मागील लेखात आपण शेअर्स आणि म्युचुअल फंडातील युनिट्सची खरेदी आणि विक्रीसंबंधी कराच्या तरतुदींचा आढावा घेतला. अशा व्यवहारात अनेक पैलू आहेत, त्यामुळे यावरील कराविषयीच्या तरतुदी थोडय़ा क्लिष्ट होतात. या संबंधी खालील व्यवहारात कराच्या तरतुदी पुढीलप्रमाणे :
गुंतवणूकदार की शेअर्सचा व्यापारी?
पूर्वी शेअर्सचे सर्व व्यवहार हे प्रत्यक्षात शेअर बाजारातील उपस्थितांमार्फत होत होते. त्यामुळे अशा व्यवहाराची व्याप्ती ही शहरापर्यंतच मर्यादित होती. आता तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे आपल्याला घरबसल्या शेअर्सचे खरेदी-विक्री व्यवहार करता येऊ लागले आहेत. घरामध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात मोबाईलवरसुद्धा हे व्यवहार करता येतात. त्यामुळे असे व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि व्यवहारांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय वाढले आहे. काही जण शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार दररोज किंवा वारंवार करीत असतात. अशा वेळी प्रश्न पडतो की असे व्यवहार ‘शेअर्सचा व्यापार’ म्हणून गणले जातील की ‘गुंतवणूक’ म्हणून गणले जातील.
साधारणत: शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार किती कालांतराने होतात यावरून ठरविता येते की अशा व्यवहारावर मिळालेले उत्पन्न ‘व्यापारातून’ मिळाले आहे की ‘गुंतवणुकीतून’. ज्यांच्या व्यवहारांची संख्या जास्त आहे आणि जे इंट्रा-डे व्यवहार करतात त्यांच्यासाठी हे व्यवहार ‘गुंतवणूक’ म्हणून होऊ शकत नाहीत तो व्यापार म्हणूनच होतो. जे वारंवार शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार करत नाहीत आणि त्यांचा उद्देश ‘गुंतवणूक’ आहे त्यांच्यासाठी हा व्यापार नसून लघू किंवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. प्राप्तिकर कायद्यात ‘शेअर्सचा व्यापार’ करणाऱ्यांसाठी कर आकारणी वेगळी आहे आणि ‘गुंतवणूकदारां’साठी वेगळी आहे.
शेअर बाजारात झालेले व्यवहार व्यापाराच्या उद्देशाने आहेत किंवा गुंतवणूक आहेत हे ठरविणे कठीण काम आहे. करदात्याने या बाबतीत जो निर्णय घेतला तो प्राप्तिकर अधिकाऱ्याला मान्य असेलच असे नाही. यामुळे बरेच खटले उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वेळोवेळी याच्या मार्गदर्शनासाठी परिपत्रके जाहीर केली आहेत. १९८९ मध्ये एक परिपत्रक (सूचना १८२७ दिनांक ३१ ऑगस्ट १९८९) जाहीर केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे २००७ मध्ये असे एक परिपत्रक (४/२००७ दिनांक १५ जून २००७) जाहीर केले. या परिपत्रकात व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये फरक कसा करावा यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आणि करदात्याला मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. अशी तत्वे जारी करूनसुद्धा सामान्य नियम स्थापन झाला नाही आणि या विषयीचे विवाद संपले नाहीत. म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने फेब्रुवारी २०१६ मध्ये अजून एक परिपत्रक (६/२०१६ दिनांक २९ फेब्रुवारी २०१६) जाहीर केले. या परिपत्रकानुसार शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स आणि रोख्यांच्या व्यवहारासाठी करदात्याने व्यापार किंवा गुंतवणूक यापैकी कोणताही पर्याय निवडला असेल तर प्राप्तिकर अधिकाऱ्याने त्यावर वाद घालू नये. परंतु हा पर्याय करदात्याने पुढील वर्षांसाठीसुद्धा जारी ठेवावा आणि बदलू नये. इतर व्यवहार आधी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ठरविण्यात येतील. अप्रामाणिक हेतूने केलेल्या व्यवहारांसाठी या परिपत्रकातील तरतुदी लागू नसतील असेही सूचित केले आहे.
गुंतवणूकदार म्हणून केलेल्या शेअर्स आणि म्युचुअल फंडातील लाभांश आणि भांडवली नफ्यावरील कर आकारणी आपण मागील लेखात जाणून घेतली. परंतु या व्यवहाराच्या व्यतिरिक होणाऱ्या व्यवहारावर कर आकारणी कशी होते ते बघू या :
१. गुंतवणूक : करदाता जर ‘गुंतवणूकदार’ असेल तर त्याचा उद्देश हा लाभांश मिळून गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी धारण करून संपत्ती वाढविणे हा असतो. त्यावर होणारा नफा किंवा तोटा ‘भांडवली नफा किंवा तोटा’ म्हणून गणला जातो आणि त्यानुसार मिळणाऱ्या सवलती घेता येतात (उदा. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा, ज्या खरेदी (१ ऑक्टोबर २००४ नंतरच्या) आणि विक्रीवर रोखे उलाढाल कर अर्थात एसटीटी भरला आहे, करमुक्त उत्पन्न दाखविता येते किंवा लघु मुदतीचा भांडवली नफा, ज्या विक्रीवर एसटीटी भरला आहे, त्यावर १५% इतका सवलतीच्या दरात कर भरता येतो).
२. इंट्रा-डे ट्रेडिंग : यामध्ये शेअर्स ज्या दिवशी खरेदी केले त्याच दिवशी त्याची विक्री केली केली जाते आणि शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी घेतली जात नाही. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४३(५) नुसार एखाद्या मालाचा, शेअर वगैरेचा व्यवहार प्रत्यक्ष डिलिव्हरी न घेता झाला असेल तर तो व्यवहार सट्टा (रढएउवछअळकडठ) म्हणून समजला जातो. त्यामुळे इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये झालेला नफा किंवा तोटा हा सट्टा उत्पन्न किंवा सट्टा तोटा समजला जातो. असे उत्पन्न किंवा तोटा हा ‘धंदा आणि व्यवसायातील उत्पन्न’ या सदराखाली येते. असा नफा किंवा तोटा ‘भांडवली नफा’ या सदराखाली येत नाही. असे इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये मिळालेले उत्पन्न ‘धंदा आणि व्यवसायातील उत्पन्न’ म्हणून गणले जाते आणि तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही. परंतु पुढील चार वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षी तो फक्त सट्टय़ाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. असा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा असल्यास विवरणपत्र वेळेवर दाखल करणे गरजेचे असते. असे व्यवहार पगारदार करदात्याने केले तरी त्याला हे उत्पन्न ‘धंदा आणि व्यवसायातील उत्पन्न’ म्हणून दाखवावे लागते.
३. डेरिव्हेटिव ट्रेडिंग : यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगचा समावेश होतो. यामध्ये भविष्यात शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा करार असतो. असे व्यवहार शेअर बाजारामार्फत केले गेले असल्यास हे व्यवहार ‘सट्टा’ म्हणून समजले जात नाहीत. अशा व्यवहारावर झालेला नफा किंवा तोटा हा ‘धंदा आणि व्यवसायातील उत्पन्न’ म्हणून गणले जाते. या उत्पन्नासाठीसुद्धा धंदा आणि व्यवसायातील उत्पन्नासाठी लेखे आणि लेखा परीक्षणाच्या तरतुदी लागू होतात. यासाठी उलाढाल ही नफा आणि तोटा यांच्या बेरजेएवढी असते. उदाहरणार्थ, खालील तक्त्यात दिले आहे त्याप्रमाणे अशा व्यवहारात नफा झाल्यास त्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो आणि तोटा झाल्यास पुढील आठ वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो.
(तक्ता पाहावा)
४. साधारण ट्रेडिंग : यामध्ये डिलिव्हरी घेऊन शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते. असे ट्रेडिंग करणारे करदाते ही खरेदी आणि विक्री हा व्यवहार ‘व्यापार’ म्हणून करतात. वर सांगितल्याप्रमाणे करदात्याला हे ठरवायचे आहे की तो हे व्यवहार ‘व्यापार’ म्हणून करतो आहे की ‘गुंतवणूकदार’ म्हणून करतो आहे. अशी सवलत फक्त शेअर बाजारात नोंदणीकृत शेअर्ससाठी आहे. जर हे व्यवहार ‘व्यापार’ म्हणून दाखविले तर जो नफा किंवा तोटा होतो त्यातून खर्च (उत्पन्न मिळविण्यासाठी केलेला) वजा करता येतो आणि असे खर्च वजा करून येणारा निव्वळ नफा करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाते. त्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो. अशा व्यवहारात तोटा झाल्यास पुढील आठ वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो.
४. सरमिसळ : करदाता हा एकाच वेळी गुंतवणूकदार आणि व्यापारीसुद्धा असू शकतो. काही शेअर्स तो दीर्घ मुदतीसाठी धारण करू शकतो. ती तो ‘गुंतवणूक’ म्हणून दाखवू शकतो. शिवाय तो इंट्रा-डे व्यवहार किंवा डेरिव्हेटीव ट्रेडिंगसुद्धा करू शकतो. गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न भांडवली नफा आणि इंट्रा-डे व्यवहार आणि डेरिव्हेटीव ट्रेडिंगचा व्यवहार ‘धंदा आणि व्यवसायातील’ उत्पन्न म्हणून दाखवू शकतो.
प्रश्न : मी एका सहकारी बँकेचा सभासद आहे. मला २०१६-१७ या वर्षांत १२,००० रुपये इतका लाभांश मिळाला आहे. या लाभांशावर मला कर भरावा लागेल का?
– एक वाचक, ईमेलद्वारे
उत्तर : हा लाभांश करपात्र आहे आणि हा ‘इतर’ उत्पन्नामध्ये गणला जाईल आणि आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल. फक्त भारतीय कंपन्यांनी दिलेला लाभांश, ज्यावर कंपन्यांनी लाभांश वितरण कर (डीडीटी) भरला आहे, असा लाभांश करदात्याला करमुक्त आहे.
प्रश्न : मला माझ्या आईकडून एका सूचीबद्ध कंपनीचे १,००० शेअर्स जानेवारी २०१७ मध्ये भेट म्हणून मिळाले. ते शेअर्स तिने मे २०१३ मध्ये शेअर बाजारामार्फत विकत घेतले होते. हे शेअर्स मी मला भेट मिळालेल्या तारखेपासून १ महिन्यात शेअर बाजारामार्फत विकले तर मला यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?
– स्वाती काळे, ईमेलद्वारे
उत्तर : हे शेअर्स आईकडून भेट मिळाल्यामुळे भांडवली नफा किती झाला आणि तो करपात्र आहे की नाही हे तपासण्यासाठी, आईने शेअर्स खरेदी केल्याची तारीख आणि खरेदी किंमत विकत घ्यावी लागेल. हे शेअर्स जरी आपल्याला विक्रीच्या १ महिन्यांपूर्वी मिळाले असले तरी ते शेअर्स आईने कधी विकत घेतले ते महत्त्वाचे आहे. ते तिने विक्रीच्या १२ महिन्यांपूर्वी घेतल्यामुळे होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. बाजारमार्फत विक्री झाल्यामुळे त्यावर एसटीटी कर भरला गेला आहे. त्यामुळे हा भांडवली नफा करमुक्त आहे आणि त्यावर कर भरावा लागणार नाही.
प्रवीण देशपांडे
pravin3966@rediffmail.com
(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार)