शेअर बाजारात निर्देशांकांने नवा उच्चांक गाठावा अशी हवीहवीशी आस असते, पण हीच उंची अनेकांच्या उरात धडकीही भरवते, असा हा कमालीचा अजब मामला आहे. आजवर काठावर बसून प्रतीक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आता तरी बाजारात प्रवेश करावा की आणखी थांबावे, असा स्वाभाविक प्रश्न यातून पुढे येतो. याच प्रश्नाचा शेअर बाजारातील तीन तज्ज्ञ विश्लेषकांनी घेतलेला हा उणापुरा वेध..
२०१३ चा पूर्वाध तरी निर्धोकच म्हणायचा
विशाल जाजू
गुंतवणूक संशोधक प्रमुख, निर्मल बंग सिक्युरिटीज् लि.
सरलेले २०१२ साल निर्देशांकांसाठी उमद्या कमाईचे राहिले असले तरी बहुतांश छोटय़ा गुंतवणूकदारांनी जवळपास रु. ६०,००० कोटींनी नुकसान सोसावे लागल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्याच सांगतात. शेअर बाजारात व्यवहाराला प्रतिबंध करण्यात आलेल्या समभागांमध्येच हा पैसा अडकलेला असावा कदाचित. त्यामुळे सध्याची बाजारातील ही तेजी त्यांच्यासाठी गमावलेले परत मिळविण्याची संधी असली तरी त्यांचा बाजाराबद्दल हिरमोडही स्पष्टपणे दिसून येतो. २०१२ सालात विदेशी वित्तसंस्थांनी (एफआयआय) २४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली तर त्याचवेळी देशी वित्तसंस्था व म्युच्युअल फंडांनी प्रामुख्याने गुंतवणूकदारांच्या रिडम्प्शन रेटय़ापायी विक्रीचा सपाटा सुरू ठेवला, ही बाब पुरेशी बोलकी आहे.
वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून दिसलेली बांधिलकी उत्साहवर्धक आहे आणि याच कारणापायी विदेशातून गुंतवणुकीचा ओघ यापुढेही कायम राहील, असे म्हणता येईल. या बरोबरीने किराणा आणि विमानसेवा क्षेत्रात होणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीने भारतीय चलन- रुपयाला मजबूती मिळेल. ज्या परिणामी आयातीवरील खर्चात घट होईल. या सर्व घडामोडी विदेशी पतमानांकन संस्थांच्या दृष्टीने अनुकूल ठराव्यात. या जोडीला व्याजाचे दर वास्तविक पातळीवर आले, उद्योगधंद्यांना स्वस्त कच्चा माल मिळाला तर कंपन्यांच्या नफाक्षमतेतील सुधारणा एकंदर समभागांचे मूल्यही वाढविणारे निश्चितच ठरेल. याच आशादायी सूराने नव्या वर्षांची सुरुवात आपण केली आहे. आता या आशा-अपेक्षांना फेब्रुवारीअखेर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाने सोनेरी कळस चढविण्याची आस आहे. त्यातून किमान २०१३ चा पूर्वाध तरी निर्धोक बनला आहे असे म्हणता येईल. परंतु उत्तरार्धात मात्र जागतिक अर्थकारणातील घडामोडी पुन्हा शेअर बाजाराला प्रभावित करणाऱ्या महत्त्वाचा घटक बनतील.
राहता राहिला देशांतर्गत निवडणुकांचा प्रश्न. सध्याचा रिफॉम्र्स धडाका आणि वित्तीय तुटीचे व्यवस्थापन हा आता एक आर्थिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम बनला आहे. २०१४ च्या निवडणुका विद्यमान सरकारला जिंकायच्या झाल्यास हाच अर्थ-राजकीय कार्यक्रम त्यांना पुढे रेटण्याशिवाय गत्यंतर नाही, असे त्यांचा आता पुरेपूर लक्षात आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ताळेबंद ठिकाणावर आणल्याशिवाय निवडणुका जिंकून पुन्हा सरकार त्यांना स्थापताही येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा