सुधीर जोशी
सरलेल्या आर्थिक वर्षांत केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत असे सकारात्मक संकेत मिळत आहेतच. मात्र महागाईमुळे सर्वच कंपन्यांच्या नफ्यावर सध्या दबाव दिसून येतो आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी प्रत्येक मोठय़ा घसरणीत अभ्यास करून चांगल्या कंपन्यांच्या कंपन्यांच्या समभाग खरेदीवर लक्ष केंद्रित करायला हवे.
जागतिक बाजारातील विशेषत: अमेरिकी बाजारातील चढ-उतारांचा मागोवा घेत भारतीय भांडवली बाजार सरल्या सप्ताहात हेलकावे खात होता. याचबरोबर अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांवरही बाजार प्रतिक्रिया देत होता. महागाईने गृहोपयोगी वस्तू (एफएमसीजी) कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट होण्याची भीती हिंदूस्थान युनिलिव्हरच्या निकालांनी काहीशी कमी केली. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांचे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या तळाला गेलेल्या किमती आता गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटू लागल्या आहेत. चांगल्या निकालांच्या अपेक्षेने रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग रोजच वधारत होते. भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार सुरू होते. साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांक किरकोळ फरकाने खाली बंद झाले.
आयसीआयसीआय बँक :
खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयसीआयसीआय बँकेने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा दमदार निकाल जाहीर केले. वार्षिक तुलनेत मार्चअखेर संपलेल्या वर्षांत नफा ४४ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेच्या ठेवींमधे १४ टक्क्यांची तर बचत व चालू खात्यात २० टक्क्यांची वाढ होऊन कासा गुणोत्तरात वाढ झाली आहे. बँकेने माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सर्वच व्यवसायात अंगीकारून एक ग्राहकाभिमुख डिजिटल परिसंस्था तयार केली आहे. बँकेच्या कर्ज वाटपाच्या आकडेवारीत लक्षणीय सुधारणा होत आहे. सध्याच्या घसरणीच्या कळात टिकून राहिलेले या बँकेचे समभाग एक वर्षांच्या मुदतीमधे चांगला नफा मिळवून देतील.
एबी कॅपिटल :
आदित्य बिर्ला कॅपिटल या बिगरबँकिंग वित्तीय सेवा कंपनीमधे आयुर्विमा व सामान्य विमा, मालमत्ता व्यवस्थापन, म्युच्युअल फंड, ब्रोकिंग, पायाभूत सुविधांसाठी कर्जपुरवठा, आर्थिक सल्ला असे अनेक व्यवसाय अंतर्भूत आहेत. कंपनी एका मोठय़ा व्यवसाय समूहापैकी असून त्यांचा भागभांडवलात ७० टक्के हिस्सा आहे. नुकतीच आयसीआयसीआय बँकेच्या श्रीमती विशाखा मुळय़े यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक झाली आहे. एबी कॅपिटलला त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होईल. कंपनीने गेल्या नऊ महिन्यांत आधीच्या वर्षांपेक्षा उत्तम कामगिरी नोंदवली आहे. कंपनीमधील गुंतवणूक दीर्घ मुदतीमध्ये फायद्याची व कमी जोखमीची ठरेल.
बजाज फायनान्स :
कंपनीने चौथ्या तिमाहीत मजबूत कामगिरी करत नफ्यामध्ये ८० टक्के वाढ नोंदवली. मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत नफ्यात ५९ टक्के वाढ झाली आहे. कंपनी अद्ययावत तंत्रज्ञानावर खर्च करीत असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तरीही निकालानंतर समभागात झालेली घसरण ही खरेदीची संधी आहे.
हिंदूस्थान युनिलिव्हर :
कंपनीने पहिल्यांदाच ५० हजार कोटी मिळकतीचा टप्पा पार केला. वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या मिळकतीमध्ये झालेल्या दहा टक्के वाढीत उत्पादनांच्या किमती वाढीचाही वाटा आहे. कंपनीने निवडक उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ करून वाढत्या महागाईचा चांगला मुकाबला केला आहे. इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे या मुख्य कच्च्या मालाचे दर वाढत आहेत. मात्र ही बंदी फार काळ टिकणार नाही. एफएमसीजी क्षेत्रातील या अग्रणी कंपनीच्या समभागात आता आणखी पडझडीची शक्यता कमी वाटते.
अतुल लिमिटेड :
या रसायने बनविणाऱ्या कंपनीच्या वार्षिक उलाढालीमधे २९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी नफ्यामध्ये घट झाली. ही घट वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमती व वाहतूक खर्चामुळे झाली आहे. जगातील मोठय़ा कंपन्यांकडून वाढणाऱ्या मागणीचा व भारताकडे कच्च्या मालाचा चीननंतरचा दुसरा पुरवठादार म्हणून पाहण्याच्या धोरणाचा कंपनीला फायदा मिळेल. कंपनीने आतापर्यंत ६०० कोटी विस्तार योजनेवर खर्च केले आहेत. शिवाय आणखी एक हजार कोटी पुढील दोन वर्षांत खर्च करण्याची कंपनीची योजना आहे. त्याचा फायदा कच्च्या मालाची किंमत कमी करण्यावर होईल. कंपनीचा नफा गेल्या दहा वर्षांत ८० कोटींवरून ६०८ कोटींपर्यंत वाढला आहे. सध्या घसरलेल्या भावात गुंतवणुकीची संधी आहे.
अर्थ खात्याच्या अंदाजाप्रमाणे एप्रिल महिन्याचे वस्तू आणि सेवाकर संकलन (जीएसटी) दीड लाख कोटींचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. सरकारच्या थेट कराचे उत्पन्न या वर्षी गेल्या वर्षांच्या तुलनेत ४९ टक्क्याने वाढले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत असे सकारात्मक संकेत मिळत आहेतच. मात्र महागाईमुळे सर्वच कंपन्यांच्या नफ्यावर सध्या दबाव दिसून येतो आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेले काही महिने भारतीय भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री करत आहेत. मात्र बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा थेट अथवा म्युच्युअल फंडांद्वारे केलेल्या गुंतवणुकीमुळे सतत वाढत आहे. त्यांच्याबरोबरीने देशांतर्गत वित्तीय संस्थांनी बाजारात खरेदी कायम ठेवून बाजाराला तारले आहे. यामुळे बाजाराचे निर्देशांक गेल्या ऑक्टोबरच्या ऐतिहासिक उच्चांकापासून फक्त अडीच टक्क्यांनी खाली आले आहेत. विदेशी गुंतवणूकदार परत आले की, बाजार प्रचंड वेगाने वर जाईल. असे घडायला थोडा वेळ लागला तरी तोपर्यंत प्रत्येक मोठय़ा घसरणीत चांगल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करायला हवेत.
sudhirjoshi23@gmail.com