श्रीकांत कुवळेकर

पुढील पंधरवडाभर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची धामधूम असेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपल्या प्रचार सभांमधून गावोगावी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी प्रचंड आस्था दाखवतील. निवडून दिल्यास ते प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याचे आश्वासनही देतील. पण आजचा शेतकरीदेखील सुज्ञ झाला असून त्याला या आश्वासनांमधील फोलपणा माहीत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामधील बहुसंख्य शेतकरी आता सोयाबीन आणि कापूस यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या नवीन हंगामाकडे डोळे लावून बसले असतील यात शंकाच नाही.

नवीन हंगामाच्या सोयाबीनची आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे तर कापूस महिनाअखेरपासून सुरू होईल. सध्या सोयाबीन वाढीव हमीभावाच्या, म्हणजे ३,७१० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकले जात आहे. लवकरच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये राज्य सरकारतर्फे खरेदी चालू होईल. परंतु नेहमीप्रमाणे महिनाअखेपर्यंत आवक चांगलीच वाढली की भाव पडणे स्वाभाविक आहे. ऑक्टोबरअखेर दिवाळीच्या सणासाठी शेतकरी वर्गातून विक्रीचा मोठा दबाव येण्याची शक्यता असल्यामुळे भाव कसे राहतात हे पाहावे लागेल.

वस्तुत: मे-जूनमधील दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनखालील क्षेत्र यावर्षी थोडे कमीच राहिले असून, त्यात सप्टेंबरमधील अतिपावसामुळे उत्पादनात खूपच मोठी घट येणार आहे. ही घट किती असेल याविषयीच्या अंदाजांवरच पुढील दोन महिन्यांत भाव ठरणार असल्यामुळे आपण त्याविषयीची परिस्थिती जाणून घेऊया.

मध्य प्रदेशमध्ये जुलै-सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ४४ टक्के अधिक पर्जन्यमान झाले असून राज्याच्या सोयाबीनबहुल पश्चिम भागामध्ये ते ६१ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातील पाऊस हा अवेळी आलेला असल्यामुळे काढणीसाठी तयार पिकाचे नुकसान झाले आहे. अ‍ॅगकॉन या संस्थेच्या सप्टेंबर महिन्याच्या अंदाजानुसार देशातील एकूण सोयाबीन उत्पादनामध्ये २५ टक्के घट होऊ शकेल. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पिकाचे चांगलेच नुकसान झाले असून तुलनेने महाराष्ट्रामध्ये नुकसान कमी असले तरी देशाचे एकूण उत्पादन ८० लाख टनांच्या खालीच असेल असे संस्थेचे म्हणणे आहे. जर्मनीमधील ऑइलवर्ल्ड या प्रसिद्ध संस्थेनेदेखील आपला भारताविषयी अंदाज मागील वर्षांच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी करून त्यात अजून घट अपेक्षित आहे असे म्हटले आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्यतेल परिषदेमध्ये सर्वच अंदाज १५-२० टक्के उत्पादन कमी असल्याचे दर्शवत होते.

या परिस्थितीत सोयाबीनची किंमत ४,५०० रुपये असणे अपेक्षित होते. परंतु सोयाबीनपासून बनणाऱ्या सोयामिल या पशुखाद्याला परदेशातून असलेल्या मागणीमध्ये चांगलीच घट झाल्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीवर दबाव राहण्याचीही शक्यता आहे. तसेच चीन या जगातील सर्वात मोठय़ा सोयाबीन ग्राहकाने आपली अमेरिकन सोयाबीनची आयात व्यापार युद्ध आणि देशातील पशुधनावरील स्वाइन फ्लूच्या आजारामुळे कमी केल्यामुळेदेखील अमेरिकन सोयामिल भारतीय सोयामिलपेक्षा ३० टक्के स्वस्त झाले आहे. येथे एक लक्षात घेणे जरुरीचे आहे की, भारतातील सोयाबीनदेखील अमेरिकन सोयाबीनपेक्षा ३०-३५ टक्के महाग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपले उत्पादन विकले जाणे कठीण आहे.

या परिस्थितीत हमीभाव खरेदीमध्ये आपल्या गरजेपुरते सोयाबीन विकणे योग्य ठरेल.  डिसेंबरनंतर पुरवठय़ाचा दबाव कमी होईल, त्यानंतर किमतींमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. परंतु ४,२०० आणि ४,५०० रुपये हे उरलेल्या हंगामामध्ये महत्त्वाचे टप्पे असतील. त्याविषयी सद्यपरिस्थितीत बोलणे योग्य ठरणार नाही.

कापूस बाजारामध्ये या घडीला शेतकऱ्यांसाठी निराशेचेच चित्र दिसत आहे. कमोडिटी बाजारविषयक अलीकडील अनेक कार्यक्रमांमध्ये कापूस उत्पादनाबद्दलचे अंदाज हे सोयाबीनच्या उलट येत आहेत. गेल्या वर्षीच्या ३१० लाख गाठीच्या तुलनेत या वर्षीच्या उत्पादनात १२ टक्के ते २० टक्क्य़ांपर्यंत वाढ अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. वायदा बाजारातील सध्याच्या किमतीही हेच दर्शवीत आहेत. नवीन हंगामाचा माल उत्तर भारतात, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात येऊ लागला असून किमती दर्जानुसार हमीभावाच्या वरच राहिल्या आहेत.

या दरम्यान येत्या १८-१९ तारखेला अकोल्यामध्ये कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची कापूस परिषद होत असून त्यावेळी उत्पादनाचे अंदाज प्रसिद्ध केले जातील. मागील वर्षांचा अनुभव पाहता या अनुमानाला फार महत्त्व आहे. कारण गेल्या वर्षी अमेरिकन कृषी खात्यापासून सर्व क्षेत्रातून भारतातील कापूस उत्पादनाचे मोठे आकडे प्रसिद्ध होत असताना कॉटन असोसिएशन सतत आपले अनुमान कमी करत गेले आणि त्यांचे अंदाज लक्षणीयरीत्या खरे ठरले होते. याची दखल कृषी मंत्रालय आणि अमेरिकन कृषी खात्यानेदेखील घेऊन आपल्या वर्षांअखेरील अंदाजामध्ये त्यानुसार कपात केली.

वस्तुत: कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये प्रथम दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टी यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे प्राथमिक अहवाल तेथील कृषी अधिकारी देत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागातील उत्तम उत्पादकता वाढीबरोबर मराठवाडय़ातील उत्पादकतेवरील दुष्काळाचा परिणाम पाहणे योग्य ठरेल. एकंदरीत असोसिएशनचे अंदाज मागील वर्षांपेक्षा अधिक असले तरी वास्तवाच्या अधिक जवळ असतील असे वाटते.

दुसरीकडे सुती धाग्यांच्या निर्यातीतील ३५ टक्क्य़ांहून अधिक घट आणि जागतिक बाजारात भारतापुढे असलेले बांगलादेश आणि व्हिएतनाम यांचे आव्हान यामुळे देशांतर्गत मागणीही कमी राहण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर सारी मदार चीन भारतातून किती कापूस आयात करेल यावर आहे.

त्यामुळे कापसाच्या भावातदेखील फार मोठी तेजी, निदान पुढील दोन महिन्यांमध्ये तरी नाही. गरजेनुसार आपले उत्पादन सध्याच्या ५,८०० रुपये क्विंटलला विकणे योग्य ठरेल. किमतीमध्ये घसरण झाल्यास हमीभावामध्ये कापूस महामंडळाला विकणेदेखील योग्य ठरेल. कापूस महामंडळ दिवाळीदरम्यान खरेदी चालू करण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रुपयाची घसरण झाल्यास भावात थोडी सुधारणा येऊ शकेल आणि परत कापसाच्या दर्जानुसार ५,८००-६,००० रुपयांची उंची गाठू शकेल. भांडवल बाजारातील घसरण आणि सरकारी तिजोरीवरील ताण यामुळे रुपया प्रति डॉलर ७२.५०-७३.०० पर्यंत घसरण्याची शक्यता असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. परंतु वर्षांअखेपर्यंत कापसाने ६,००० रुपयांची वेस ओलांडणे आजतरी अशक्य वाटते.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार  विश्लेषक )