गेल्याच आठवडय़ात आयसीआयसीआय या खाजगी बँकेचा शेअर पोर्टफोलियोसाठी सुचविल्यावर पुन्हा आणखी एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवत आहे. मात्र आज सुचवलेली बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील व स्टेट बँकेची एक सहयोगी बँक आहे. अनुत्पादित कर्ज आणि भांडवली कमतरता यामुळे सध्या सगळ्याच बँकांचे शेअर्स आपटी खात असले तरीही काही चांगले शेअर्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. अर्थात सध्या केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील जे काही आíथक विवंचनेचे प्रश्न आहेत ते पाहता आपला शेअर बाजार सावरायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. अशा अस्थिर वातावरणात कुठल्याही शेअर्सची खरेदी अथवा विक्री टप्प्याटप्प्याने करावी. म्हणजे तोटा कमी होतो. सध्या अनेक मिड कॅप शेअर्स ५२ आठवडय़ांच्या नीचांक पातळीवर असले तरीही हे शेअर्सदेखील टप्प्याटप्प्यानेच खरेदी करावेत.
स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या बँकेचा शेअर सध्या असाच नीचांक पातळीवर उपलब्ध आहे. केवळ ७० कोटी भागभांडवल असलेल्या या बँकेच्या शेअर्सचे पुस्तकी मूल्य ८९८ रुपये इतके आहे. जून २०१५ अखेर समाप्त तिमाहीसाठी बँकेने २,८८३.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २७०.६ व्कोटींचा नक्त नफा कमावला आहे. एकूण भरणा झालेल्या भागभांडवलापकी ७५% भांडवल प्रवर्तकांकडे असल्याने बाजारात खेळते भांडवल फारच कमी आहे. उत्तम प्रवर्तक, कामगिरीतील सातत्य, स्टेट बँकेत विलींनीकरणाची शक्यता आणि पुस्तकी मूल्याच्या जवळपास निम्म्या भावाला उपलब्ध असलेला हा शेअर म्हणूनच खरेदीसाठी सध्या आकर्षक वाटतो. दोन- अडीच वर्षांत हा शेअर दुप्पट होऊ शकेल.
stocksandwealth@gmail.com