सुधीर जोशी  sudhirjoshi23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पटलावरच्या भू-राजकीय संघर्षांवर बाजार आता प्रतिक्रिया देत नसला तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांचा ताण बाजारावर दिसून येईल. तथापि परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावूनही, तग धरून राहण्याची बाजाराची क्षमता गेल्या वर्षी प्रकर्षांने दिसून आली. लहान गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग आणि म्युच्युअल फंडांकडून नियमित खरेदी या जमेच्या बाजू नववर्षांतही उपकारक ठरतील..

युद्ध परिस्थितीमध्ये समेट घडण्याची चिन्हे दिसू लागताच बाजारात पुन्हा चैतन्य आले. सरलेल्या सप्ताहात एका दिवसाचा अपवाद वगळता निर्देशांकांनी रोज नवी उंची गाठत सप्ताहअखेर तीन टक्क्यांहून जास्त वाढ दर्शविली. व्यापक बाजारातही मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आली. मार्च महिन्याच्या वस्तू व सेवा कर संकलनाने १.४२ लाख कोटींचा नवा विक्रम नोंदविला ज्याचे चांगले पडसाद बाजारात दिसले.

 यूपीएल : युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल) पीक संरक्षण उत्पादने, विशेष रसायने आणि इतर औद्योगिक रसायनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. पीक संरक्षण उत्पादनांशिवाय यूपीएल वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी उत्पादनेदेखील तयार करते. यूपीएलकडे ४८.५ मेगावॅट क्षमतेचा स्व-वापरासाठी वीजनिर्मिती प्रकल्पदेखील आहे. रशिया व युक्रेनशी जास्त व्यापार संबंध नसणाऱ्या या कंपनीला एकात्मिक उद्योगाला सध्याच्या भू-राजकीय तणावाचा फारसा त्रास होणार नाही. कृषी उत्पादनांचे वाढते दर, खतांचा तुटवडा, अनुकूल हवामान स्थिती व युरोपीय देशांच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च अशा सकारात्मक बाबींचा यूपीएलला फायदा होईल. डिसेंबरअखेरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात २४ टक्के तर नफ्यात २६ टक्के वाढ झाली होती. जागतिक बाजारातील पिकांच्या उच्च किमतींमुळे आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत उत्तर अमेरिका व युरोपच्या बाजारपेठेतून कंपनीला चांगली कमाई होईल. चार आकडी भावाकडे वाटचाल करणाऱ्या या कंपनीच्या समभागात गुंतवणुकीला संधी आहे.

 पीएनसी इन्फ्राटेक : पीएनसी इन्फ्राटेक या आयएसओ प्रमाणित नावाजलेल्या बांधकाम कंपनीला गेल्या महिन्याभरात आठ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची रस्ते बांधणी कंत्राटे मिळाली आहेत. कंपनी महामार्ग, विमानासाठीच्या धावपट्टय़ा, उड्डाणपूल, पॉवर ट्रान्समिशन लाइन्स इत्यादी प्रकारच्या बांधकाम प्रकल्पात कार्यान्वित आहे. कंपनी लष्करी अभियंता सेवेसह अनेक मोठय़ा सरकारी बांधकाम प्रधिकरणांसाठी ‘टर्न की’ प्रकल्प राबविते. सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत आणि रस्ते बांधणी कंत्राट वाटप पद्धतीमधील सुधारणांमुळे कंपनीला मोठी कंत्राटे पुढील आर्थिक वर्षांत मिळण्याची शक्यता आहे. सध्या अडीचशे रुपयांजवळ असलेले हे समभाग एक-दोन वर्षांत चांगला परतावा देतील.

 अ‍ॅक्सिस बँक : सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग व कर्ज व्यवसाय १२ हजार कोटींना विकत घेण्याची घोषणा अ‍ॅक्सिस बँकेने केली. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेच्या सध्याच्या ग्राहकांमध्ये ३० लाख नव्या धनवान ग्राहकांची भर पडेल. हे ग्राहक अ‍ॅक्सिस बँकेकडे टिकून राहणे व सिटी बँकेचे कर्मचारी सामावून घेणे जिकिरीचे असले तरी स्वच्छ ताळेबंद, महामारीच्या आव्हानांमध्ये मालमत्तेच्या गुणवत्तेचे उत्कृष्ट व्यवस्थापन, पुरेसे भांडवल अशा गुणांच्या जोरावर पुढील वर्षभरात अ‍ॅक्सिस बँक यामध्ये यशस्वी होईल अशी आशा आहे. इतर मोठय़ा खासगी बँकांच्या तुलनेत अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग स्वस्त आहे. या आधी मॅक्स लाइफबरोबर केलेली भागीदारी व या नव्या धाडसी पावलाने अ‍ॅक्सिस बँक इतर खासगी बँकांच्या बरोबरीने बाजारात आघाडीवर राहण्यास अनुकूल परिस्थिती आहे.

 गोदरेज प्रॉपर्टीज : गेल्या काही दिवसांत बंगळूरु व पुणे या शहरात गोदरेज प्रॉपर्टीजने गृहप्रकल्पांची घोषणा केली आहे. याआधी पुणे शहराजवळच्या प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंपनी दिल्लीत मोक्याच्या ठिकाणी नवा प्रकल्प टीडीआय समूहाच्या मदतीने सुरू करीत आहे. आता कंपनीचे तीन प्रकल्प दिल्लीत सुरू झाले आहेत. मुंबईकेंद्रित व्यवसाय करणाऱ्या व एक विश्वासू प्रवर्तक लाभलेल्या या कंपनीचा व्यवसाय आता भारतात पसरू लागला आहे. कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या फक्त १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या उच्चांकापासून ३० टक्क्यांची घसरण झालेल्या या कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

 गेल्या आर्थिक वर्षांत निफ्टीने १९ टक्के परतावा दिला. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावूनही बाजाराने दिलेला परतावा निश्चितच चांगला आहे. लहान गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग व टिकून रहाण्याची क्षमता गेल्या वर्षी प्रकर्षांने दिसून आली. परिणामी, गुंतवणूक क्षेत्राशी निगडित सीडीएसएल, एमसीएक्स, बीएसई, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल अशा कंपन्या चांगला व्यवसाय करतील. धातु, ऊर्जा, इंधन, रसायने व सदाहरित माहिती तंत्रज्ञान क्षेत्र नव्या वर्षांत बाजारात कमाई करायला मोठा हातभार लावतील. एफएमसीजी कंपन्यांच्या नफ्यावर सध्या इंधन, तेल व धान्यांच्या वाढत्या किमतींमुळे तणाव आलेला आहे. पण बाजारात या कंपन्यांत झालेल्या घसरणीने सध्याच्या भावात हे सर्व गृहीत धरले गेले आहे. आता या क्षेत्रामधील गुंतवणूक जलद फायदा देणारी नसली तरी दीर्घ मुदतीच्या लक्ष्यासाठी वाजवी किमतीमध्ये होईल. जागतिक पटलावरच्या भू-राजकीय संघर्षांवर बाजार आता प्रतिक्रिया देत नसला तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या, चीनमधील उद्योग मंदी, खाद्य वस्तू व खतांच्या वाढत्या किमती या गोष्टी अनेक कंपन्यांपुढे समस्या निर्माण करू शकतात. नव्या वर्षांत अनेक बदलत्या घटकांना विचारात घेऊन गुंतवणुकीसाठी चोखंदळपणे कंपन्या निवडण्याची कसोटी लागणार आहे. 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market analysis investment in stock market in new financial year zws