सुधीर जोशी
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना परिस्थिती फारशी चांगली नाही. चिंता करावी अशी महागाईची आकडेवारी, प्रति डॉलर ८० पर्यंत गटांगळी घेतलेला रुपया आणि या प्रतिकूलतेत भर म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा जोर कायम आहे. संयमाची ही कसोटी निश्चितच आहे आणि हा काळ तरून जाण्याचे आव्हान पेलणाऱ्या गुंतवणूकदारांनाच भविष्यात त्याची योग्य फळे मिळतील..

अमेरिकेतील व भारतातील महागाईचे आकडे, घसरणारा रुपया यांची नोंद घेऊन बाजाराने आधीच्या तीन सप्ताहांतील कामगिरीने गाठलेल्या उंचीवरून माघार घेतली. टीसीएसने तिमाही निकाल पर्वाच्या सुरुवातीलाच केलेल्या निराशेने बाजाराला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बाकीच्या कंपन्यांच्या निकालांबाबत फारशी आशा राहिलेली नाही. एसीसीच्या सुमार कामगिरीने वस्तू क्षेत्रातील इतर कंपन्यांना पहिल्या तिमाहीत फारसे काही गवसणार नाही याचीही बाजाराला कल्पना आली आहे. बाजारातील या निराशामय वातावरणात माइंडट्रीने दिलेल्या चांगल्या निकालांचीदेखील दखल घेतली गेली नाही. नाही म्हणायला इंधनाचे भाव खाली राहण्याची शक्यता आणि अन्नधान्य व खाद्यतेलाच्या किमतींमधील घसरण यामुळे ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) कंपन्यांनी बाजाराला तारले. परिणामी निफ्टीने सोळा हजारांची पातळी राखली.

डी-मार्ट :
ॲव्हेन्यू सुपरमार्टने (डी-मार्ट) करोनामुक्त असलेल्या जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केली. नफ्यामध्ये सहापट वाढ होऊन तो ६८० कोटी झाला तर विक्री दुप्पट झाली. गेल्या वर्षांतील करोनामुळे घसरलेल्या निकालांपुढे या तिमाहीचे निकाल उठावदार दिसत आहेत. गेल्या तीन वर्षांत कंपनीने ११० नवी विक्री दालने उघडली, पण करोनाची साथ पाहता ती सर्व पूर्ण क्षमतेने काम करू शकण्याची ही पहिलीच तिमाही होती. डी-मार्टची ६० टक्के विक्री जीवनावश्यक वस्तूंद्वारे होते. त्यामुळे वाढत्या महागाईचा त्यावर कमी परिणाम होतो. डी-मार्ट रेडी दुकानांद्वारे कंपनीने ई-कॉमर्स व्यवहारात पाय रोवले आहेत. त्याचा विस्तार आता लहान शहरात करण्याचे प्रयोग कंपनी करत आहे. आपल्या दीर्घ मुदतीच्या पोर्टफोलियोमध्ये ठेवण्यासारखा हा समभाग आहे. बाजाराच्या घसरणीत हे समभाग जरूर जमवावेत.

टीसीएस :
नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल थोडे सौम्य आले. नफ्यामध्ये पाच टक्के वार्षिक वाढ झाली. जगात डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचे होणारे अवमूल्यन, कुशल कामगार सोडून जाण्याचे वाढलेले प्रमाण व त्यामुळे पगारावरील वाढता खर्च, वाढणारा प्रवास खर्च अशा अनेक कारणांचा हा परिणाम आहे. निकाल जाहीर झाल्यावर कंपनीच्या समभागात घसरण झाली. अमेरिकेसह प्रगत देशात येणाऱ्या संभाव्य मंदीमुळे माहिती-तंत्रज्ञान सेवा पुरविणाऱ्या भारतातील कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. या भीतीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे पतमानांकन काही विश्लेषकांनी कमी केले आहे; पण त्यामुळे आपल्या जवळचे समभाग विकावेत, अशी परिस्थिती नाही. कंपनी प्रत्येक तिमाहीत जाहीर करत असलेला लाभांशाचा परतावादेखील चांगला आहे. समभागात आणखी घसरण झाल्यास खरेदी करून नक्त खरेदी मूल्य कमी करता येईल.

माइंड ट्री :
जूनअखेरच्या तीन महिन्यांतील टीसीएसच्या ५ टक्के, तर एचसीएलच्या २ टक्के नफ्यातील वाढीसमोर माइंड ट्रीच्या नफ्यातील ३६ टक्के वाढ नक्कीच लक्षवेधी आहे. ही वाढ कंपनीच्या बँकिंग सेवा क्षेत्रातील व पर्यटन सेवा क्षेत्रातील ग्राहकांमुळे साध्य झाली. कंपनीला क्लाऊड टेक्नॉलॉजीवर आधारित सेवांसाठी अनेक कंत्राटे गेल्या वर्षी मिळाली आहेत. कंपनीचे एल ॲण्ड टी आयटी सव्र्हिसेसबरोबर एकत्रीकरण होणार असल्यामुळे भविष्यात एका मोठय़ा माहिती-तंत्रज्ञान कंपनीमध्ये सहभाग असण्यासाठी या कंपनीमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल. सध्या बाजारातील निराशामय वातावरणाने कंपनीच्या समभागात घसरण होत आहे; पण दीर्घ मुदतीत ही गुंतवणूक वाढविण्याची संधी मानली जायला हवी.

गती लिमिटेड :
गती ही भारतातील जलद माल वाहतूक व वस्तू पुरवठा साखळीसाठी सेवा देणारी अग्रगण्य कंपनी आहे. रस्ते, सागरी व हवाईमार्गे सेवा देण्याची कंपनीकडे क्षमता आहे. भारताबाहेर आग्नेय आशियाई देशांमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. कंपनीला ५७ टक्के उत्पन्न मोठय़ा ग्राहकांकडून मिळते. लघू आणि मध्यम उद्योगांबरोबर व्यवसाय करण्यासाठी कंपनी विशेष प्रयत्न करीत आहे. कंपनीने डिजिटल सेवा देण्यासाठी खास ॲप विकसित केले आहे. करोनाकाळात तोटय़ात गेलेली कंपनी पुन्हा नफ्यात येण्याच्या मार्गावर आहे.

या सप्ताहात जाहीर झालेले महागाईचे आकडे नक्कीच चिंता वाढवणारे आहेत. जून महिन्यातील अमेरिकेतील महागाईची वाढ ८.८ च्या अंदाजापेक्षा जास्त, ९.१ टक्के झाली. त्यामुळे अमेरिकी मध्यवर्ती बँक या महिनाअखेर व्याजदरात मोठी वाढ करण्याची शक्यता वाढली आहे. भारतातील परिस्थितीही काही वेगळी नाही. भारतातील किरकोळ महागाईचा निर्देशांक जूनमध्ये ७ टक्के होता आणि पुढे तो ७.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यात भर पडत आहे डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या घसरणीची. लवकरच तो ८० चा टप्पा पार करेल. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा जोर कायम राहील. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ही परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांच्या संयमाची ही कसोटी आहे, पण भविष्यातील नफ्यासाठी पावले उचलण्याची वेळ आहे.
सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:

  • हायडेलबर्ग सिमेंट, अंबुजा सिमेंट, हिंदूस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी लाइफ, हटसन ॲग्रो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, एल अँड टी फायनान्स, रॅलीज, इंडसइंड बँक, कजारिया, अतुल लिमिटेड, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, अल्ट्राटेक सिमेंट, बँक ऑफ महाराष्ट्र, पॉलिकॅब या कंपन्या जूनअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
  • मास्टेक, ओरॅकल फायनान्शियल, विप्रो, टाटा कम्युनिकेशन्स, एम्फॅसिस, सायन्ट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्थात जूनअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
  • केअर रेटिंग्ज कंपनी बायबॅक – समभाग पुनर्खरेदीची घोषणा करेल.
    sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader