कंपनीचे अधिग्रहण करून सोलारा कंत्राटी संशोधन सेवा पुरविण्याचा व्यवसाय वाढवीत आहे. कंपनीकडे या सेवेसाठी नुकत्याच चार नवीन मोठय़ा औषध कंपन्या ग्राहक म्हणून जोडल्या आहेत. युरोपियन औषध संचालनालयाने कंपनीच्या रॅनिटिडाईन हायड्रोक्लोराईड या औषधी घटकास गुणवत्ता प्रमाणपत्र बहाल केल्याच्या बातमीने कंपनीच्या समभागाने शुक्रवारी उसळी घेतली होती. बाजाराच्या घसरणीच्या काळात या कंपनीत केलेली गुंतवणूक मोठा फायदा देईल.

पीटीसी इंडिया लिमिटेड ही कंपनी विद्युत ऊर्जा क्षेत्रात दलालीचा व्यवसाय करते. मोठय़ा ऊर्जा प्रकल्पातून वीज घेऊन ती लहान-मोठय़ा उद्योगांना दीर्घ मुदतीच्या करारावर किंवा अल्प काळातील गरजांसाठी पुरविते. कंपनीचे राज्य विद्युत मंडळांबरोबर व अन्य लहान कंपन्या ज्यांचे स्वत:च्या गरजेसाठी लहान विद्युत संच आहेत त्यांच्याबरोबर करार आहेत. लहान अवधीमध्ये होणारा वीजपुरवठय़ाचा असमतोल ही कंपनी सांभाळते व त्याबद्दल दलाली मिळविते. टाळेबंदी शिथिल झाल्यावर उद्योगांची विजेची मागणी वाढेल व कंपनीला अधिक व्यवसाय मिळेल. कंपनीची वार्षिक उलाढाल १६ हजार कोटींच्या घरात आहे. लाभांश वाटपातही तिचा नियमितपणा आहे. सध्याचा १०३ रुपयांचा बाजारभाव लाभांशरूपी चांगला परतावा व दीर्घ मुदतीतील फायद्यासाठी आकर्षक आहे.

गेल्या सप्ताहात बाजाराने जरी एक पाऊल मागे टाकले असले तरी जागतिक अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदाला येत आहे. भारतातही थोडय़ा धिम्या गतीने निर्मिती उद्योग पूर्वपदाला येत आहे. जून महिन्याचे वाहन विक्रीचे आकडे उत्साहवर्धक आहेत.

चारचाकी वाहने व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये वाढ करून कंपन्या कच्च्या मालाचा वाढीव खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यात यशस्वी होत आहेत. जूनअखेर तिमाहीचे निकाल पर्व या सप्ताहापासून सुरू होईल. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असल्याचे संकेत मिळत असले तरी प्रत्यक्षात कुठल्या कंपन्यांच्या उलाढालीवर किती परिणाम झाला हे आता कळू लागेल.

Story img Loader