|| सुधीर जोशी

खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत वाढत असल्याच्या परिणामाने बाजाराची या सप्ताहाची सुरुवात सेन्सेक्सच्या एक हजार अंकांच्या घसरणीने झाली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीआधी बाजारात साशंक वातावरण होते. पण बैठकीनंतर व्याजदरांत कुठलेही बदल न करता बाजारातील रोकड तरलता कमी करण्याचे सहज सोपे उपाय व महागाई आवाक्यात राहण्याचे रिझर्व्ह बँकेचा अंदाज बाजाराला दिलासा देणारा ठरला. पण अखेरच्या दिवशी अमेरिकेच्या महागाईचे चिंता निर्माण करणारे आकडे आले व त्यानंतर फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर अधिक जोमाने वाढविले जाण्याच्या शक्यतेने बाजाराला पुन्हा चिंताग्रस्त केले. सप्ताहाचा शेवट सेन्सेक्स आणि निफ्टीमधील एक टक्क्यांच्या घसरणीने झाला.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

टाटा स्टील: कंपनीचे डिसेंबरअखेरचे निकाल अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट आले. कंपनीने नऊ महिन्यांच्या कालावधीत एकत्रित स्तरावर ३१ हजार कोटींचा नफा कमावला. जो गेल्या वर्षांत केवळ एक हजार कोटी होता. तरीदेखील कंपनीचे समभाग निकालांनंतर वर जात नाहीत. याला कारण कंपनीचा भारतीय व्यवसाय भरघोस नफा कमावतो आहे, पण युरोपियन व्यवसाय अजून तितकासा फायदेशीर नाही तसेच होणारा नफा कर्जफेड करण्यासाठी वापरला जातो. मात्र कर्जाची पातळी कमी होत जाऊन दीर्घ मुदतीत समभाग नवे उच्चांक गाठतील.

स्टेट बँक: डिसेंबरअखेरच्या तिमाहीत नफ्यात ६२ टक्के वाढ होऊन तो ८४३२ कोटी झाला. बँकेला थकीत कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीमध्ये ३३ टक्के घट झाली. नवीन थकबाकीचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात खाली आले. पण बँकेच्या कर्ज वाटपात म्हणावी तेवढी वाढ झाली नाही. गृह कर्जे ३३ टक्क्यांनी वाढली पण व्यावसायिक कर्ज – जो बँकेचा सर्वात मोठा व्यवसाय आहे – फारशी वाढलेली नाहीत. बँकेच्या मुदत ठेवी नऊ टक्क्यांनी वाढल्या तर ‘कासा रेशो’ १० टक्क्यांनी वाढला. पुढील वर्षांत सरकारच्या मोठय़ा भांडवली गुंतवणूकीच्या धोरणाचा व कर्ज वाटपात आलेल्या सुसूत्रतेचा बँकेला फायदा होईल. बँकेचे समभाग दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी पात्र आहेत. 

इंडियन हॉटेल्स: इंडियन हॉटेल्सने दोन हजार कोटींच्या हक्क भाग विक्री करून कर्जाची परतफेड केली आहे. कर्जाचे भांडवलाशी असलेले गुणोत्तर ०.९३ वरून ०.३२ वर आले आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात आल्यामुळे इंडियन हॉटेल्ससाठी विमानातील खानपान सेवेची नवी संधी निर्माण होईल. डिसेंबरअखेर कंपनीच्या व्यवसायात चांगली सुधारणा होऊन कंपनीची मिळकत करोनापूर्व काळाच्या ८१ टक्क्यांपर्यंत आली आहे. करोनानंतरच्या काळात कंपनीने पहिल्यांदाच तिमाही नफा मिळविला आहे. कंत्राटी पद्धतीने हॉटेल चालविण्याच्या योजनेत ६० नव्या हॉटेल्सची भर कंपनी या वर्षांत घालणार आहे. जिंजर हॉटेल्सवर कंपनीने आता संपूर्ण ताबा मिळवला आहे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी कंपनीचे समभाग जमविता येतील. 

सुमिटोमो केमिकल्स : कृषीपूरक रसायनांची उत्पादक असलेल्या सुमिटोमो केमिकल्सने तिसऱ्या तिमाहीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत ६० टक्के तर नफ्यात ८० टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. चालू आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्यांत कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत १२ टक्के तर निर्यातीत २५ टक्के वाढ झाली. कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही खेळत्या भांडवलाचा आवर्तन कालावधी कमी केल्याने नफ्यात ४ टक्के वाढ झाली. कंपनीची नवी उत्पादने बाजारात आणण्याची तयारी पूर्ण झाली असून चौथ्या तिमाहीत त्यांची विक्री सुरू होईल. उत्तम व्यवस्थापन व कृषी रसायनांच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या बळावर कंपनी या आर्थिक वर्षांत सार्वकालीन उच्चांकी नफा कमावेल. दोन वर्षांसाठी या कंपनीतील गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल.

भारती एअरटेल: दरवाढ केल्यामुळे भारतातील व दक्षिण आफ्रिकेतील व्यवसायात कंपनीने चांगले यश संपादन केले. कंपनीचा नफा वार्षिक तुलनेत २२ टक्क्यांनी तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढला. ग्राहक संख्येत भारतात एक टक्क्यांनी तर दक्षिण आफ्रिकेत अडीच टक्क्यांनी वाढ झाली. व्होडाफोनचे ग्राहक दिवसेंदिवस कमी होत असल्याचा फायदा कंपनीला मिळून त्यामुळे कंपनीच्या फोर जी नेटवर्क ग्राहकांच्या संख्येत १८ टक्क्यांची वाढ झाली. नुकत्याच वाढवलेल्या दरांचा फायदा पुढे कंपनीला मिळत राहील व समभागातील गुंतवणूक वर्षभरात १० -१५ टक्क्यांचा फायदा मिळवून देईल.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर खर्चासाठीची मोठी तरतूद व रिझब्र्ह बँकेने सकल विकास दर चालू आर्थिक वर्षांसाठी ९ टक्के तर पुढील आर्थिक वर्षांसाठी ७.८ टक्के राहण्याचा व्यक्त केलेला अंदाज दिलासादायक आहे. व्याजदर वाढण्याची शक्यता जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे. करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. भारतातील हे संकेत बाजारासाठी चांगले आहेत, पण महिन्याभरात इंधनाच्या दरात भारतात होऊ शकणारी वाढ आणि जागतिक, विशेष करून अमेरिकेतील महागाईचे आकडे व त्यामुळे व्याजदर वाढून विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा हे बाजारासाठी धोक्याचे संकेत आहेत. तीव्र चढ-उतार हा सध्या बाजाराचा स्थायिभाव आहे. या वर्षी बाजारात पैसे कमावणे गेल्या वर्षांइतके सोपे नसेल. पण बाजाराशी मैत्री केली तर ते नक्की शक्य होईल.

या सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा

बालकृष्ण इंडस्ट्रीज, भारत डायनॅमिक्स, कोल इंडिया, अंबुजा सिमेंट, टाइड वॉटर ऑइल या कंपन्या डिसेंबर अखेरच्या तिमाहीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.

आयशर मोटर्स, डिश टीव्ही, ग्रासिम, ग्रॅफाईट इंडिया, इप्का लॅब, अदानी एंटरप्रायझेस, जिंदाल पॉली फिल्म्स या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

sudhirjoshi23@gmail.com