सुधीर जोशी sudhirjoshi23 @gmail.com
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक संकेतांवर, एप्रिल महिन्याच्या जीएसटी संकलनाने व सेवा क्षेत्राच्या वाढीमुळे शिक्कामोर्तब झाले. व्याजदर वाढीला आता सुरुवात झाली आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा मोठय़ा बँकाना होईल. रेपो दराशी संलग्न गृह व वाहन कर्जाचे दर आता वाढवता येतील. त्यांचा ‘कासा रेशो’ जास्त असल्यामुळे कमी व्याजातील ठेवी काही काळ त्यांच्या फायद्याच्या असतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील साधारण सर्वच कंपन्या कर्जरहित व दरवर्षी रोकड जमा करणाऱ्या असल्यामुळे त्यांच्यावर वाढीव व्याजाने फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे ही दोन क्षेत्रे नजीकच्या काळात प्रभावी ठरतील. अमेरिकी नॅसडॅकच्या घसरणीमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सध्या विक्रीचा तुफान मारा झाला आहे. त्यामुळे घसरलेल्या पातळीवर या क्षेत्रातील कंपन्यांचा विचार करता येईल. पुढील काही महिने बाजारासाठी कसोटीचे राहतील. महागाईचे आकडे वाढत गेले अथवा भू-राजकीय संघर्ष वाढला तर बाजारात आणखी घसरण होईल. त्यामुळे आणखी घसरण की नव्या चढाईची सुरुवात हे येणारा काळच ठरवेल.
भारतातील व अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांनी केलेली व्याजदर वाढ ही सरल्या सप्ताहात बाजारासाठी सर्वात परिणामकारक घटना ठरली. भारतातील दरवाढ अगदी अनपेक्षितपणे केली गेली व त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकेतील या आधीच्या पाव टक्का दरवाढीनंतर नव्याने झालेली अर्धा टक्के वाढ ही काहीशी अपेक्षित होती. त्यामुळे महागाई रोखण्यात योग्य वेळी उचललेले पाऊल अशा दृष्टीने त्याकडे पाहिले गेले व अमेरिकी बाजाराने उसळी घेतली. परंतु दुसऱ्याच दिवशी आगामी काळातील बाजारातील रोकड तरलता कमी करण्यासाठी मोठी पावले उचलण्याचे संकेत व जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकी बाजारात व पाठोपाठ भारतीय बाजारात मोठी घसरण झाली. साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांनी घसरले.
अल्ट्राटेक सिमेंट : अल्ट्राटेक सिमेंटचे वार्षिक निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आले. वाढीव माल वाहतूक व इंधनावरील खर्चामुळे नफ्याचे प्रमाण घटले आहे. प्राप्तिकरासाठी केलेली तरतूद रद्द केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. पण ती लक्षात घेतली नाही तर नफा १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. तरीदेखील वेळेवर वाढवलेली उत्पादन क्षमता, एप्रिल महिन्यात वाढवलेल्या किमती व कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे कंपनीला आगामी काळात नफा मिळवून देतील. पायाभूत सुविधा, ग्रामीण गृहनिर्माण आणि शहरी गृहनिर्माण यासारख्या विभागांमधून मागणीचे वातावरण मजबूत असणे अपेक्षित आहे. कंपनीच्या समभागांची प्रत्येक घसरणीच्या काळात खरेदी करावी.
* टाटा स्टील : टाटा स्टीलने अपेक्षेनुसार उत्तम कामगिरी नोंदवत संपूर्ण वर्षांत ४१ हजार कोटींचा विक्रमी नफा मिळविला. समभागांचे विभाजन व प्रति समभाग ५१ रुपयांचा घसघशीत लाभांश जाहीर केला. कंपनीच्या य़ुरोपमधील उप-कंपनीने या कामगिरीत महत्त्वाची साथ दिली. मागील काही महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली असली तरी भारतीय धातू कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. नफ्यातील वाढ कंपनीला कर्जे कमी करायला मदत करेल व भविष्यातील कामगिरी आणखी चांगली राहील. समभागांचे विभाजन झाल्यावर गुंतवणूकदारांचा फायदाच होतो, त्यामुळे हे समभाग राखून ठेवणे तसेच मोठय़ा घसरणीत खरेदी करणे इष्ट ठरेल. भू-राजकीय संघर्षांमुळे पोलादाच्या किमती चढय़ा आहेत. कमोडिटी प्रकारात येणारी ही कंपनी व्यापार चक्राच्या चढय़ा मार्गाने जात आहे. त्यामुळे वरच्या पातळीवर टप्प्याटप्प्याने नफा वसुली करणेदेखील महत्त्वाचे असेल.
* ब्रिटानिया : ब्रिटानिया इंडस्ट्रीजने सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगले निकाल जाहीर केले. मार्चअखेर तिमाहीत विक्रीत १५ टक्के तर नफ्यात १० टक्के वाढ झाली. कंपनीची हिन्दुस्तान युनिलिव्हरसारखीच बाजारावर पकड आहे. वर्षांनुवर्षे जोपासलेल्या नाममुद्रा आणि किमती वाढवण्याची क्षमता यामुळे हे साध्य झाले आहे. कंपनी ग्रामीण भागात वितरण व्यवस्था मजबूत करत आहे, तसेच बिस्किट, दुग्धजन्य उत्पादने व इतर खाद्य पदार्थाच्या बाजारातील हिस्सा वाढवत आहे. एफएमसीजी क्षेत्रातील जमवून ठेवण्यासारखे हे समभाग आहेत.
* कोटक मिहद्र बँक : कोटक मिहद्र बँकेने मार्चअखेर तिमाहीत नफ्यात ६५ टक्क्यांची वाढ साध्य केली जी मार्चअखेर आर्थिक वर्षांसाठी २३ टक्के आहे. गेल्या वर्षी ही वाढ १७ टक्के होती. बँकेचा ‘कासा रेशो’ ६१ टक्के झाला आहे. बँकेकडे भांडवल उपलब्धता चांगली आहे. कर्ज देण्याबाबत सावधानता बाळगत असल्यामुळे बँकेची प्रगती धीम्या गतीने होत आहे. दीर्घ मुदतीसाठी टप्प्या टप्प्याने बँकेच्या समभागात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.
* दीपक नायट्राईट : दीपक नायट्राईट ही सेंद्रिय, अजैविक, सूक्ष्म आणि विशेष रसायनांची एक अग्रगण्य उत्पादक कंपनी आहे. औद्योगिक स्फोटके, रंग, सौंदर्य प्रसाधने, वंगणे, पॉलिमर, ऑप्टिकल ब्राइटनर्स, फोटोग्राफिक रसायने इत्यादी उत्पादकांना कंपनी कच्चा माल पुरविते. दीपक नाईट्राइटच्या चौथ्या तिमाहीत विक्री व नफ्यात अनुक्रमे ४२ व ४१ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्षांत प्रति समभाग १०.४६ रुपयांची कमाई केली जी गेल्या वर्षांत ७.४१ रुपये होती. सध्याच्या बाजाराच्या घसरणीमध्ये या कंपनीच्या समभागांची पातळी खरेदीला आकर्षक वाटते.
सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा
पंजाब नॅशनल बँक, टाटा मोटर्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, टेक मिहद्र या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. महानगर गॅस, गुजरात गॅस, एशियन पेन्ट्स, सिप्ला, यूपीएल, कन्साई नेरोलॅक, ओरिएन्ट इलेक्ट्रिकल्स, पॉलिकॅब, अंबर एंटरप्राईझेस, एबी कॅपिटल, इमामी व इतर अनेक लहान कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.