हेमंत ऋतुमध्ये पानगळीला सुरुवात होऊन शिशिरात वृक्ष पूर्णपणे निष्पर्ण होऊन जातात तसेच काहीसे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले. औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबर महिन्यात ८.३% वाढला तर नोव्हेंबर महिन्यात ०.१% घटला. म्हणजे ही घट ८.२% आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दसरा-दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर वाढत्या मागणीचा विचार करून वाढवलेल्या उत्पादनामुळे ऑक्टोबर महिन्याच्या औद्योगिक उत्पादन दरात वाढ दिसून आली, हा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. वाढत्या महागाईमुळे खरेदीदारांच्या हातात कमी पसे उरल्यामुळे एकूणच मागणीत घट दिसून आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण २९ जानेवारीला जाहीर होणार आहे. मागील पतधोरणात रोख राखीव प्रमाणात कपात करण्याचा निर्णय टाळला असला तरी डिसेंबरमध्ये तीन टप्प्यात रु. ३१,००० कोटींची रोखे खरेदी करून अर्थव्यवस्थेत पुरेशी द्रवता राहील याची काळजी घेतली. औद्योगिक उत्पादनातील तूट, महागाईचा वाढता दर कमी होणे, निर्यातीतील घसरण रोखणे, वित्तीय तूट व आयात निर्यातीतील तूट कमी करणे यावर व्याज दरकपात हा रामबाण उपाय होऊ शकत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाच्या दराचे विश्लेषण केल्यास जे निष्कर्ष निघतात ते असे – चालू आर्थिक वर्षांच्या आठ महिन्यात औद्योगिक उत्पादन दर १% वाढला. मागील वर्षी याच काळात हिच वाढ ३.८% होती. पुढील तक्त्यात इतर औद्योगिक घटकांची कामगिरी दिली आहे.
या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या २२ घटकांपकी १३ घटकांच्या उत्पादनात घट दिसून आली. पुस्तके व वृत्तपत्र क्षेत्रात सर्वात जास्त घट २१.०८% दिसून आली. तर विजेवर चालणाऱ्या उत्पादनात (मिक्सर, गीझर आदी) सर्वाधिक म्हणजे २५.१% वाढ दिसून आली. त्या खालोखाल ८.५% वाढ तेल शुद्धीकरण उद्योगात वाढ नोंदली. तेल शुद्धीकरण व उत्पादनातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी सर्वात सुखावणारी बाब आहे. तर भांडवली यंत्र सामुग्रीतील ११.३% घट हे अर्थव्यवस्थेसाठी दु:चिन्ह आहे.
विश्लेषणाने इतकेच दिसू लागते की, अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थव्यवस्था गतीशील होईल की नाही हे समजण्यासाठी दोन – तीन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. ऑक्टोबर महिन्यातील पतधोरण आढाव्यात डिसेंबर महिन्यातील महागाईचा दर ८% राहिल असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला होता. नोव्हेंबर महिन्यात घाऊक किमतींच्या आधारावर महागाईचा दर ७.२४% असून महागाई मुख्यत्वे फळे, भाजीपाला व मासे यांच्या किंमतीतील वाढीमुळे दिसून आली. अन्नधान्य वगळून (Core Infletion) महागाईचा दर ४.२% आहे. रिझव्‍‌र्ह बँक या पाश्र्वभूमीवर दर कपातीचा निर्णय घेईल का, हे पुढील आठवडय़ात, उत्तरार्धात पाहू.
(लेखक निवृत्त बँक मुख्याधिकारी आहेत.)
विविध औद्योगिक घटकांची वाटचाल (%)
    नोव्हेंबर २०१२    एप्रिल-नोव्हें. २०१२
खनिज उद्योग    -५.५ (३.५)    -१.५ (-२.४%)
औद्योगिक उत्पादने    ०.३ (६.६)    १ (४.२)
वीज निर्मिती    २.४ (१४.६)    ४.४ (९.४)
इतर    ०.१ (६)    १ (३.८)
(कंसातील आकडे गेल्या वर्षांतील याच कालावधीतले)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा