श्रीकांत कुवळेकर
कांद्याची भाववाढ लोक स्वीकारायला लागले तर मागोमाग भाज्या, डाळी, बटाटे, तर गेल्याच आठवडय़ात दूध, काही दुग्धजन्य पदार्थ, अंडी महाग झालेत. एवढं नक्की काय झालं आहे, ज्यामुळे किमती नवनवीन विक्रम गाठू लागल्या आहेत..
कृषीमाल बाजारपेठेमध्ये, मग ती स्थानिक असो अथवा परदेशी, गेल्या दोन महिन्यांत होत असलेल्या घटना या बऱ्याच गुंतवणूकदारांबरोबरच सामान्य माणसांना देखील अनाकलनीय ठरल्या आहेत. आताच कुठे लोक कांद्याची भाववाढ मनापासून स्वीकारायला लागलेत, तर त्यामागोमाग गरिबाची भाजी, बटाटे, तर गेल्याच आठवडय़ात दूध, काही दुग्धजन्य पदार्थ, अंडी महाग झालेत. एवढेच पुरेसे नाही तर आता खाद्यतेलांच्या किरकोळ किमतीत देखील वाढ होऊ लागली असून पुढील महिन्या-दोन महिन्यांत सर्वच खाद्यतेले ग्राहकांसाठी तीन आकडी किंमत पार करणार हे नक्की.
आता आपण पाहू एवढं नक्की काय झालं आहे, ज्यामुळे किमती नवनवीन विक्रम गाठू लागल्या आहेत. तसे पहिले तर या स्तंभातून मागील लेखांमध्ये वेळोवेळी या भाववाढीची कारणे लिहिली गेली आहेत. आता एकत्रितपणे आपण ती पाहू. तर देशातील बहुसंख्य राज्यात जुलैपर्यंत असलेला दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई यामुळे खरिपाच्या पेरण्यांवर परिणाम झाला. एकंदरीत मागील वर्षांत दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे बहुतेक वस्तूंचे शिल्लक साठे अत्यंत कमी असताना खरीप पिकांवर सुरुवातीला पाणीटंचाई आणि नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा या काळात झालेला अति पाऊस या गोष्टींमध्येच आजच्या महागाईचा पाया घातला गेला होता.
परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांत झपाटय़ाने बदललेल्या जागतिक परिस्थितीची देखील महत्त्वाची भूमिका सध्याच्या भाववाढीत, विशेषकरून खाद्यतेल किंमतवाढीमध्ये आहे हे लक्षात घ्यावे लागेल. चीन पारंपरिकपणे अमेरिकेमधून ९० दशलक्ष एवढे सोयाबीन आयात करून त्यापासून मिळणाऱ्या पशुखाद्याचा उपयोग प्रचंड पसरलेल्या वराह किंवा डुक्कर पालन उद्योगात वापरत असे. मात्र या वर्षांत प्राण्यांवरील आफ्रिकन स्वाइन फ्लूच्या साथीमुळे वराहांची प्रचंड प्रमाणात कत्तल केल्यामुळे सोयाबीनची पशुखाद्यासाठी मागणी घटली आणि सोयाबीन आयात खूप कमी झाली. परंतु त्यामुळे सोयाबीन तेलाच्या उत्पादनात देखील घट झाली. ती भरून काढण्यासाठी चीनने आपली पाम तेल आयात वाढवली. दुसरीकडे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांनी जानेवारीपासून मोटारींमध्ये जैव इंधनाचे प्रमाण सध्याच्या अनुक्रमे १० आणि २० टक्क्यांवरून २० आणि ३० टक्क्यांवर नेण्याचे घोषित केले आहे. तर आखाती देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढीव कपात करण्याचे अलीकडेच मान्य केले आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे घाऊक बाजारामध्ये पाम तेलाच्या किमती केवळ दोन महिन्यांत ४० टक्क्यांनी वाढल्या असून भारतात त्या विक्रमी ८० रुपये किलोच्या पार गेल्या आहेत. याचा परिणाम म्हणून सोयाबीन तेलदेखील किलोमागे ९२ रुपये झाले आहे. किरकोळ बाजारात याचा परिणाम साधारण चार ते सहा आठवडय़ांत पूर्णपणे दिसून येतो.
तर दुधाच्या भाववाढीची कारणे बहुतांश स्थानिक आहेत. दुष्काळामुळे कपाशीचे उत्पादन अत्यंत कमी झाल्यामुळे सरकीची टंचाई, त्याचप्रमाणे पर्यायी पशुखाद्याचा पुरवठादेखील घटल्यामुळे निर्माण झालेल्या पशुखाद्याच्या टंचाईमुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकी पेंड दुपटीहून अधिक महाग झाली होती. याच काळात शेतकऱ्यांनी पशुधनाची केलेली कपात या सर्व गोष्टींमुळे ताज्या दुधाचा पुरवठा चांगलाच कमी झाला असून अमूलसारखी महाप्रचंड कंपनीदेखील आपल्या दैनिक पुरवठय़ात कित्येक दशलक्ष लिटरची कपात सोसत आहे. या पाश्र्वभूमीवर दुधाच्या भुकटीच्या किमतीदेखील गेल्या वर्षांत १००-१२० रुपये किलोवरून ३२५ रुपयांपर्यंत झेपावल्याचे पाहावयाला मिळत आहे. ऐन हंगामात दुधाची टंचाई असून या परिस्थितीमध्ये नजीकच्या काळात बदल संभवत नाही. त्यामुळेच आता आईस्क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ नवीन वर्षांत अजून महाग होतील अशी शक्यता आहे. कांद्याचे प्रमाण स्वयंपाकात काही प्रमाणात कमी करणे एक वेळ शक्य आहे, परंतु तेल आणि दूध त्या प्रमाणात कमी करणे सगळ्यांना शक्य नाही. त्यामुळे एकूणच २०२०च्या पूर्वार्धात ग्राहकांचे मासिक बजेट कोलमडणार वगैरे नाही, पण निश्चितच वाढणार आहे.
आता २०२० मध्ये कोणत्या कृषी जिन्नसांच्या किमती चढय़ा राहतील ते गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहू.
या स्तंभातून मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांसाठी सल्ला देताना सोयाबीनच्या किमती जानेवारीमध्ये ४,२०० रुपये प्रति क्विंटल तर फेब्रुवारी-मार्चमध्ये ४,५०० रुपयांची पातळी गाठणार असे सांगितले होते. प्रत्यक्षात मागील आठवडय़ातच ४,५०० रुपयांचा भाव आला आहे. सध्याच्या आवकीमधील वार्षिक तत्त्वावरील घट पाहता सोयाबीन उत्पादन आठ दशलक्ष टनांहून कमी असल्याची खात्री पटेल. त्यातच पाम तेलामधील जीवघेणी तेजी. त्यामुळे सोयाबीन पुढील वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये ५,००० रुपयांची पातळी ओलांडून दशकाच्या सुरुवातीचा ५,०५५ रुपयांचा विक्रम मोडीत काढणार हे नक्की. आता या तेजीचा अप्रत्यक्ष फायदा मोहरी आणि सोयाबीन तेलाला देखील होऊन मोहरीदेखील ५,००० रुपयांची विक्रमी पातळी गाठेल असा अंदाज असून सोयाबीन तेल १,००० रुपये प्रति दहा किलोचा भाव दाखवेल असे वाटत आहे. या सर्व वस्तू एनसीडीईएक्स या एक्स्चेंजवर उपलब्ध असून त्या मध्यम कालावधीच्या गुंतवणुकीसाठी पात्र आहेत. मात्र खरेदी सध्याच्या किमतीच्या २-४ टक्के खाली भावावर करावी.
याबरोबरच वर म्हटल्याप्रमाणे सरकीची पेंडदेखील एक्स्चेंजवर उपलब्ध असून त्यातील चार ते सहा महिन्यांसाठी गुंतवणुकीवर ३०-५० टक्क्यांपर्यंत नफा शक्य आहे. अति पावसामुळे बहुतांश कृषीबहुल भागांमध्ये भाताचा पेंढा तसेच इतर चार पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वैरणीचे भाव सध्या चांगलेच वाढले आहेत. दुसरीकडे कपाशीचे उत्पादनदेखील मागील वर्षांच्या १० टक्के अधिक झाले असले तरी सुरुवातीच्या अनुमानापेक्षा खूपच कमी होणार असल्यामुळे सरकीचा पुरवठा मर्यादितच राहणार आहे. तसेच कॉटन कॉर्पोरेशनने प्रचंड प्रमाणात कापूस खरेदी करण्याची शक्यता लक्षात घेता खुल्या बाजारातील कापसाची आणि सरकीची उपलब्धता अजून कमी होण्याची शक्यता लक्षात घेता सरकीची पेंड म्हणजे कॉटन सीड ऑइलकेकच्या किमती वायदे बाजारात सध्याच्या २,२०० रुपयांवरून जूनपर्यंत २,८००-३,२०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. पुढील काळात जर अवेळी पावसाने धुमाकूळ घातला तर याच किमती परत एकदा नवा विक्रम करतील.
याच परिस्थितीचा तसेच चीन आणि अमेरिकेमधील होऊ घातलेला पहिल्या टप्प्याचा करार आणि निर्यात मागणीत वाढ या गोष्टींमुळे कापसाच्या किमतीत देखील वाढ संभवते. मात्र बऱ्याच गोष्टी जर आणि तरच्या असल्यामुळे आताच याविषयी बोलणे योग्य ठरणार नाही.
तसेच ‘सट्टेबाजांची डार्लिग’ अशी ओळख असलेल्या गवार सीड आणि गवार गम या दोन वस्तूंच्या किमतीमध्ये देखील २० टक्क्यांएवढी वाढ पुढील तीन-चार महिन्यांमध्ये संभवते. उत्पादनात आलेली घट आणि कच्च्या तेलातील तेजी या दोन गोष्टींमुळे गवार सीड आणि गम तेजीत येतील अशी अपेक्षा असून गवार सीडच्या सालींना आणि भरडीला पशुखाद्यासाठी मागणी वाढेल अशी शक्यता आहे. सध्या गवार सीड ४,२०० रुपये क्विंटल असून एप्रिल-मे मध्ये ४,८००-५,००० रुपयांची पातळी येऊ शकते. गवार गमदेखील कच्च्या तेलाच्या विहिरींमध्ये वापरले जाते. त्यामुळे तेजीत तेलाचे उत्पादन वाढताना गमचा वापर वाढेल आणि त्यामुळे तेजी येईल असेही म्हटले जात आहे.
ksrikant10@gmail.com
(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )