डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com
नावातच भंगार म्हणजे त्यात काय विशेष? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, उद्योगामध्ये जे काही विकून मिळेल त्याला विक्री म्हणतात. मग भलेही ते भंगार का असेना. फक्त धातूच्या भंगाराचा जगभरातला उद्योग-धंदा सुमारे ३० लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जो कदाचित भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापेक्षाही जास्त आहे. धातूच्या भंगारमध्ये त्याचे चौकोनी तुकडे बनवले जातात व नंतर विकले जातात. अॅल्युमिनिअमच्या कारखान्यात केर काढणे य प्रक्रियेवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवले जाते. यात अत्याधुनिक यंत्रे देखील खूप महत्त्वाची कामगिरी बजावतात. ‘लोकसत्ता’चा २०२२ सालचा ‘तरुण तेजांकित’ अजिंक्य धारियाने तर चक्क सॅनिटरी पॅड सारख्या टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू बनवण्याचा ध्यास घेतला आहे. म्हणजे पृथ्वीवरील कित्येक भंगारातल्या वस्तू पुन्हा प्रक्रियेसाठी वापरात येतात. एकाचे भंगार दुसऱ्याचा कच्चा माल बनतो आणि त्याचा मोठा व्यवसाय उभा राहतो. मुंबईसारख्या शहरात काही लोक भंगारातल्या वस्तू गोळा करण्याचे काम करतात. ते अगदी लोहचुंबकाची काठी देखील वापरतात. साखर बनवणाऱ्या कंपन्या त्याच्या भंगारातल्या वस्तूंचा उत्तम वापर करतात. पाणी पिऊन टाकलेला नारळ बांधकाम उद्योगात वापरता येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता बांधण्याच्या प्रक्रियेत टाकाऊ पदार्थ कसे वापरता येतात याची उपयुक्त माहिती लोकसभेलाही दिली आहे.
घरात आपण भंगार वापरून खूप चांगल्या गोष्टी करतो. सुदैवाने अजून आपल्या देशात भंगार सामानाचे थोडेसेच पैसे मिळतात. परदेशात तर भंगार सामान घरातून काढण्याचे पैसे द्यावे लागतात. उद्योगाप्रमाणेच भंगार विकून आपणसुद्धा पैसे कमावतो, जसे धातू, रद्दी वगैरे. शिवाय हे पैसे रोख स्वरूपात येतात, म्हणजे हिशेबाची भानगड नाही. कंपन्यांमध्ये मालकाचे भंगाराच्या विक्रीवर जास्त लक्ष असते ते यामुळेच. कान तुटलेल्या कपावर काहीतरी डिझाईन करून पेन स्टॅन्ड म्हणून तर मीसुद्धा खूप वेळेला वापरला आहे. जुने कपडे देऊन भांडी घेणे म्हणजे एकेकाळची गृहिणीची प्रतिष्ठाच होती. नासलेले दूध म्हणजे छानपैकी साखर घालून आटवून पनीर खाणे. घरातील केर, चिरलेल्या भाज्यांचा टाकाऊ भाग, उरलेले अन्न पदार्थ हे झाडांना खत म्हणून वापरण्याची पद्धत अजूनही आहेच. पिस्त्यांच्या उरलेल्या कवचांची हस्तकला देखील होते. कालची उरलेली पोळी जिला कुणी वाली नसेल तर लहान मुलांना रस्त्यावरील भू-भू किंवा माऊला देण्याचा आनंद काही वेगळाच!
असो, भंगाराचा वापर कसलेल्या व्यावसायिकाप्रमाणे नक्की करा आणि लक्षात ठेवा की, आपले भंगार सामान कमाईदेखील करून देऊ शकते!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /