पगारदार व्यक्ती ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये रुजू होणार असते त्यावेळी त्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडून (एच. आर.) त्या व्यक्तीला पगाराचे गणित सांगितले जाते. अशावेळी संबंधित पगारदार व्यक्तीने त्याच्या एकूण वेतनामध्ये प्राप्तीकरमुक्त भत्त्यांचा समावेश करण्याचा आग्रह धरल्यास प्राप्तीकर वाचेल.
संजय आणि विजय हे दोघे मित्र दोन वेगवेगळ्या कंपनीमध्ये रुजू होऊन आता जवळजवळ ९ ते १० महिने झाले होते. दोघांनाही रुजू होतेवेळी योगायोगाने वार्षकि एकूण ५,५०,००० रुपये पगाराचे पत्र (Pay Package Letter) मिळाले. दोघांनी प्राप्तीकर वाचवण्यासाठी कलम ८० क मध्ये नमूद केलेल्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये १,५०,००० रुपयांची गुंतवणूक केली होती.
एकदा दोघे भेटले आणि चहा घेता घेता संजय विजयला म्हणाला की, मी १,५०,००० रुपये गुंतविल्यानंतर माझी १५,४५० रुपये प्राप्तीकर कपात झाली. तुझे किती रुपये कमी झाले? विजय म्हणाला, माझा प्राप्तीकर कापल्याच गेला नाही. संजय आश्चर्य वाटून म्हणाला, असे कसे? ५,५०,००० रुपयांच्या एकूण पगारातून १,५०,००० रुपये कलम ८० क चे वजा होऊन राहिलेल्या ४,००,००० रुपयांवर प्राप्तीकर भरायला नको का? तू ८० क व्यतिरिक्त अजून काही वजावट मिळवली का?
विजय म्हणाला, नाही. मी ८० क व्यतिरिक्त आणखी कोणतीही वजावट घेतली नाही. पण मी एक गोष्ट केली ती म्हणजे माझ्या बाबतीत पगाराचे पत्र (Pay Package Letter) स्वीकारण्यापूर्वी मी काही प्राप्तीकरमुक्त भत्यांचा (Tax Free Allowanses) माझ्या पगारामध्ये समावेश करून घेतला. त्यामुळे मला प्राप्तीकर भरावा लागला नाही. नियुक्तीचे पत्र स्वीकारण्यापूर्वी तू अशा भत्त्यांचा तुझ्या पगारामध्ये समावेश केला असता तर तुझा १५,४५० रुपये प्राप्तीकर वाचला असता. संजयला हळहळ वाटून तो म्हणाला, I have missed the bus! पण मला सांग तरी असे कोणते भत्ते करमुक्त मिळतात? आणि मग विजयने आपल्या मित्राला त्याबद्दल माहिती दिली.
१. वैद्यकीय खर्चाचा परतावा :
कलम १७ (२) प्रमाणे वार्षकि १५,००० रुपये स्वत:साठी अथवा कुटुंबातील इतर व्यक्तीसाठी केलेल्या वैद्यकीय उपचारांवरील खर्चाचा परतावा संपूर्णपणे करमुक्त मिळतो.
२. प्रवास भत्ता :
कलम १० (१४) प्रमाणे पगारदार व्यक्तीला त्याला नेमून दिलेली कामे करण्याकरता जो प्रवास भत्ता (Conveyance Allowance) मिळतो तो प्राप्तीकरमुक्त मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे या भत्यावर कमाल रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
३. वाहतूक भत्ता :
कलम १०(१४) द्वारे दरमहा ८०० रुपये म्हणजे वार्षकि ९,६०० रुपये वाहतूक भत्ता प्राप्तीकर मुक्त मिळतो.
४. गणवेश (Uniform) भत्ता :
कंपनीचे नेमून दिलेले काम करण्यासाठी परिधान करावयाच्या पोशाखाची खरेदी तसेच
त्या पोषाखाच्या देखभालीचा खर्च कलम १० (१४) प्रमाणे कमाल मर्यादेचे बंधन लागू न होता पूर्णपणे करमुक्त मिळतो.
५. मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता :
अपत्यामागे दरमहा १०० रुपये शैक्षणिक भत्ता आणि दरमहा ३०० रुपये वसतिगृह (होस्टेल) भत्ता पूर्णपणे करमुक्त मिळतो. हे भत्ते जास्तीत जास्त दोन अपत्यांसाठी मिळतात.
६. दूरध्वनी खर्चाचा परतावा :
नियम ३ प्रमाणे दूरध्वनी खर्चाचा परतावा पूर्णपणे करमुक्त मिळतो.
७. फूड कुपन :
एखाद्या पगारदार व्यक्तीला त्याच्या कंपनीकडून मिळणारी ‘फूड कुपन्स’ची वार्षकि रक्कम पूर्णपणे करमुक्त मिळते.
पगारदारासाठीच्या अजूनही काही प्राप्तीकर मुक्त भत्त्यांविषयीची माहिती पुढील लेखात अवश्य घेऊ!
dattatrayakale9@yahoo.in
पगाराची स्मार्ट आखणी
पगारदार व्यक्ती ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये रुजू होणार असते त्यावेळी त्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडून (एच. आर.) त्या व्यक्तीला पगाराचे गणित सांगितले जाते.
First published on: 02-02-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart arrangement of salary