कोल इंडिया ही कोळशाचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ४३६ मेट्रिक टन उत्पादन करणाऱ्या या कंपनीच्या भारतात आठ उपकंपन्या असून त्यातील सात कंपन्या कोळसा उत्पादनात आहेत तर आठवी कंपनी म्हणजेच सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन्स लिमिटेड ही तंत्रज्ञान आणि सल्लागार कंपनी म्हणून काम बघते. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे बहुतांश उत्पादन हे ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. एनटीपीसी मुख्य ग्राहक असून एकूण उत्पादनाच्या २८% उत्पादन ती खरेदी करते. कोळसा उत्पादनात जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेला आपला देश कोळसा वापरातही तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊर्जा उत्पादनात पिछाडीवर असलेल्या भारताला वीज निर्मितीसाठी प्रचंड कोळसा हवा आहे. जवळपास ७७% कोळसा हा केवळ विजेसाठी वापरला जातो. उर्वरित कोळसा हा स्टील, सीमेंट, रसायने, खत इ. प्रकल्पात वापरला जातो. देशांतर्गत उत्पन्न कमी पडत असल्याने कोळशाची आयातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतातील मागणी वाढतच जाणार असल्याने कोल इंडियाने परदेशातही खाणी विकत घेण्याचे धोरण आखले आहे. यासाठी सुमारे ६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या खेरीज येत्या पाच वर्षांत कंपनी साधारण २५,००० कोटी रुपये आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी वापरणार आहे. पर्यावरणाचे जाचक नियम, राजकारण, भ्रष्टाचार आणि खाण उद्योगातील माफिया या सगळ्याचा विपरीत परिणाम काय झाला तो आपल्याला दिसतोच आहे. त्यातच कोळसा उद्योगासाठी आता नियंत्रक आणायचे घाटत आहे. त्यामुळे कोल इंडियासारख्या कंपनीला दर वाढवताना बंधने येतील. मात्र इतके असूनही कोळशाच्या मागणीतील सततची वाढ पाहता कोल इंडियाला उज्ज्वल भवितव्य दिसते. चालू आर्थिक वर्षांकरिता कंपनी साधारण १५,११० कोटी रूपयांचा नफा मिळवेल अशी अपेक्षा असून पुढील तीन वष्रे तरी कंपनीकडून उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी ही एक सुरक्षित आणि फायद्याची गुंतवणूक ठरावी.
कोल इंडिया लिमिटेड
प्रवर्तक भारत सरकार
सद्य बाजारभाव रु. ३१९
प्रमुख व्यवसाय कोळसा खाणी
भरणा झालेले भाग भांडवल रु. ६३१६.३६ कोटी
पुस्तकी मूल्य : रु. ३१.० दर्शनी मूल्य : रु. १०/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. १३.८
प्राइस अर्निंग गुणोत्तर (पी/ई) २३.२ पट
मार्केट कॅपिटल : रु. १९७,१९७ कोटी बीटा : ०.६
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ३८६/ रु. २९१
शेअरहोल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ९०
परदेशी गुंतवणूकदार ५.६
बँका / म्युच्युअल फंडस् ३.०
सामान्यजन व इतर १.४